पर्थमध्ये टीम इंडियाचं काय होणार? - Marathi News 24taas.com

पर्थमध्ये टीम इंडियाचं काय होणार?

www.24taas.com, सिडनी
 
सिडनी टेस्टमध्ये भारतीय टीमला पाहाव्या लागलेल्या मानहानीकारक पराभवास कारणीभूत ठरलं ते बॅट्समन्सचं कचखाऊ धोरण आणि बॉलर्सचा स्वैर मारा. संपूर्ण सिडनी टेस्टमध्ये भारतीय बॉलर्सना केवळ चारच विकेट्स घेता आल्या आणि त्याकरता त्यांना प्रचंड रन्स खर्ची घालावे लागले सलग दोन पराभवानंतर कॅप्टन धोनीने पर्थ टेस्टमधुन सीरिजमध्ये परतण्याचे मनसुबे आखलेत खरे, पण टीम इंडियाचा सध्याचा परफॉर्मन्स पाहता धोनी तोंडावर पडण्याचीच चिन्ह अधिक आहेत.
 
मायकल क्लार्क, मायकल हसी, रिकी पॉन्टिंग या ऑस्ट्रेलियाच्या तिकडीने सिडनी टेस्टमध्ये भारतीय टीमला गुडघे टेकण्यास लावलं...या तिघांच्या धडाक्यापुढे भारतीय बॉलिंग अक्षरश: लाचार दिसत होती. क्लार्क, हसी, पॉन्टिंगच्या बॅटचा तडाखा केवळ फास्ट बॉलर्सनाच नव्हे तर स्पिन अटॅकलाही बसला. भारतीय बॉलिंगच्या लाचारीचा अंदाज याच गोष्टीवरून येऊ शकतो की पहिल्या दिवशी 3 कांगारूंना आऊट करणाऱ्या टीम इंडियाच्या बॉलर्सना टेस्टच्या दुसऱ्या दिवशी केवळ एकच विकेट घेता आली. तर तिसऱ्या दिवशी एकही विकेट मिळाली नाही आणि या चार विकेट्सकरता भारतीय बॉलर्सनी सहाशेहुन अधिक रन्स खर्ची केले.
 
परदेशी धर्तीवरील परफॉर्मन्समध्ये भारतीय टीमचा आलेख सध्या वेगाने खाली घसरतोय. इंग्लंड दौऱ्यावर तर भारताच्या फ्लॉप आणि दिशाहीन बॉलिंगमुळे व्हाईटवॉश मिळाला होता. त्याचाच ऍक्शन रिप्ले आता ऑस्ट्रेलियात पाहायला मिळतोय की काय अशी भीती भारतीय फॅन्सना सतावत आहे. मेलबर्न आणि सिडनी टेस्टमध्ये पराभवाची नामुष्की ओढावून घेणाऱ्या टीम इंडियापुढे पर्थ टेस्टमध्ये स्वत:ची लाज वाचवण्याचं आव्हान असणार आहे.
 
पर्थवरील ऑस्ट्रेलियाचा आतापर्यंतचा इतिहास पाहता भारताला विजयाकरता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार हे निश्चित आहे. ४ वर्षांपुर्वी भारतीय टीमने ऑस्ट्रेलियाचा बालेकिल्ला असणाऱ्या याच पर्थवर कांगारूंना अस्मान दाखवण्याची किमया केली होती. पण त्याच कामगिरीची पुनरावृत्ती यावेळी यंगिस्तान करेल का असा यक्षप्रश्न क्रिकेट तज्ज्ञांसह भारतीय फॅन्ससमोर आहे. सिडनी टेस्टमधील भारतीय स्वैर माऱ्यामुळे टीम मॅनेजमेंटसमोरील चिंता वाढल्या आहेत आणि म्हणुनच पहिल्या दोन टेस्टमध्ये झालेल्या कामगिरीची पुनरावृत्ती टाळून पर्थ टेस्टमध्ये भारताला कमबॅक करून देण्याचं आव्हान भारतीय स्पीड गनसमोर असणार आहे.
 
 

First Published: Saturday, January 7, 2012, 19:34


comments powered by Disqus