Last Updated: Friday, September 21, 2012, 10:11
www.24taas.com, सिडनी ऑस्ट्रेलियाचा धुवाँधार सलामीवीर खेळाडू मॅथ्यू हेडन यानं गुरुवारी संपूर्ण क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीय. तसंच तो ऑस्ट्रेलियातील स्थानिक टी२०मध्येही सहभागी होणार नाही. तो ब्रिस्बेन हिट संघाकडून टी२० खेळत होता.
हेडननं कसोटी क्रिकेटमधून याआधीच म्हणजे २००९ साली निवृत्ती घेतली होती. त्यानंतर आयपीएलमध्ये २०१० साली तो चेन्नई संघाकडूनही खेळला होता. त्यानंतर तो ब्रिस्बेन संघाकडून २०११-१२ साली ऑस्ट्रेलियातील स्पर्धेत खेळत होता. ऑस्ट्रेलियात आयोजित करण्यात आलेल्या स्थानिक टी२० मध्येही सहभाग नोंदविणार होता. पण, चाळीस वर्षीय हेडननं बराच काळ चर्चा केल्यानंतर क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची निर्णय जाहीर केलाय. हेडनने १०३ कसोटी सामन्यांत ३० सेन्च्युरीजसह ८, ६२५ रन्स केलेत. तसंच तो ऑस्ट्रेलियासाठी १६१ एकदिवसीय सामनेही खेळलाय. यामध्ये त्याने ६,१३३ रन्स नोंदवलेत. टी-२० स्पर्धांमध्ये ५० सामन्यांत त्यानं १,६१२ रन्सची बरसात केलीय.
‘बिग बॅश लीग’ या मानाच्या स्पर्धेसाठी आणि आपल्या ब्रिस्बेन हीट संघासाठी वेळ देणार असल्याचे हेडननं म्हटलंय. आपली इनिंग संपवताना अवघड वाटतंय पण पुढच्या पिढीला संधी देण्यासाठी हा कठोर निर्णय घेतल्याचं त्यानं म्हटलंय. पण यासोबतच मुलांनाही वेळ देता येईल म्हणून तो खूश आहे.
First Published: Friday, September 21, 2012, 10:11