'टायगर' चालला पाकची मनधरणी करायला - Marathi News 24taas.com

'टायगर' चालला पाकची मनधरणी करायला

www.24taas.com, मुंबई
 
पाकिस्तानने  एक था टायगरच्या प्रोमोजवर घातलेल्या बंदीमुळे दिग्दर्शक कबीर खान आणि यशराज फिल्म्सपुढे प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. सिनेमा न पाहाताच त्यावर बंदी घालण्याचं कारण त्यांना लक्षात येत नाहीये. हा सिनेमा पाकिस्तानविरोधी असल्याचं कारण पाकिस्तानातून दिलं जात असलं, तरी हे खरं नाही. एक था टायगरमध्ये पाकिस्तानला शत्रू मानलेलं नसल्याचं दिग्दर्शकाचं म्हणणं आहे. हे पाकिस्तान सरकारला पटवून देण्यासाठी दिग्दर्शक कबीर खान आणि खुद्द अभिनेता सलमान खान पाकिस्तानला जाणार आहेत.
 
पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी ऑथोरिटीने एक पत्र जारी केलं आहे. कुठल्याही सॅटेलाइट चॅनेलने आणि केबल टीव्हीने पाकिस्तानात एक था टायगर सिनेमाचा कुठलाही प्रोमो पाकिस्तानी नागरिकांपुढे येऊ देऊ नये असं या पत्रात सांगण्यात आलं आहे. 15 ऑगस्ट रोजी जभरात प्रदर्शित होणारा एक था टायगर हा सिनेमा RAW आणि ISI यांच्या कारवायांवर आधारित आहे.
 
“या सिनेमामध्ये इंटर-स्टेट इंटेलिजन्स (ISI) या पाकिस्तानच्या सरकारी संघटनेची प्रतिमा मलिन करण्यात आली आहे.” असंही या पत्रात म्हटलं आहे. त्यामुळे पाकिस्तानी केंद्र सरकारच्या सेंसॉर बोर्डाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत एक था टायगरचा कुठलाही प्रोमो टीव्ही, रेडिओवरून प्रसारित करायचा नाही असा सरकारी हुकुम आहे.
 
याबद्दल ट्विटरवर माहिती देताना कबीर खान यांनी मात्र या गोष्टीचा दोष पाकिस्तान सरकारला न देता काही प्रसिद्ध भारतीय सिनेमांना दिला आहे. बॉर्डर, गदर यांसारख्या चित्रपटांचं नाव न घेता कबीर खान म्हणाला, “पाकिस्तानबद्दल आम्ही काहीच वाईट दाखवत नाही. पाकिस्तानचा असा गैरसमज होण्याचं कारण म्हणजे यापूर्वी बनवले गेलेले काही वाह्यात हिंदी सिनेमे हेच होय. या सिनेमांनी भारत- पाकिस्तानमधील शत्रुत्व वाढवलं. त्यामुळेच पाकिस्तान एक था टायगर तिथे रिलीज होऊ देत नाहीये. पण मी सलमानच्या पाकिस्तानी फॅन्सना अस्वासन देतो, की एक था टायगर पाकिस्तानातही त्याच दिवशी प्रदर्शित होईल, ज्या दिवशी जगात सगळीकडे होईल.”
 
स्वतःच्या फिल्म्स पाकिस्तानात चालाव्यात, म्हणून काय काय करावं लागतं सुपरस्टार्सला ते बघा....

First Published: Wednesday, July 11, 2012, 16:06


comments powered by Disqus