युवराज करणार मेमध्ये मैदानावर ‘राज’! - Marathi News 24taas.com

युवराज करणार मेमध्ये मैदानावर ‘राज’!

www.24taas.com, नवी दिल्ली
अमेरिकेत केमोथेरपी घेत असलेला भारतीय स्टार बॅटसमन युवराज सिंग याला फुफुसांचा कॅन्सर नसून त्याच्या फुफुसांमध्ये एक ट्युमर आहे. हा ट्युमर काढणे शक्य आहे. त्यामुळे युवराज सिंग मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मैदानात खेळण्यास सज्ज होईल, असा विश्वास युवराजवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे.
युवराजला कॅन्सर असल्याचा खुलासा झाल्यानंतर अनेक तर्कवितर्कांना उधाण आले होते. या तर्कवितर्कांना पूर्णविराम देत मॅक्स साकेतचे डॉक्टर नीतेश रोहतगी यांनी सांगितले की, युवराजला कॅन्सर आहे पण तो फुफुसांचा नाही, पण त्याच्या फुफुसांमध्ये एक गाठ आहे.
एका पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना रोहतगी म्हणाले, युवराज अमेरिकेत कॅमोथेरेपी घेत आहेत. त्यांना फुफुसांचा कॅन्सर नाही. त्यांच्या फुफुसांमध्ये एक ट्युमर आहे. ज्याला एक्स्ट्रागॉनाडेल सेमिनॉमा म्हटले जाते. ही गाठ दोन फुफुसांच्या  मध्ये आहे.  हा असाध्य आजार नाही. यामुळे युवराजच्या करिअरवर परिणाम होणार नाही, असेही रोहतगी यांनी स्पष्ट केले आहे.
 
युवराजने जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात डॉक्टरांचा सल्ला घेतला होता. त्यानंतर तो कॅमोथेरपीसाठी अमेरिकेला रवाना झाले. नऊ आठवड्यांच्या कॅमोथेरपीचा सध्या तिसरा आठवडा सुरू आहे.
 
युवराज कधीपर्यंत मैदानात पुनरागमन करणार या प्रश्नावर डॉ. रोहतगी म्हणाले, की युवराजला ठीक व्हायला, १० आठवडे लागतील. त्यामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तो खेळताना दिसेल.

First Published: Monday, February 6, 2012, 18:24


comments powered by Disqus