बीसीसीआयचा द्रविडला सलाम - Marathi News 24taas.com

बीसीसीआयचा द्रविडला सलाम

www.24taas.com, बंगळुरू
 
टीम इंडियाचा 'द वॉल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुल द्रविडचा बीसीसीआयकडून आज मुंबईत सत्कार करण्यात आला. यावेळी त्यानं कारकिर्दीतल्या काही आठवणी ताज्या करत सहकाऱ्यांच्या प्रेमाबद्दल आभार व्यक्त केले. या आठवणी सांगताना त्याला अनेकदा गहिवरून आलं. कुटुंबाविषयी त्याच्या मनातल्या भावनाही त्यानं बोलून दाखवल्या.

या प्रसंगी बोलताना राहुलने आपले कोच, पाक, पत्नी तसेच संघातील सहकाऱ्यांचे आभार मानले.  क्रिकेटमुळे मला माझ्या स्वप्नातलं आयुष्य जगायला मिळालं, भारतीय क्रिकेटमधील काही अविस्मरणीय खेळी खेळायला मिळाल्या, त्याच्या आठवणी राहुलने काढल्या.  भारतीय क्रिकेटची परंपरा आम्ही चालवली आणि ती पुढेही चालूच राहील याची ग्वाही दिली. भारतीय क्रिकेटचा गौरवशाली प्रवास पाहाण्याची संधी मिळाली आणि त्याचा साक्षीदार ठरलो याबद्दल असलेला सार्थ अभिमानही राहुलच्या बोलण्यातून यावेळी व्यक्त होत होता. आपण आता क्रिकेट सोडलं तरी भारतीय संघाच्या मॅचेस आपण  आवडीने बघत राहाणार असंही राहुल द्रविड म्हणाला. या प्रसंगी राहुल द्रविड खूप भावूक झाला होता.

 


राहुल द्रवीडने ओपनिंग बॅट्समन असो की विकेट किपर सर्वच जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्याचं यावेळी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं सांगितलं. द्रविडसोबत घालवलेला प्रत्येक क्षण काही तरी शिकवणारा होता, असं धोनी यावेळी म्हणाला. तर, ईडन गार्डनवर राहुलनं लक्ष्मणबरोबर केलेली पार्टनरशिप कायमच लक्षात राहील, असं माजी कॅप्टन सौरव गांगुली यानं म्हटलंय. द्रवीड बरोबर खेळणं हे भाग्यच होतं, असे भावस्पर्शी उद्गारही त्यानं काढले.
 

First Published: Tuesday, March 27, 2012, 23:43


comments powered by Disqus