Last Updated: Wednesday, January 18, 2012, 22:11
www.24taas.com, मुंबईभारतीय फास्ट बॉलर झहीर खान आणि बॉलिवूड अभिनेत्री इशा शर्वाणीने विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे. गेली काही वर्षे या दोघांच्या अफेअर बद्दलही मोठ्या प्रमाणात छापून आलं होत. झहीर खान आणि इशा शर्वाणी मार्चच्या अखेरीस विवाहबद्ध होतील, असं त्यांच्या जवळच्या मित्राने सांगितलं.

बॉलिवूड आणि भारतीय क्रिकेट यांचे नातं घनिष्ठ आणि गहिरं देखील आहे. टायगर पतौडी आणि शर्मिला टागौर, मोहसीन खान आणि रिना रॉय हे विवाह बंधनात अडकल्याचं आपणा सर्वांना ठाऊक आहेच. पण त्या व्यतिरिक्त अनेक अफेअर्सही चर्चेत राहिली आहेत. अगदी सत्तरच्या दशकात गॅरी सोबर्स आणि एकेकाळची राजेश खन्नाची प्रेयसी अंजु महेंद्रूच्या संबंधांची चर्चा मोठ्या चवीने केली जायची.
झहीर आणि इशा ही दोघं पहिल्यांदी २००५ साली भेटले होते. त्यानंतर त्यांच्या भेटीगाठी अर्थातच वाढत गेल्या आणि झहीर क्लिनबोल्ड झाला. काही दिवसांपूर्वी या दोघांच्या कुटुंबियांमध्ये भेट झाली आणि विवाहाची बोलणी निश्चित करण्यात आली. झहीर ऑस्ट्रेलियन दौऱ्यावरून परतल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचं समजतं.
पण हे दोघेही मार्च महिन्यात विवाह करण्यास उत्सुक आहेत. झहीर आणि इशाच्या प्रेमप्रकरणाने अनेक चढउतार पाहिले, या दोघांमध्ये २००७ साली काही काळ दुरावा निर्माण झाला होता. पण परत २०१० साली ते एकत्र आले आणि मग त्यानंतर प्रेम बहरतचं गेलं.
First Published: Wednesday, January 18, 2012, 22:11