महाराष्ट्रात दुष्काळाचे दशावतार!, drought in maharashtra in the month of jan

महाराष्ट्रात दुष्काळाचे दशावतार!

महाराष्ट्रात दुष्काळाचे दशावतार!
www.24taas.com, मुंबई

राज्यात दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चाललीय.. जवळपास ६ हजार २५० हून अधिक गावांना दुष्काळाचे चटके सहन करावे लागतायत. मराठवाड्यात तर दुष्काळाने शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी काढलंय. मराठवाड्यात तर दुष्काळाची अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. नदी , नाले कोरडे पडलेत. विहीरींनी तळ गाठलाय. हातपंप नावापूरते उरले आहेत. टँकरने पाणी पुरवठा केला जातोय पण तो पुरेसा नाही. चाऱ्यासाठी जनावरे तडफडू लागलीत. दुष्काळामुळे जनता हैराण झालीय. तासनतास टँकरची वाट पहावी लागतेय. औरंगाबाद जिल्ह्यातील ९ तालुक्यातील हे भीषण चित्र...

पिण्याच्या पाण्यासाठी रोज संघर्ष करावा लागतोय. जगप्रसिद्ध अजिंठा लेण्याच्या पायथ्याशी असलेल्या लेणापूरमध्ये एक हंडा पाण्यासाठी ग्रामस्तांवर जीव धोक्यात घालण्याची वेळ आलीय. शेतीची परिस्थिती काही वेगळी नाही. पाण्याआभावी शेतातलं उभ पीक डोळ्यासमोर जळून गेलंय. जितराबं जगवायची कशी असा प्रश्न बळीराजाला पडलाय. त्यामुळे जनावरांना बाजार दाखवण्यावाचून शेतकऱ्यांसमोर दुसरा पर्याय उरला नाही. पण तिथंही दुष्काळ आडवा आलाय. पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनल्यामुळे बाजारात जनावरांचे भाव पडलेत. औरंगाबादप्रमाणेच जालन्यातही दुष्काळाची छाया गडद झालीय. मंठा तालुक्यातील वैद्यवडगावातील हे चित्र दुष्काळाची कहानी सांगून जातं. इथल्या लोकांना दिवसरात्र एकच चिंता सतावते आणि तो म्हणजे पाण्याची... गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या हातपंपावर पाण्यासाठी पहाटे तीन वाजल्यापासून रांग लागते कारण, पाण्याचा हाच एकमेव स्त्रोत त्यांच्यासाठी उरला आहे. गावं ओस पडत चालली आहेत. गोठे सुने झालेत. लोक हवालदील झालेत. दुष्काळावर मात कशी करायची हाच खरा प्रश्न आहे.
महाराष्ट्रात दुष्काळाचे दशावतार!

जालना जिल्ह्यातल्या मंठा तालुक्यातील वडगावचे परमेश्वर वैद्य. सध्या त्यांना एकच चिंता सतावतंय ती त्यांच्या मुलीच्या लग्नाची... गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी प्रियंकाच्या लग्नाची तयारी सुरू केली होती. पण यंदाच्या दुष्काळानं त्यांचं स्वप्न धुळीस मिळालंय. पावसानं दगा दिल्यानं शेतात दोनदा केलेली पेरणी फुकट गेली आणि केलेला खर्चही वाया गेला. आर्थिक अडचणीमुळे मुलीच्या लग्नासाठी खर्च करायला पैसे नसल्यानं ते हवालदिल झालेत. त्याचप्रमाणं आधीच घेतलेले कर्ज परत न करता पुन्हा सावकाराकडं कर्ज कसं मागायचं, मुलीचं लग्न लांबलं तर लोकांच्या नाना प्रश्नांना काय उत्तरं द्यायची असे प्रश्न वैद्य कुटुंबीयांना पडलाय. या गावात अनेक घरांमध्ये हीच परिस्थिती आहे.

मराठवाड्याप्रमाणेच पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सोलापूर तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांना दुष्काळाचा फटका बसलाय. हंडाभर पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागतेय. नाशिक जिल्ह्यात तर दागिने गहाण ठेवण्याची वेळ दुष्काळग्रस्तांवर आलीय. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था सोलापूर जिल्ह्याची झालीय. उजनी धरण असतांनाही पाण्याचं नियोजन न केल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळाने कहर केला आहे. करमाळा, माढा, सांगोला आणि मंगळवेढ्यासह दहा तालुके दुष्काळानं होरपळत आहेत. जिल्ह्यातल्या बहुतांश विहिरी आटल्यात तर बंधारे कोरडे पडलेत. त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागतेय. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनलाय. पीकं जळून गेल्यामुळे शेतकऱ्यांपुढे संकट उभं राहिलंय. जिल्ह्यातील १५० गावं आणि १०५० वाड्या वस्त्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतोय. सोलापूर प्रमाणेच सांगली जिल्ह्यालाही दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. जिल्ह्यातील आठ तालुक्यात परिस्थिती बिटक बनली आहे. चाऱ्याअभावी जनावरं तडफडू लागली आहेत. टँकरने पाणी पुरवठा केला जातोय पण तो अपुरा आहे. २० ठिकाणी चारा छावण्या सुरु केल्या आहेत. दुष्काळामुळे काहींनी स्थलांतर केलंय तर जनावरांसाठी काहींनी चारा छावणीची वाट धरलीय.

नाशिक जिल्ह्यात तर दुष्काळानं परिसीमा गाठलीय. सिन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांवर वेठबिगारीची वेळ आलीय. दुष्काळाला तोंड देण्यासाठी घरची इभ्रत असलेलं स्त्री-धन गहाण ठेवण्याची वेळ बळीराजावर आलीय. तालुक्यातल्या हजारो शेतक-यांचे तब्बल एक क्विंटल सोने बँकेत गहाण पडलंय. विदर्भात यंदा चांगला पाऊस झाला असला तरी बुलडाण्यात मात्र सरासरीपेक्षा कमीच पाऊस झालाय. त्यामुळे शेतीचं उत्पन्न घटलंय. तर जिल्ह्यातल्या तेरा तालुक्यांमधल्या १०५५ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता प्रशासनानं व्यक्त केलीय. त्यातील सर्वाधिक १०४ गावं सिंदखेडराजा तालुक्यातले असून हा तालुका शंभर टक्के दुष्काळग्रस्त तालुका म्हणून घोषित करण्यात आलाय. उस्मानाबादमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील ७५ टक्के गावं टंचाईग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहेत. दुष्काळाचा फटका जसा बळीराजाला बसला तसाच सर्वसामान्य मोलमजुरालाही सहन करावा लागतोय.

First Published: Friday, January 11, 2013, 23:04


comments powered by Disqus