Last Updated: Thursday, February 23, 2012, 09:14
www.24taas.com, मुंबई पद्मश्री अभिनेता सैफ अली खान दिवसभर चर्चेत राहिला. दक्षिण अफ्रिकेतील एका उच्चपदस्थाला केलेल्या मारहाणप्रकरणी त्याला अटक आणि नंतर जामीन मंजूर झाला. ताजच्या वसाबी रेस्टॉरंटमध्ये एनआरआय इक्बाल शर्माला मारहाण केल्याप्रकरणी सैफ अली खानवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर दिवसभर पोलीस आणि मीडियाला गुंगारा देणारा सैफ संध्याकाळी उशिरा कुलाबा स्टेशनमध्ये हजर झाला. कुलाबा पोलिसांसमोर त्यानं शरणागती पत्करली. त्यानंतर सैफला काही वेळात जामीन मंजूर करण्यात आला. सैफ अली खान त्याचे साथीदार बिलाल अमोरही आणि शकील लदाक या तिघांची १५हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली.
यानंतर सैफ अली खान पत्रकारांशी बोलला. इक्बाल शर्मानेच महिलांशी गैरव्यवहार केला असा आरोप सैफ अली खाननं यावेळी केला आहे. तसंच इक्बालनं मारहाणीस सुरुवात केल्याचंही सैफनं म्हटलंय. सीसीटीव्हीमध्ये शूट झालेलं फुटेज सगळ्यांना दाखवावं अशी मागणीही त्याने केली. आत्तापर्यंत या प्रकरणाची एकच बाजू लोकांसमोर आली आहे. मात्र, सीसीटीव्हीवरील फुटेज पाहून लोकांच्याही लक्षात येईल की सुरूवात कुणी केली. मी दारू प्यायलेलो नव्हतो असंही सैफ अली खानने स्पष्ट केलं. मात्र घडल्याप्रकाराबद्दल दुःख व्यक्त करून सैफ अली खानने घडलेला प्रकार हा पब्लिसिटी स्टंट नसल्याचंही कबूल केलं.
First Published: Thursday, February 23, 2012, 09:14