पुणेकरांसाठी सचिन देणार खास भेट... - Marathi News 24taas.com

पुणेकरांसाठी सचिन देणार खास भेट...

www.24taas.com, पुणे

जगभरातील क्रिकेटपटूंच्या सह्या यांनी खेळाच्या मैदानावर वापरलेलं साहित्य इतकच नाही तर त्यांच्या अविस्मरणीय आठवणींची साक्ष देणारं संग्रहालय पुण्यात साकरलं आहे. क्रिकेट रसिक रोहन पाटे यांनी अथक प्रयत्नांतून देशातील अशा प्रकारचं पहिलच संग्रहालय पुण्यात उभारण्यात आलं आहे. ब्ले़ड्स ऑफ ग्लोरी नावाच्या संग्रहालयाचं उद्धाटन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते होणार आहे. संग्रहालयाच्या हॉलमध्ये प्रवेश करताच हा भारतीय संघ विश्वविजयी होण्याच्या आठवणींना उजाळा मिळतो.
 
१९८३ चा विजेता संघ तसंच २०११ चा विजेता संघ या ठिकाणी पहायला मिळतो. या दोन्ही सामन्यातील खेळाडुंनी स्वाक्षरी केलेल्या बॅट्सही इथे आहेत. आजवर ज्या ज्या संघांनी विश्वचषक जिंकला आहे त्या संघांच्या खेळाडुंच्या स्वाक्षऱ्या असणाऱ्या बॅट्स आयसीसीने ड्रीम टीम म्हणून निवडलेल्या कसोटी तसंच एक दिवसीय संघातील खेळाडुंच्या स्वाक्षऱ्या असणाऱ्या बॅट्स विश्वचषक विजेत्या संघाच्या कर्णधारांनी स्वाक्षरी केलेली बॅट त्याचप्रमाणे कसोटी तसंच एक दिवसीय क्रिकेटमध्ये ३००,४००,५०० बळी घेतलेल्या खेळाडुंनी स्वक्षरी केलेले बॉल्स. क्रिकेट पटूंच्या स्वाक्षऱ्यांचा असा अमुल्य ठेवा याठिकाणी प्रदर्शित करण्यात आला आहे.
 
जगभरातील नामवंत क्रिकेटपटूंच्या बॅट तसंच खेळाच्या मैदानावर त्यांनी वापरलेलं साहित्यही संग्रहालयात आहे. सचिनची बॅट मिळाली आणि रोहन पाटे यांनी क्रिकेट संग्रहालय साकारल्याचा ध्यास घेतला त्याला आज जिवंत रुप आलं आहे. जगातील महान खेळाडुंच्या आठवणींशी निगडीत विषेश दालन या संग्रहालयात आहे. सर डॉन ब्रॅडमन, सर गॅरी सोबर्स यांच्यासह सचिन तेंडुलकर, राहुल द्रवीड, रिकी पॉंटींग यांच्या कामगीरीची झलकही दालनात पहायला मिळते. सचिन तेंडुलकरसाठी तर एक स्वतंत्र दालन बनवण्यात आलं आहे. क्रिकेट रसिकांना क्रिकेटमधिल विक्रमांची माहिती देतानाच एक आगळा आनंद हे संग्रहालय पाहताना मिळतो.
 
क्रिकेटपटूंनी वापरलेली बॅट असो वा एखाद्याचा स्वेटर अशा गोष्टी गोळा करण सहज सोपं नाही पुण्यात संग्रहालयाच्या रुपाने या गोष्टी एकाच छताखाली आल्य़ा आहेत. पुण्याच्या लौकीकात भर घालणारी ही घटना आहे. या अनोख्या संग्रहालयाचं उद्घाटन सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते येत्या २ मे रोजी होणार आहे.
 
 
 

First Published: Saturday, April 28, 2012, 23:42


comments powered by Disqus