Last Updated: Tuesday, July 17, 2012, 15:40
www.24taas.com, मुंबई आमिर खानचा मुलगा जुनैद आता आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवण्यास सिद्ध झाला आहे. आमिर खान आणि रीना दत्त यांचा मुलगा असणारा १७ वर्षीय जुनैद बॉलिवूडमध्ये एंट्री घेण्याच्या तयारीत आहे. मात्र तो आत्ता पडद्यावर न येता पडद्यामागे राहून काम करणार आहे.
अभिनेता बनण्यापूर्वी सिनेमा तंत्राचं संपूर्ण ज्ञान मिळावं यासाठी जुनैद राजकुमार हिरानी यांच्या आगामी चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करणार आहे. एका दैनिकाने दिलेल्या माहितीनुसार जुनैद राजकुमार हिरानी च्या आगामी ‘पीके’ या सिनेमासाठी त्यांना सहाय्यक म्हणून काम करणार आहे. या सिनेमात आमिर खान आणि अनुष्का शर्मा च्या प्रमुख भूमिका आहेत.
जुनैदला सिनेमाक्षेत्रात येण्याचं आकर्षण अगदी पहिल्यापासून होतं. म्हणूनच इतक्या कमी वयात जुनैद बॉलिवूडमध्ये प्रवेश करत आहे. मात्र, सिनेक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी जुनैदला आपल्या परफेक्शनिस्ट वडिलांना एक वचन द्यावं लागलं. आपण बॉलिवूडमध्ये प्रवेश केला तरी आपल्या अभ्यासाकडे अजिबात दुर्लक्ष होऊ देणार नाही असं आमिर खानला वचन दिल्यानंतरच जुनैदला सिनेमासाठी काम करण्याची परवानगी मिळाली. आता जुनैद भावी मिस्टर परफेक्शनिस्ट बनेल का हे कळेलच...
First Published: Tuesday, July 17, 2012, 15:40