भारत-पाक मालिकेला गावस्करांचा विरोध - Marathi News 24taas.com

भारत-पाक मालिकेला गावस्करांचा विरोध

www.24taas.com, नवी दिल्ली
मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्तान सहकार्य करत नसताना पाकिस्तानसोबत वन डे मालिका खेळविण्यास माजी कसोटी कर्णधार सुनील गावस्कर यांनी विरोध केला आहे. मुंबई हल्लाच्या तपासात पाकचे सहकार्य नसताना अशी मालिका खेळविण्यावर गावस्कर यांनी टीकेची झोड उठवली आहे.
 
मुंबईवर 2008 मध्‍ये झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यानंतर दोन्‍ही देशांमध्‍ये तणाव निर्माण झाला. त्‍यानंतर क्रिकेट मालिका खेळविण्‍यात आली नाही. दोन्‍ही संघ केवळ आंतरराष्‍ट्रीय स्‍पर्धेतच खेळले. त्‍यात विश्‍वचषक, आशिया चषक, टी20 विश्‍वचषक अशा स्‍पर्धांचा समावेश होता. गेल्‍या वर्षी मोहाली येथे दोन्‍ही संघ विश्‍वचषकाच्‍या उपांत्‍य सामन्‍यात आमनेसामने आले होते.
 
मुंबईकर म्हणून मला वाटते की, पाक तपासकार्यात सहकार्य करीत नसल्याने अशा प्रकारची मालिका घेणे, फार घाईचे ठरेल, असे गावस्कर यांनी सांगितले. तसेच भारत भविष्यात भरपूर क्रिकेट खेळणार आहे, त्यामुळे अशी मालिका खेळविणे, भारतीय खेळाडूंवर दबाव टाकण्यासारखे होईल, असेही त्यांनी सांगितले.
 
भारत आणि इंग्लंड संघांमधल्या वन डे सामन्यांच्या मालिकेला ११ जानेवारीपासून सुरुवात होईल. त्यामुळे २३ डिसेंबर ते ११ जानेवारी वीस दिवसांच्या कालावधीत भारत आणि पाकिस्तान संघांमधली तीन वन डे सामन्यांची मालिका खेळवता येईल, यावर भारतीय आणि पाकिस्तानी क्रिकेट बोर्डात सहमती झाल्याचं वृत्त आहे. आता दोन्ही बोर्डांचे पदाधिकारी या मालिकेला भारत सरकारकडून हिरवा कंदील मिळण्याची प्रतीक्षा करत आहेत.
 

First Published: Monday, July 16, 2012, 20:19


comments powered by Disqus