Last Updated: Monday, March 12, 2012, 08:57
www.24taas.com, मुंबई 
बॉलिवूडमध्ये एकेकाळी रेखा, श्रीदेवी आणि माधुरी दिक्षीतचं अधिराज्य होतं. या नायिकांनी आपल्या अभिनय सामर्थ्यावर यशस्वी सिनेमांची परंपरा निर्माण केली. आता तोच वारसा विद्या बालन पुढे नेत आहे हे परत एकदा सिद्ध झालं आहे.
विद्याच्या कहानी या सिनेमाने ओपनिंगच्या दिवशीच तीन कोटी रुपयांची घशघशीत कमाई बॉक्स ऑफिसवर केली आहे. विद्याने आपल्या सर्वांगसुंदर अभिनयाने आणि भूमिकेत सर्वस्व पणाला लावण्याच्या वृत्तीने सिनेमा एक वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला आहे.
याआधी विद्याने पा, इश्किया, नो वन किल्ड जेसिका आणि द डर्टी पिक्चर यासारख्या वैविध्यपूर्ण भूमिका ताकदीने साकारत बॉलिवूडमध्ये आपला अमीट ठसा उमटवला आहे. कहानीमध्ये नवऱ्याच्या शोधात निघालेल्या एका गर्भवती स्त्रीच्या भूमिकेचं विद्याने अक्षरश: सोनं केलं आहे. विद्याने भूमिका जीवंत केली आहे आणि त्यामुळे प्रेक्षकाला खिळवून ठेवण्याची किमया तिने साधली आहे. कहानी सुपरडुपर हिट ठरला आहे. आणि पुढच्या आठवड्यात नवा सिनेमा रिलीज होत नसल्याने कहानीची दमदार आगेकुछ चालुच राहिल अशी चिन्हं आहेत.
First Published: Monday, March 12, 2012, 08:57