Last Updated: Wednesday, March 20, 2013, 12:42
www.24taas.com, नवी दिल्ली टीम इंडियाचा धडाडीचा बॅटसमन शिखर धवन याला हाताच्या बोटाला झालेल्या जखमेच्या कारणास्तव नवी दिल्लीत होणाऱ्या टेस्टमधून बाहेर पडावं लागलंय. धवनच्या जागी सुरेश रैनाला टीममध्ये संधी मिळालीय.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथी आणि शेवटची टेस्ट मॅच शुक्रवारी नवी दिल्लीत रंगणार आहे. मात्र, नवी दिल्लीत म्हणजेच आपल्या घरच्या मैदानावर शिखर धवनला खेळता येणार नाही. मोहालीत तिसऱ्या टेस्ट मॅचच्या चौथ्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना धवनचा तोल गेला आणि त्याच्या डाव्या हाताला दुखापत झालीय. त्यामुळे त्याला तब्बल सहा आठवड्यांपर्यंत टीममधून बाहेर राहावं लागणार आहे.
बीसीसीआयनं दिलेल्या माहितनुसार, चार मॅचच्या श्रृंखलेत सुरुवातीला संधी न मिळालेल्या गौतम गंभीरला टीममध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण जॉन्डीसच्या कारणास्तव तोही या मॅचमध्ये खेळू शकणार नाहीय. त्यामुळे निवड समितीनं धवनच्या जागी सुरेश रैनाचं नाव निश्चित केलंय. गौतम गंभीरच्या रक्ताची चाचणी करण्यात आली होती. त्याचा रिपोर्ट येण्याची निवड समिती वाट पाहत होती. त्यामुळे हा निर्णय जाहीर करायला वेळ लागला, असं बीसीसीआयनं म्हटलंय.
चौथ्या टेस्ट मॅचसाठी आता भारतीय टीम पुढीलप्रमाणे असेल :- महेंद्रसिंग धोनी (कॅप्टन), मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रविंद्र जडेजा, हरभजन सिंग, आर. अश्विन, प्रज्ञान ओझा, भुवनेश्वर कुमार, अजिंक्य राहणे, अशोक डिंडा, सुरेश रैना आणि इशांत शर्मा
First Published: Wednesday, March 20, 2013, 12:42