Last Updated: Saturday, February 11, 2012, 16:07
www.24taas.com, मुंबई हिंदी चित्रपट सृष्टीतील बीग बी अमिताभ बच्चन यांच्यावर आज यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. याबाबतची माहिती त्यांच्या डॉक्टरांनी दिली.
दरम्यान, अभिषेकने सर्वांचे आभार मानले आहेत. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि प्रार्थनेमुळे माझ्या वडिलांवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. आता ते आपल्या खोलीत आराम करीत आहेत, असे अभिषेकने ट्विट केले आहे. बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ यांना गेले तीन दिवसापासून मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कुली या हिंदी चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान झालेल्या अपघातामुळेच हा त्रास झाला असल्याचे बीग बी यांनी ट्विट केले होते.

अमिताभ बच्चन (६९) गेल्या काही वर्षांपासून पोटाच्या विकाराने त्रस्त आहेत. आज शनिवारी सकाळी अमिताभ रुग्णालयात या शस्त्रक्रियेसाठी दाखल झाले. त्यावेळी त्यांच्यासमवेत त्यांचा मुलगा अभिषेक आणि पत्नी जया बच्चन होते. अभिताभ यांनी त्यांच्या चाहत्यांशी ट्विटर आणि ब्लॉगच्या माध्यमातून संपर्क ठेवला आहे. ते नेहमी याच्यामाध्यमातून माहिती देत आहेत. यशस्वी शस्त्रक्रिया केल्याचेही अमिताभ यांनी ट्विट केले.
अमिताभ यांनी ब्लॉगवर गुरुवारी लिहीले होते, रुग्णालयात आज माझ्या पोटावर काही उपचार करण्यात आले असून, त्याची माहिती मी कुटुंबियांना देणार आहे. शनिवारी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. माझ्या प्रकृतीबाबत आणखी तपशिल देत नाही. मात्र, कुटुंबातील सदस्य शस्त्रक्रियेसाठी तयार होतील, कारण ती फारशी मोठी नाही. मला आजपासूनच इंजेक्शन्स देण्यात येत आहेत. बुधवारी पोटाचा सीटी स्कॅन केल्यानंतर, डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे. त्यानुसार शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
First Published: Saturday, February 11, 2012, 16:07