Last Updated: Friday, May 11, 2012, 13:31
www.24taas.com, औरंगाबाद गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'अजिंठा' चित्रपटाच्या प्रदर्शनाला कोणतीही स्थगिती दिली नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आज शुक्रवारी स्पष्ट केले. त्यामुळे या चित्रपटाचा प्रदर्शनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
नितीन चंद्रकांत देसाई यांच्या या चित्रपटाला बंजारा समाजाने विरोध केला होता. सेन्सॉर बोर्डाच्या समितीतील सदस्य संजीवकुमार राठोड यांनीदेखील चित्रपटातील काही दृश्यांना हरकत घेतली होती. त्यानंतर 'अजिंठा'चे निर्माते देसाई यांनी पुनर्परिक्षण समितीकडे धाव घेतली होती. समितीने हा चित्रपट पाहून त्याला हिरवा कंदील दाखविला होता.
बंजारा समाजाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ जून रोजी होणार असल्याने तृतात नितीन देसाई यांच्या 'अजिंठा'ला दिलासा मिळाला आहे.
First Published: Friday, May 11, 2012, 13:31