प्राण यांचे ९३ व्या वर्षात पदार्पण - Marathi News 24taas.com

प्राण यांचे ९३ व्या वर्षात पदार्पण

www.24taas.com, मुंबई
 
हिंदी सिनेसृष्टीत खलनायकी भूमिकांमध्ये आपल्या अभिनय सामर्थ्याने स्वत:चा अमीट ठसा उमटविणाऱ्या प्राण यांचा आज ९२ वा वाढदिवस...प्राण यांचा जन्म १२ फेब्रुवारी १९२० रोजी दिल्लीत झाला. त्यांचे वडिल लाला केवल क्रिशन सिकंद हे सरकारी कंत्राटदार असल्याने प्राण यांचे शिक्षण कपूरथला, उन्नाओ, मिरत, देहराडून आणि रामपूर अशा वेगवेगळ्या शहरात झालं.
 
लाहोरमध्ये मोहम्मद वली यांच्यांशी त्यांची योगायोगाने गाठ पडल्यानंतर त्यांनी यमला जाट या सिनेमातली भूमिका प्राण यांनी दिली. त्यानंतर १९४२ साली दलसूख पंचोली यांच्या सिनेमात त्यांनी नूरजहाँसोबत काम केलं. लाहोरमध्ये असताना त्यांनी २२ सिनेमात काम केलं, त्यानंतर फाळणी झाली. फाळणीनंतर प्राण मुंबईला आले.
 
मुंबईत परत एकदा सिनेमात संधी मिळेल ही आशा प्राण यांनी सोडून दिली होती. पण प्राण यांना एका दिवसात तीन सिनेमांच्या ऑफर्स आल्या आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. शाहीद लतीफांचा जिद्दी, मोहम्मद वलींचा ग्रहस्ती आणि प्रभातचा अपराधी हे ते तीन सिनेमे होय. डी.डी.कश्यप यांच्या बडी बहन या सिनेमाने प्राण यांचे आघाडीचे खलनायक म्हणून स्थान निश्चित झालं.
 
आपल्या सहा दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत प्राण यांनी तब्बल ४०० सिनेमात अभिनय केला. मूर्तीमंत खलनायक म्हणजे प्राण. आपल्या मुद्राभिनयाने तसंच शैलीने, लकबीने प्राण यांनी अनेक भूमिका जीवंत केल्या. प्राण यांचे वैशिष्ट्यं म्हणजे प्रत्येक सिनेमात त्यांनी नवीन लकबींचा केलेला परिणामकारक वापर आणि त्यामुळेच त्या दीर्घकाळ प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहिल्या. जिस देश में गंगा बहती है, उपकार, जंजीर, राम और श्याम या सिनेमातल्या भूमिका अजरामर झाल्या आहेत.
 

First Published: Sunday, February 12, 2012, 15:56


comments powered by Disqus