Last Updated: Thursday, December 22, 2011, 20:52
झी २४ तास वेब टीम, मुंबई मुन्नाभाईचा तिसऱ्या भागाच्या चित्रीकरणाच्या विलंबाला विधु विनोद चोप्रांनी आता पर्यंत अनेक कारणं दिली आहेत. त्यात कास्टमध्ये झालेला बदलापासून ते स्क्रिप्ट मनाप्रमाणे आकार घेत नाही इथं पर्यंत अनेक कारणं त्याने दिली पण आता तर त्याने मोठाच धक्का दिला आहे. मुन्नाभाईचे पहिले दोन भाग दिग्दर्शित करणारा राजकुमार हिरानी तिसरा भाग दिग्दर्शित करणार नसल्याचं सांगुन त्याने बॉम्बच टाकला आहे. मुन्नाभाई भाग तिसराचे शुट २०१२ साली सुरु होईल आणि कलाकार तेच राहणार असले तरी दिग्दर्शक बदलण्यात येणार आहे.
एका दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार चोप्रांची आगामी फिल्म 'फेरारी की सवारी' दिग्दर्शित करणाऱ्या राजेश मापुस्करच्या नावाचा विचार हिरानीच्या जागी करण्यात येत आहे. हिरानीला गमावल्याबद्दल चोप्रांना विचारलं असता ते म्हणाले की हिरानी, मापुस्कर आणि मी एका कुटुंबा प्रमाणे काम करतो. आता मापुस्करच्या सिनेमासाठी हिरानीने संवाद लिहिले आहेत. हिरानी देशातल्या आघाडीच्या दिग्दर्शकांपैकी एक आहे आणि तुम्हीच सांगा कोणता दिग्दर्शिक त्याच्या सहाय्यकाच्या फिल्मसाठी संवाद लेखनाचे काम करेल असा सवाल चोप्राने केला आहे.
मुन्नाभाईच्या तिसऱ्या भागासाठी पाच वर्षांचा कालावधी का लागला? असं विचारलं असता कंपनीच्या निर्मितीचा दर्जा कायम
राखण्यासाठी इतका वेळ लागल्याचं त्यांनी सांगितलं. स्विडिश सिनेमा दिग्दर्शक इंगमर बर्गमनचं वाक्य सिनेमाने मनोरंज करताना त्याचा आत्मा विकता कामा नये हे चोप्रांनी आपलं तत्व असल्याचं सांगितलं. चोप्रा फिल्सनी आपल्या अंतरात्म्याशी कधीही तडजोड केली नसल्याचं आणि केवळ २०० कोटी रुपये कमावण्यासाठी घाई गडबडीत मुन्नाभाईचा तिसऱ्या भागाची निर्मिती करणार नसल्याचं चोप्रांनी सांगितलं. मला एक सर्वोत्कृष्ट सिनेमाची निर्मिती करायची असल्याचं चोप्रांचे म्हणणं आहे.
First Published: Thursday, December 22, 2011, 20:52