Last Updated: Sunday, April 22, 2012, 21:31
www.24taas.com, मुंबई गेले काही दिवस शाहीद कपूरच्या मागे लागलेल्या मुलीचा पत्ता अखेर लागला आहे. दिवंगत अभिनेते राजकुमार यांची मुलगी वास्तविकता हिच ती मुलगी होय. त्यामुळेच इतके दिवस शाहीदने तिचं नाव सांगायला नकार दिला होता, पण परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की, शाहिदला पोलिसांमध्ये तक्रार करण्याशिवाय पर्याय उरला नाही.
शाहीदच्या मॅनेजरने यासंदर्भात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. रात्री अपरात्री किंवा कधी कधी पहाटे ३ वाजताही ‘ती’ मुलगी शाहीदचा पाठलाग करत राहायची, असं तक्रारीत सांगण्यात आलं होतं. कधी कधी शाहीदचं दारही वाजवत राहायची. ही मुलगी वास्तविकताच होती. वास्तविकता स्वतःला शाहिदची सर्वात मोठी फॅन मानायची. काही वर्षांपूर्वी श्यामक दावरच्या डांस क्लासमध्ये ती शाहिदला भेटली होती. तेव्हापासूनच ती शाहीदच्या मागे लागली होती. त्यामुळेच, शाहिद यारी रोडला ज्या क्लासिक अपार्टमेंटमध्ये राहातो, त्याच अपार्टमेंटमध्ये तिनेही घर घेतलं.
वास्तविकताने २००६ मध्ये रीलीज झालेल्या ८ : शनी सिनेमातही काम केलं होतं. पण, तो सिनेमा सपाटून आपटला होता. वास्तविकता सतत शाहिदचा जाण्या-येण्याचा रस्ता अडवून ठेवायची. सारखी त्याला आकर्षित करायचा प्रयत्न करायची. पोलीस आता वास्तविकताचा शोध घेत होती.
First Published: Sunday, April 22, 2012, 21:31