बेबोसाठी आयपीएलने केले २० लाख रुपये खर्च - Marathi News 24taas.com

बेबोसाठी आयपीएलने केले २० लाख रुपये खर्च

www.24taas.com, मुंबई
 
एजंट विनोदने जरी बॉक्स ऑफिसवर फारशी चमकदार कामगिरी केली नसली तरी करिना कपूरला मात्र प्रचंड मागणी आहे. आज रात्री चेन्नईत आयपीएलच्या सिरीजच्या शुभारंभ सोहळ्याला तिनं हजेरी लावावी यासाठी आयोजकांनी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. बेबो गेली काही दिवस एका जाहिरातीच्या शुटसाठी बँकॉकमध्ये आहे आणि तिचं शेड्युल इतकं व्यस्त आहे की ती आयपीएलच्या कार्यक्रमासाठी काही तासच हजेरी लावू शकते.
 
 
पण अद्याप तिचं शुट पूर्ण होणं बाकी असल्याने तिला कार्यक्रमानंतर बँकॉकला परतणं आवश्यक आहे. त्यामुळे आयोजकांनी खास बेबोसाठी बँकॉक ते चेन्नई चार्टड विमानाची व्यवस्था केली आहे. आयपीएलचा शुभारंभ सोहळा आटोपल्यानंतर बेबो त्याच विमानाने बँकॉकला परतणार आहे. बेबोच्या या ट्रीपचा खर्च आहे तब्बल वीस लाख रुपये. पण आयोजकांना बेबोचा स्टेज परफॉर्मन्स महत्वाचा असल्याने त्यांनी पैशांचा विचार केलेला नाही.  बेबोला काहीही कमी पडू नये आणि तिचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी आयोजकांनी कसलीही कसर ठेवलेली नाही, असं तिच्या प्रवक्त्याने सांगितलं.
 
बेबो बॉडीगार्ड, ३ इडियटस आणि रा-वनच्या गाण्यांवर परफॉर्मन्स सादर करणार आहे. आयपीएलच्या शुभारंभ सोहळ्याला करिना व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, प्रियंका चोप्रा, सलमान खान आणि पॉप आयकॉन कॅटी पेरी देखील हजेरी लावणार आहेत.
 
 

First Published: Tuesday, April 3, 2012, 19:10


comments powered by Disqus