Last Updated: Monday, June 17, 2013, 07:18
www.24taas.com, झी मीडिया, जालना जालना जिल्ह्यातील विजय झोलची भारताच्या १९ वर्षांखालील वयोगटाच्या संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर जालना आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.
ऑस्ट्रेलियात ३० जूनपासून १९ वर्षांखालील संघांच्या तिरंगी मालिकेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यात यजमान ऑस्ट्रेलियासह भारत आणि न्यूझीलंड संघांचा समावेश आहे.
या मालिकेसाठी बीसीसीआयच्या ज्युनियर निवड समितीने भारताचा संघ नुकताच जाहीर केला असून, भारताच्या १९ वर्षांखालील संघाचं नेतृत्त्व विजय झोलच्या हाती सोपवण्यात आलं आहे. तर राजस्थान रॉयल्सकडून यंदाची आयपीएल गाजवणारा संजू सॅमसनला भारताच्या युवा संघाचं उपकर्णधारपद देण्यात आलं आहे.
जालन्याचा विजय झोल मधल्या फळीतला डावखुरा फलंदाज आहे. रणजी ट्रॉफीत विजय महाराष्ट्राचं प्रतिनिधित्त्व करतो. डिसेंबर २०११ मधल्या कूचबिहार ट्रॉफी सामन्यात विजय झोलने महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील संघाकडून आसामविरुद्ध खेळताना विजयन ४६७ चेंडूंमध्ये नाबाद नाबाद ४५१ धावांची खेळी केली होती. गेल्या वर्षी १९ वर्षांखालील वयोगटाचा विश्वचषक जिंकणाऱ्या भारताच्या युवा संघातही त्याचा समावेश होता. त्या विश्वचषकात विजयने सहा सामन्यांमध्ये २५.१६च्या सरासरीने १५१ धावा फटकावल्या होत्या.
ऑस्ट्रेलियातल्या तिरंगी मालिकेसाठी विजय झोलची भारताच्या १९ वर्षांखालील संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आणि जालन्यात आनंदोत्सव साजरा झाला. विजयच्या घरी त्याच्या नातेवाईकांनी आणि मित्रपरिवाराने फटाके फोडून आणि मिठाई वाटून आपला आनंद व्यक्त केला.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, June 17, 2013, 07:11