पोलार्ड स्टार्कच्या भांडणाचा दोन्ही संघांना दंडKieron Pollard, Mitchell Starc fined for ugly spat

पोलार्ड स्टार्कच्या भांडणाचा दोन्ही संघांना दंड

पोलार्ड स्टार्कच्या भांडणाचा दोन्ही संघांना दंड
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

आयपीएल ७च्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क यांना दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर षटकांची गती संथ राखल्याबद्दल दोन्ही संघांच्या कर्णधारांसह खेळाडूंवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

मंगळवारी वानखेडे स्टेडियमवरील सामन्यातील पहिल्या डावातील १७व्या षटकांत पोलार्डनं एक चेंडू काही कारणास्तव न खेळण्याचं ठरवलं होतं. चेंडू टाकण्यापूर्वी त्यानं हा निर्णय घेतला, पण यापूर्वी बराच वेळखाऊपणा पोलार्डनं केल्यानं स्टार्क वैतागला आणि त्यानं पोलार्डच्या दिशेनं चेंडू मारला. यानंतर पोलार्डही भडकला आणि त्यानं रागाच्या भरात बॅट भिरकावली. त्या वेळी दोन्ही कर्णधारांसह पंचांनी मध्यस्थी केली आणि हा प्रकार मिटवला.

या प्रकरणामुळं आयपीएलच्या नियमावलीनुसार खेळभावनेला धोका पोहोचला असून दोन्ही खेळाडूंवर नियमावलीतील दुसऱ्या स्तरानुसार कारवाई करण्यात आली आहे. यानुसार पोलार्डच्या सामन्याच्या मानधनापैकी ७५ टक्के आणि स्टार्कच्या मानधनापैकी ५० टक्के रक्कम दंड म्हणून कापण्यात येणार आहे.

त्याचबरोबर षटकांची गती संथ राखल्याबद्दल मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला २४ लाख रुपयांचा आणि विराट कोहलीला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सच्या संघातील अन्य खेळाडूंनाही दंड ठोठावण्यात आला आहे. सहा लाख रुपये किंवा सामन्याच्या मानधनातील २५ टक्के रक्कम यांच्यापैकी कमी असलेली रक्कम दंड म्हणून ठोठावण्यात येणार आहे.

बंगळुरूचा वेगवान गोलंदाज वरुण अॅरोनवर गणवेशाच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी नियमावलीतील दुसऱ्या स्तरानुसार कारवाई करण्यात आली आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 8, 2014, 17:10


comments powered by Disqus