ITI कॉलेजांचा फायदा... भ्रष्ट शासकीय अधिकाऱ्यांना! benefits from ITI colleges to Corrupt Officers

ITI कॉलेजांचा फायदा... भ्रष्ट शासकीय अधिकाऱ्यांना!

 ITI कॉलेजांचा फायदा... भ्रष्ट शासकीय अधिकाऱ्यांना!
www.24taas.com, पालघर

शासनानं तळागाळातील विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील प्रशिक्षण मिळावं यासाठी प्रत्येक तालुक्यात आयटीआय कॉलेज सुरु केलीत. मात्र याचा फायदा आदिवासी विद्यार्थांना न होता शासकिय अधिका-यांनाचं होत असल्याचं चित्र सध्या विक्रमगडमध्ये दिसतंय.

ठाणे जिल्ह्यातल्या विक्रमगड या आदिवासीबहुल अशा तालुक्यात शासनानं तळागाळातल्या विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण देण्याच्या उद्देशानं आयटीआय अर्थात औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरु केलीय. मात्र याठिकाणी विद्यार्थ्यांचं भवितव्य उज्वल करण्याऐवजी इथल्या शासकीय कर्मचा-यांनी आपलंच भलं कसं होईल याकडं पाहिलंय. 2009-10 या वर्षात आयटीआयमध्ये वस्तूखरेदीच्या नावाखाली तब्बल 58 लाखांचा अपहार झाल्याचं समोर आलंय. माहिती अधिकारातून हि माहिती समोर आलीय.


तत्कालीन प्राचार्य एम.पी. सोनावणे, भांडारपाल पी. बी. देशमुख आणि पुरवठादार यांनी संगनमतानं वस्तूंची बनावट बिलं मंजूर करुन घेतली. मात्र या वस्तू आयटीआय कॉलेजमध्ये आणल्याच नसल्याचं समोर आलंय. सहाय्यक तांत्रिक संचालक विजय पंडीत यांच्या अध्यक्षतेखालच्या त्रिस्तरीय समितीनं अपहारप्रकरणी चौकशी करुन व्रिक्रमगड पोलिसांत केलेल्या तक्रारीनुसार २२ जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय.

आदिवासी भागातल्या मुलांना औद्योगिक प्रशिक्षण देवून त्यांच्या हाताला रोजगार मिळवून देण्याचा शासनाचा हेतू चांगला असला तरी भ्रष्ट कर्मचा-यांमुळं या हेतूलाच तडा जातोय. आदिवासी विद्यार्थ्यांच्या सोयी-सुविधांचा पैसा जर सरकारी कर्मचा-यांच्या खिशात जाणार असेल तर आदिवासी भागाचा कायापालट होणार तरी कसा. असा प्रश्न निर्माण झालाय.

First Published: Wednesday, December 12, 2012, 19:48


comments powered by Disqus