'एक्सप्रेस' जोरात; चित्रीकरणाआधीच १०५ कोटी - Marathi News 24taas.com

'एक्सप्रेस' जोरात; चित्रीकरणाआधीच १०५ कोटी

www.24taas.com, मुंबई
बॉलिवूडच्या इतिहासात रोहित शेट्टीनं स्वत:च्या नावाची नोंद केलेली आपल्याला माहितच आहे. रोहित शेट्टी आत्तापर्यंतचा एकमेव दिग्दर्शक आहे ज्याच्या तीन फिल्म्सनं (गोलमाल ३, सिंघम आणि बोल बच्चन) १०० करोडच्या वर कमाई केलीय. आणि आता रोहित शाहरुख खानला घेऊन ‘चेन्नई एक्सप्रेस’च्या कामात व्यस्त आहे. रोहित आणि शाहरुखच्या नावाचं वजन आता त्यांच्या फिल्म्सवरही पडू लागलंय. त्यामुळेच की काय रोहितचा आगामी ‘चेन्नई एक्सप्रेस’ हा सिनेमा शूटींग सुरू होण्याआधीच विकला गेलाय आणि तोही तब्बल १०५ करोड रुपयांना...
 
राहितच्या ‘चेन्नई एक्सप्रेस'बद्दल बॉलिवूडशी संबंधित अनेकांना उत्सुकता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सिनेमाचं चित्रकरण अजून सुरूही झालेलं नाही तोवरच या सिनेमानं ‘१०० करोड क्लब’मध्ये एन्ट्री मिळवलीय. या व्यवहारात सिनेमाच्या सेटेलाईट अधिकारही विकले गेलेत का? हे मात्र अजूनही कळू शकलेलं नाही. बॉलिवूडकरांना मात्र १०५ करोड ही काही फार मोठी रक्कम वाटत नाहीय. त्यामुळे या बातमीबद्दल अजूनतरी कुणीही आश्चर्य व्यक्त केलेलं नाही. काहींच्या मते तर रोहित आणि शाहरुख यांना यापेक्षा जास्त रक्कम मिळायला हवी होती.
 
सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे. २०१३ च्या मध्यापर्यंत हा सिनेमा प्रदर्शित करण्याचा दिग्दर्शकाचा मानस आहे. या सिनेमात हिरोईन कोण असेल यावर अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे. दीपिका पदूकोनचं नाव या सिनेमातील भूमिकेसाठी आघाडीवर आहे.
 
.

First Published: Sunday, August 5, 2012, 17:03


comments powered by Disqus