शाहरुख -आमिरमध्ये 'महाभारत' ! - Marathi News 24taas.com

शाहरुख -आमिरमध्ये 'महाभारत' !

www.24taas.com, मुंबई
 
अतिमहागडा महत्त्वाकांक्षी ‘रा.वन’ बनवून झाल्यावर आता शाहरुख खानची चक्क ‘महाभारत’ बनवण्याची इच्छा आहे. या सिनेमाच्या मार्केटिंगसाठी शाहरूख सध्या परदेशातल्या प्रोडक्शन हाऊसेसशी बोलणी करत आहे. याद्वारे त्याच्या महाभारत सिनेमाचं मार्केटिंग अशा देशांत आणि अशा भागांपर्यंत होईल, जिथपर्यंत ‘बॉलिवूड’ अजून पोहोचलेलं नाही. हा सिनेमा शाहरूखला हॉलिवूडच्या ‘अवतार’ स्टाईलमध्ये करायचा असून तो ‘3-डी’ असेल. आणि अर्थातच, या सिनेमाचं बजेट रा.वनच्या बजेटपेक्षाही खूप जास्त असेल.
 
 
महाभारत हे भव्य महानाट्य असल्यामुळे ते एका सिनेमात बसवणं कठीण आहे. विषयाला पूर्ण न्याय मिळावा, म्हणून हा सिनेमा तीन भागांत बनवण्याचा शाहरुखचा विचार आहे. काही सूत्रांकडून अशीही माहिती मिळाली आहे की शाहरूख यासाठी ट्वेंटीएथ सेंच्युरी फॉक्स, वॉर्नर ब्रदर्स यांसारख्या हॉलिवूडच्या मोठमोठ्या स्टुडिओंबरोबर बोलणी करत आहे. शाहरुखने यापूर्वी ‘असोका’द्वारे इतिहासात हात घालण्याचा प्रयत्न केला होता. पण, तो प्रेक्षकांच्या पचनी पडला नव्हता. यावेळी कदाचित प्रयत्न यशस्वी होऊ शकतो.
 
महाभारताने केवळ शाहरुखलाच मोहिनी घातली आहे असं नाही, तर आमिर खाननेही यापूर्वी महाभारतावर सिनेमा बनवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, आमिर चिकित्सक अभिनेता असल्यामुळे महाभारताचा संपूर्ण पट समजावून घेण्यासाठी आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी त्याला बराच वेळ लागणार असल्याचं सांगितलं जातं. महाभारतातील कर्णाची भूमिका आपल्याला खूप प्रभावित करते असं आमिरने यापूर्वी म्हटलं होतं. पण, माझं व्यक्तिमत्त्व कर्णासाठी योग्य नसल्याने मी मला आवडणारी आणि शोभणारी कृष्णाची भूमिका करू शकतो, असंही त्याने घोषित केलं होतं. आता महाभारतावरून पुन्हा दोन खानांमध्ये महाभारत तर होणार नाही ना, हेच बघायचं आहे.
 

First Published: Saturday, January 14, 2012, 17:38


comments powered by Disqus