बॉलिवूडमध्ये रोमान्सचं `जान`दार पुनरागमन Jab Tak Hain Jaan review

बॉलिवूडमध्ये रोमान्सचं `जान`दार पुनरागमन

बॉलिवूडमध्ये रोमान्सचं `जान`दार पुनरागमन
www.24taas.com, मुंबई

य़श चोप्रांनी भारतीय सिनेमांना रोमान्स दिला. त्यातील निरागसता, नाट्य, गोडवा या गोष्टींनी यशजींनी हिंदी सिनेमा समृद्ध केला. त्यांच्या सिनेमांचा परिपाक ‘जब तक है जान’ मध्ये पाहायला मिळतं. रोमांसचा बादशाह शाहरुख खान याला पुन्हा एकदा रोमँटिक स्वरुपात सादर करूनच यश चोप्रांनी देह ठेवला आहे.

९७ वेळा सीमेवर जीवाची पर्वा न करता बॉम्ब डिफ्युज करणाऱ्या समर आनंद (शाहरुख खान)ची भेट वीस वर्षीय अकीरा रायशी (अनुष्का शर्मा) होते. समर तिचे प्राण वाचवतो आणि पुढे योगायोगाने तिच्या हातात त्याची डायरी येते. ही इंटर्न पत्रकार अकिरा समरची डायरी वाचू लागते आणि समरची प्रेमकहाणी सुरू होते.

तरुणपणात समरची लंडनमधील मीरा(कतरिना कैफ)शी ओळख होते. मीराला भारतीय लोकांचा तिटकारा असतो. तिला ब्रिटिश पुरूषच आवडत असतात. पण समरकडे म्युझिक शिकता शिकता दोघांमध्ये प्रेम निर्माण होतं. पण तिचं आधीच एका माणसासोबत लग्न ठरलेलं असतं. त्यामुळे उद्विग्न झालेला समर भारतात परततो आणि जीवाची पर्वा नसल्यामुळे लष्करात भरती होतो.

शाहरुखच्या संदर्भात अभिनयाचा काही प्रश्नच नाही. तो एक चांगला अभिनेता तर आहेच, शिवाय या सिनेमातली त्याची भूमिका ही त्याच्या नेहमीच्याच उत्कट प्रियकराची आहे. कतरिना कैफनेही वचनं आणि प्रेम यांच्या द्वंद्वात अडकलेल्या मुलीची भूमिका चांगली निभावली आहे. अनुष्का शर्माने नेहमीसारखाच चांगला अभिनय केला आहे. मात्र तिचा बिनधास्त ऍटिट्युड थोडा लाऊड वाटू लागतो.

यांच्यासोबतच ऋषी कपूर आणि नीतू सिंग या सदाबहार जोडीच्या वाट्याला आलेले सीन्सही प्रसन्न करणारे आहेत. अनपम खेरच्या वाट्याला फारसं काही आलेलं नाही.

दिग्दर्शनाच्या बाबतीत खरं तर काही बोलायलाच नको. यश चोप्रांसारख्या दिग्गज दिग्दर्शकाने काश्मिरमधील पेहलगम आणि लंडनचे रस्ते ज्या पद्धतीने कॅमेरावर खुलवले आहेत, त्यांचा जवाबच नाही. ए. आर. रहमानचं संगीत त्याच्या नेहमीच्या कर्तबगारीला शोभणारं नसलं, तरी श्रवणीय आहे. गुलजारांचे शब्द मात्र काव्यात्मक वाटतात. मात्र त्यांचा अजून चांगला उपयोग करून घेता आला असता.

तीन तासांचा हा सिनेमा आजच्या तरूण पिढीला लांबलचक वाटण्याची शक्यता आहे. पण रोमँटिक सिनेमांच्या, यश चोप्रांच्या, शाहरख खानच्या चाहत्यांना मात्र हा सिनेमा बघून आनंद होईल, एवढं नक्की

First Published: Tuesday, November 13, 2012, 15:43


comments powered by Disqus