Last Updated: Tuesday, August 28, 2012, 11:59
www.24taas.comगेल्या वर्षी दिवाळीत शाहरुख खानचा रा.वन प्रदर्शित झाला होता. तशी दरवर्षी दिवाळी ही शाहरुखसाठी चांगलीच ठरते. पण यावर्षी दिवाळीत शाहरुखला तगडी स्पर्धा द्यायला अजय देवगण उतरला आहे. शाहरुख खान आणि अजय देवगण यांच्यातलं शीतयुद्ध जगप्रसिद्धच आहे. काजोल शाहरुखची जवळची मैत्रीण आणि अजयची पत्नी असली, तरी ती देखील कधी या दोघांमध्ये समेट घडवू शकली नव्हती. शाहरुख खानच्या प्रोडक्शनच्या काल सिनेमात जेव्हा अजयने काम केलं, तेव्हाही बऱ्याच जणांना आश्चर्य वाटलं होतं. पण आता शाहरुख आणि अजय तोडीस तोड बनले आहेत.
गेल्या वर्षी शाहरुखच्या रा.वन, डॉन-2 आणि अजयच्या गोलमाल-3, सिंघम या सिनेमांनी 100 कोटींचा गल्ला कमावला होता. अजय देवगणच्या यावर्षीच आलेल्या बोलबच्चननेही 100 कोटी कमावले. त्यामुळे शाहरुख खानला अजय देवगणची स्पर्धा आहे. दिवाळीमध्ये शाहरुख खानचा यश चोप्रा दिग्दर्शित सिनेमा प्रदर्शित होत आहे, तर अजय देवगणचा सन ऑफ सरदार रिलीज होणार आहे.
सलमान खान गेले 2 वर्ष बॉक्स ऑफिसवर कमाईचं हमखास नाव बनलं आहे. ऋतिकनेही आपल्या अभिनयाने निर्मात्यांचं आपल्याकडे लक्ष वेधून घेतलं आहे. अक्षय कुमार पुन्हा फॉर्मात आला आहे. त्यानेही यावर्षी दोन सिनेमे ब्लॉकबस्टर दिले आहेत. त्यामुळे आपलं स्टारपद टिकवून ठेवणं शाहरुखसाठी कठीण झालं आहे. यासाठी त्याला पुन्हा एक दणदणीत हिट सिनेमा द्यावा लागणार आहे. यावर्षी शाहरुखचा दिवाळीत रिलीज होणारा एकच सिनेमा असल्यामुळे यावरच शाहरुखच्या सगळ्या अपेक्षा आहेत. जर सन ऑफ सरदारने या सिनेमाला मागे टाकलं, तर मात्र शाहरुखच्या सुपरस्टारपदाला नक्की सुरूंग लागेल. तेव्हा दिवाळी यंदा नक्की कुणाची ते पाहाणं सबंध इंडस्ट्रीसाठी औत्सुक्याचं आहे.
First Published: Tuesday, August 28, 2012, 11:59