पहिली वन-डे आज कटकच्या मैदानात... - Marathi News 24taas.com

पहिली वन-डे आज कटकच्या मैदानात...

झी २४ तास वेब टीम, कटक
 
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामधील पहिली वन-डे मॅच कटकमध्ये आज रंगणार आहे. वीरेंद्र सेहवाग या नव्या कॅप्टनच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडिया विंडिजशी मुकाबला करणार आहे. सिनियर क्रिकेटपटूंच्या अनुपस्थितीत युवा क्रिकेटपटूंवर भारताची मदार असणार आहे. तर दुसरीकडे विंडिज टीम वन-डेमध्ये भारतीय टीमला कडवी टक्कर देण्यास आतूर असेल.
 
मुंबई टेस्ट नाट्यमयरित्या ड्रॉ करण्यात वेस्ट इंडिजची टीम यशस्वी झाली. आणि धोनीब्रिगेडचं विंडिजला व्हाईट वॉश देण्याचं स्वप्न भंग पावलं. आता, वन-डे सीरिजमध्ये नवा भिडू नवा डाव घेऊन कॅप्टन वीरेंद्र सेहवाग मैदानात उतरणार आहे. महेंद्रसिंग धोनीला या सीरिजसाठी विश्रांती दिली असल्यामुळे कॅप्टन्सीची धुरा धडाकेबाज बॅट्समन सेहवाग सांभाळणार आहे. त्यातच मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे युवा ब्रिगेडवर भारताला विजयश्री मिळवून देण्याची जबाबदारी असेल. ओपनिंला वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर ही जोडी टीमला शानदार ओपनिंग देण्यास सज्ज आहे.
 
मिडल ऑर्डरमध्ये अजिंक्य रहाणे, विराट कोहली सुरेश रैना आणि टीममध्ये कमबॅक करणाऱ्या रोहित शर्मावर भिस्त असणार आहे. रोहितला इंग्लंड दौऱ्यामध्ये दुखापत झाली होती. त्यानंतर स्थानिक क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर तो टीममध्ये परततो आहे. विराट कोहलीनं टेस्टमध्ये जबरदस्त फॉर्म दाखवला आहे. सुरेश रैनाही मिडल ऑर्डरमध्ये सर्वात अनुभवी बॅट्समन ठरणार आहे. अजिंक्य रहाणेची बॅट इंग्लंडविरुद्धच्या वन-डे सीरिजमध्ये चांगलीच तळपली होती. मात्र त्याला विंडिविरुद्ध मिडल ऑर्डरमध्ये खेळाव लागणार आहे. बॉलर्समध्ये आर. अश्विनचा फॉर्म स्वप्नवत वाटावा असाच आहे. टेस्टमध्ये 'मॅन ऑफ द सीरिज'चा मानकरी ठरलेला हा बॉलर वन-डेमध्ये विंडिज बॅट्समनसाठी धोकादायक ठरणार आहे.
 
प्रविण कुमार, उमेश यादव, वरुण ऍरॉन आणि विनय कुमारवर फास्ट बॉलिंगची जबाबदारी असेल. दुसरीकडे विंडिज टीम वन-डे सीरिजमध्ये भारताला पराभवाचा धक्का देण्यासाठी प्रयत्नशील असेल. डॅरेन ब्राव्हो टेस्ट सीरिजमध्ये भारतीय टीमसाठी डोकेदुखी ठरला होता. त्यामुळे भारतीय बॉलर्सला ब्राव्हो नावाच्या प्रश्नाचं उत्तर शोधाव लागणार आहे. धोकादायक कायर पोलार्ड त्यांच्या टीममध्ये असल्यानं त्यालाही बॉलर्सना रोखावं लागणार आहे. अस असलं तरी, डॅरेन सॅमीच्या टीमला भारतीय टीमला पराभूत करण्यासाठी चांगलेच कष्ट करावे लागणार हे निश्चित

First Published: Tuesday, November 29, 2011, 03:07


comments powered by Disqus