३० ते ५० लाख रुपये भरा आणि डॉक्टर व्हा |, medical admission scam

३० ते ५० लाख रुपये भरा आणि डॉक्टर व्हा!

www.24taas.com, योगेश खरे, मुंबई

भ्रष्टाचाराची परिसिमा गाठत असलेल्या महाराष्ट्रातल्या एका मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश आज `झी २४ तास’नं केलाय. हा घोटाळा आहे वैद्यकिय प्रवेश प्रक्रियेचा. डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या अनेक गरीब घरातल्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा कसा चक्काचूर होतो, ते यातून स्पष्ट झालंय. गुणवान विद्यार्थ्यांना डावलून धनदांडग्यांना प्रवेश देणाऱ्या संस्थाचालकांच्या कृत्याचाही आम्ही पर्दाफाश केलाय.
३० ते ५० लाख रुपये भरा आणि डॉक्टर व्हा!

खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातला प्रवेश म्हणजे दलाल आणि संस्थाचालकांमध्ये होणारा टेबलाखालचा लाखोंचा व्यवहार... देशभरात या एजंटांचं जाळं पसरलंय आणि या जाळ्यात अडकलेत लाखो पालक... गुणवान विद्यार्थ्यांचा गुणवत्तेच्या जोरावर मेडिकलला प्रवेश मिळवण्यासाठी संघर्ष जेव्हा सुरू असतो तेव्हा दुसरीकडे वैद्यकीय महाविद्यालयाची दुकानं थाटलेल्या शिक्षणसम्राटांचा बाजाराही जोरात असतो. ‘मॅनेजमेंट कोटा’ म्हणजे या खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या कमाईचा आणि खंडणीचा महामार्ग... याचमार्गानं तथाकथित शिक्षणसम्राट दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा मलिदा डोनेशनच्या रुपानं उकळतात... पण, मॅनेजमेंट कोट्यानं त्यांची भूक भागत नाही तेव्हा मॅनेजमेंट कोट्याच्या सीट वाढण्याचा त्यांचा खटाटोप सुरु होतो. त्यासाठी बळी दिला जातो तो गरजू, होतकरू आणि गुणवान विद्यार्थ्यांचा. कसा हिरावला जातो गुणवान विद्यार्थ्यांचा प्रवेश... १५ टक्के मॅनेजमेंट कोट्याच्या जागा भरल्यानंतरही ८५ टक्के शासकीय कोट्यातील जागांवरही शिक्षणसम्राट कसे डल्ला मारतात आणि यंत्रणा तसेच पालकांना कसे मूर्ख बनवतात... ही हेराफेरी ‘झी २४ तास’नं समोर आणलीय. शिक्षणसम्रांटाचे हे काळेधंदे उघड करणारी एका पीडित पालकांच्या संघर्षाची ही कहाणी…

मेरिटमध्ये नाव असूनही पात्र विद्यार्थ्याला अपात्र ठरवण्यासाठी शिक्षणसम्राट वेगवेगळ्या युक्त्या करतात. प्रवेश घेण्यासाठी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्याला गैरहजर दाखवण्याची किमयाही त्यापैकीच एक... विद्यार्थी उपस्थितच नव्हता, असं दाखवून मग ती जागा रिकामी ठेवली जाते आणि भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून मग त्या जागेवर मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेशासाठी परवानगी घेतली जाते. त्यानंतर प्रवेशासाठी खेळ सुरू होतो दलालांमार्फत... दलालांकडेही धनदांडग्यांची मोठी यादी असते आणि मग ५० लाखांपासून ते ७५ लाखांपर्यंत मेडिकलच्या प्रवेशासाठी बोली लागते. विशेष म्हणजे या प्रवेशासाठी लाखो रुपये मोडू शकतील अशा धनाढ्य पालकांची नावं महाविद्यालयाकडूनच दलालांना पुरवली जाते. एजंट मग अशा पालकांना गाठून त्यांच्या मुलांना डॉक्टर बनवण्यासाठी जाळ्यात ओढतात आणि गुणवत्तेपेक्षा पैशाच्या जोरावर अशा मुलांना डॉक्टर बनवण्याचा शिक्षणसम्राटांचा कारखाना वर्षानुवर्षे सुरु राहतो.
या शिक्षणसम्रांटाचे काळेधंदे उघड सत्य आहे. पण, यंत्रणाच इतकी भ्रष्ट आहे की त्यांच्या संगनमतानेच हा काळा धंदा बिनदिक्कतपणे सुरु असतो आणि त्याविरोधात बोलणार तरी कोण? कारण बहुतेक वैद्यकीय महाविद्यालयं राजकारणी आणि त्यांच्याशी संबंधित गोतावळ्यातील लोकांचीच आहेत. यावर्षी प्रवेश नियंत्रण समितीनं ज्या महाविद्यालयातील एमबीबीएस प्रवेश रद्द केले त्यांच्यावर नजर टाकली तर ही बाब लक्षात येईल.

> राजकीय वरदहस्त असलेल्या मारुती नवलेंच्या पुण्यातल्या काशिबाई नवले मेडिकल कॉलेजमध्ये ९ जागांची मान्यता रद्द झालीय. तर त्यांच्याच डेंटल कॉलेजमधील ३५ जागा रद्द झाल्या.

> काँग्रेसचे माजी खासदार उल्हास पाटील यांच्या जळगावातल्या मेडिकल कॉलेजमधल्या १९ जागांची मान्यता रद्द झाली.

> काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या सोलापुरातल्या अश्विनी मेडिकल कॉलेजमधील ७ जागांची मान्यता रद्द झाली.

> काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजीत देशमुख याच्या एनकेपी साळवे मेडिकल कॉलेजमधील ११ जागा अवैध ठरल्या.

> विखे पाटील यांच्या व्ही. व्ही. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये ९ जागा रद्द झाल्या.

> राष्ट्रवादीचे खासदार पद्मसिंह पाटलांच्या तेरणा मेडिकलच्या १० जागा रद्द झाल्या तर तेरणा डेंटल कॉलेजच्या १८ जागांची मान्यता रद्द झाली.

> शिवसेनेचे रामदास कदम यांच्या योगिता डेंटल कॉलेजमधील ४१ जागा रद्द झाल्या.

एकूण १९ खाजगी वैद्यकीय आणि डेंटल महाविद्यालयांमधल्या अशा २६६ जागा रद्द झाल्या आणि ही महाविद्यालयं कोणत्या ना कोणत्या पक्षाच्या संबंधित राजकीय नेत्यांशी संबंधित आहेत. या महाविद्यालयांची नावं आणि त्यांना असलेल्या राजकीय पक्षाचा वरदहस्त लक्षात घेता हे स्पष्ट आहे की, या वैद्यकीय प्रवेशाच्या या भ्रष्ट कारभारात सर्वच राजकीय पक्षाचे हात ओले झालेत. त्यामुळेच या पालकाच्या मागे आणि संस्था चालकांच्या विरोधात कोणीही उभं राहला तयार नाही. खाजगी मेडीकल प्रवेश परीक्षेच्या मेरिटमधे येउनही प्रवेशापासून गुणवान विद्यार्थी वंचित राहतात. अशाच २६६ गरीब गुणवान विद्यार्थांच्या जागा शिक्षणसम्रांटांनी हडपल्याचं सत्य उघड झालंय. या मागसवर्गीय विद्यार्थाच्या जागी घनदांडग्यांच्या मुलांना प्रवेश दिला गेलाय... हे वास्तव आहे यावर्षीच्या मेडिकल प्रवेशाचं...
३० ते ५० लाख रुपये भरा आणि डॉक्टर व्हा!

सोलापूरचे दीपक माने गुणवत्तेवर प्रवेश मिळवून मुलांना डॉक्टर बनवावं म्हणून धडपडणाऱ्या पालकांपैकी एक... पण शिक्षणसम्रांटांच्या हेराफेरीचा फटका मानेंना बसला आणि त्यातूनच संघर्ष करून त्यांनी खाजगी महाविद्यालय संस्था चालकांना सळो की पळो करुन सोडलंय. माने यांनी आपल्या पुतण्याला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न पाहिलं... त्यासाठी त्याला उत्तम शिक्षण दिलं. मात्र, खाजगी महाविद्यालयांच्या मेडिकल प्रवेश परिक्षेत १२७ गुणांसह प्रवेशासाठी दावेदारी निश्चित करुनही मानेंच्या पुतण्याला प्रवेश मात्र मिळालाच नाही. अन्याय सहन न झालेल्या मानेंनी मग संस्थाचालकांविरोधात लढा सुरु केला.

दीपक माने अन्याय झालेले एकमेव पालक नाहीत. त्यांच्यासारखे अनेक पालक आज सरकार दरबारी न्याय मागतायत. प्रवेश प्रक्रियेला हजर राहूनही काहींना गैरहजर दाखवण्यात आलं, तर काही महाविद्यालयांनी प्रवेशासाठी कागदपत्रांची पूर्तता करून न घेताच उमेदवारांना प्रवेशापासून वंचित ठेवलं. कारण एकच या पालकांची गरिबी... मुलांकडे गुणवत्ता होती, पण त्यांच्या पालकांची लाखो रुपये देण्याची ऐपत नव्हती. या गोरगरीब मुलांचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न पैशाची हाव असलेल्या शिक्षणसम्राटांनी हिरावलं आणि ते धनदांडग्यांच्या पोरांना विकलं...

मानेंनी नियंत्रण समितीकडे दाद मागितली. त्यांच्या याचिकेसमोर अखेर प्रवेश नियंत्रण समिती झुकली आणि समितीनं राज्यातील १३ खाजगी महाविद्यालयातील दुसऱ्या प्रवेश फेरीनंतरचे सर्व प्रवेश रद्द ठरवलेत. या निर्णयानं शिक्षणसम्रांटांना दणका बसला आणि कोट्यवधी रुपयांचा काळाबाजार उधळला गेला. खाजगी वैद्यकिय महाविद्यालयांच्या या भ्रष्ट कारभाराला चाप लावण्याचं काम प्रवेश नियंत्रण समितीनं केलंय. मात्र, वैद्याकीय शिक्षणमंत्री आणि मुख्यमंत्री या संस्थाचालकांवर कारवाईला काही धजावत नाही. कारण स्पष्ट आहे... ही महाविद्यालय ही सत्तेतल्याच काही राजकारण्याच्या दावणीला बांधलेली आहेत.

वैद्यकीय प्रवेशासाठी देशभरात सक्रीय असलेले दलाल आणि त्यांचं नेटवर्क आता उघड होऊ लागलंय. हे दलाल फारच चलाख असतात. ते बरोबर गरजू विद्यार्थ्यांच्या पालकांना हेरतात आणि आपल्या मुलाला सहजरित्या प्रवेश मिळेल या आशेनं पालकही या दलालांच्या भुलथापाना बळी पडतात. कसं होतं दलाल आणि पालकांमधला संवाद... कसं हेरतात ते पालकांना… कसा डावललो जातोय गुणवान विद्यार्थ्यांना प्रवेश... कसं काम करतं हे एजंटांचं जाळं... तुम्हीच पाहा...
व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन टॅब ओपन करून खालील लिंक कॉपी-पेस्ट करा...
मेडिकल अॅडमिशनचा काळा धंदा... (भाग १) - http://goo.gl/tBdkT
मेडिकल अॅडमिशनचा काळा धंदा... (भाग २) - http://goo.gl/sA7OC
मेडिकल अॅडमिशनचा काळा धंदा... (भाग ३) - http://goo.gl/HQA0f
मेडिकल अॅडमिशनचा काळा धंदा... (भाग ४) - http://goo.gl/dEqTW
मेडिकल अॅडमिशनचा काळा धंदा... (भाग ५) - http://goo.gl/UhXaH

First Published: Friday, January 18, 2013, 19:23


comments powered by Disqus