Last Updated: Thursday, August 30, 2012, 23:01
www.24taas.com, अहमदाबाद आकाशात घडला तो थरार!
काही सेकंदात होत्याचं नव्हतं झालं!
हवेत झाली दोन हेलिकॉप्टर्सची टक्कर!
काही मिनिटात जळून खाक झाले हेलिकॉप्टर|
भारतीय वायुसेनेच्या इतिहासातील धक्कादायक घटना!
अवघ्या आठ सेकंदात होत्याचं नव्हतं झालं!
दहा फूट उंचीवर हादरुन टाकणारं दृष्य!
हेलिकॉप्टर आदळलं जमिनीवर!
जमिनीवर आदळल्यावर उलटलं हेलिकॉप्टर!
हेलिकॉप्टरचे झाले तीन तुकडे!
कसा झाला हा अपघात?
या हेलिकॉप्टरमध्ये कोण होतं?
आकाशातील त्या थराराचा प्रत्यक क्षण! गुजरातमध्ये गेल्या दोन दिवसात एकापाठोपाठ एक हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त होण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. पहिल्या घटनेत प्रवासी बचावले मात्र दुसऱ्या दुर्घटनेतील तेवढे नशिबवान ठरले नाही. गुजरातच्या जामनगरमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेवर प्रकाश टाकणारा हा स्पेशल रिपोर्ट.
गुजरातच्या जामनगर परिसर... वायुसेनेचे दोन हेलिकॉप्टर एका दुर्घटनेत अक्षरशा भस्मसात झाले... हे दोन्ही हेलिकॉप्टर एमआय-१७ बनावटीची असून त्यांची हवेत टक्कर झाली आणि त्यानंतर हेलिकॉप्टर्सनी पेट घेतला. अवघ्या काही क्षणात हेलिकॉप्टर्सचं रुपांतर राखेत झालं. त्या हेलिकॉप्टरमध्ये दहा जण असल्याची माहिती मिळतेय. दोन हेलिकॉप्टर्समध्ये टक्कर कशी झाली? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. एमआय १७ हे हेलिकॉप्टर भारतीय वायुसेनेतील एक अत्यंत महत्त्वाचं आणि खात्री लायक असं हेलिकॉप्टर मानलं जातंय. गुजरातच्या सरमत गावाच्या हद्दीत या दोन्ही हेलिकॉप्टर्सचे जळते सांगाडे आढळून आले. या दुर्घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तत्काळ बचाव कार्य सुरु केलं. तसेच अग्नीशामन दल, स्थानिक पोलीस आणि वायुसेनेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पण मदत पोहोचण्यापूर्वीच नऊ जणांना मृत्यूने कवटाळलं होतं. ही दुर्घटना वायुसेनेच्या इतिहासातील मोठी घटना मानली जातेय. वायुसेनेचे दोन हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळण्याची ही बहुदा पहिलीच वेळ असावी. ही दुर्घटना का घडली याचा शोध घेण्याचा प्रयत्न वायुसेनेच्या तज्ञांकडून केला जात आहे.
आसाराम बापूंच्या हेलिकॉप्टरचा अपघात गुजरातच्या गोध्रामध्ये बुधवारीही एक दुर्घटना घडली होती. हवेत उडत असलेलं हेलिकॉप्टर पंख कापलेल्या पक्षा प्रमाणे जमिनीवर येवून आदळलं आणि त्यानंतर त्याचे तीन तुकडे झाले. आकाशात उडणारं हे हेलिकॉप्टर जो पर्यंत हवेत उडत होत तो पर्यंत या परिसरातील लोक मोठ्या उत्सुकतेनं त्याच्याकडं एकटक बघत होते. हेलिकॉप्टरकडं आशाळभूत नजरेनं पहाणारी ही गर्दी होती भक्तांची. कारण हेलिकॉप्टरमध्ये होते खुद्द आसाराम बापू… दोन दिवसीय सत्संग कार्यक्रमासाठी आसाराम बापू हेलिकॉप्टरने गोध्रात आले होते. त्यांचं हेलिकॉप्टर काही क्षणातच हेलिपॅडवर उतरणार होतं. आसाराम बापूंच्या दर्शनासाठी त्यांचे अनुयायी मोठे उत्सुक होते. कारण हेलिकॉप्टर जमिनीपासून अवघे काही फूट उंचीवर होतं. पण पुढे असं काही होईल, याची कोणी कल्पनाही केली नव्हती. काही क्षणात सगळं चित्रच बदलून गेलं. तिथ जमलेल्या प्रत्येकाने श्वास रोखून धरला होता. काही स्तब्ध झाले होते. तर काही जीवाच्या आकांताने हेलिपॅडकडे धावत सुटले होते. कारण तिथली परिस्थितीत तशी होती. सगळीकडं एकच गोंधळ उडाला होता. हेलिकॉप्टर जमिनीवर आदळल्यानंतर त्यामध्ये बसलेल्या आसाराम बापूंसह पाच जणांचं काय झालं असेल? हेलिकॉप्टरचं काय झाले असेल? याची चिंता प्रत्येकाला सतावत होती. गोध्राच्या सायन्स कॉलेज ग्राऊंडवर उपस्थित असलेला प्रत्येक जण अक्षरश: हादरुन गेला होता. हे अचानकपणे असं कसं झालं? याचं उत्तर मात्र कुणाकडेच नव्हतं? केवळ आठ मिनिटांमध्ये आणि जमिनीपासून अवघ्या दहा फूट अंतरावर तो थरार घडला होता. हेलिकॉप्टरचा वरचा भाग पूर्णपणे तुटला होता. पुढचा भाग, हेलिकॉप्टरचे पंखे सगळं काही नष्ट झालं होतं. पण त्या हेलिकॉप्टरमध्ये असलेले आसाराम बापूसह पाच जण थोडक्यात बचावले होते. हे दुर्घटनाग्रस्त झालेलं हेलिकॉप्टर वीस वर्ष जुनं असल्याचं बोललं जातंय. तसेच वेळोवेळी देखभाल दुरुस्ती न केल्यामुळे ते दुर्घटनाग्रस्त झालं असावं अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.

थोडक्यात बचावले होते अर्जुन मुंडाआसाराम बापू हेलिकॉप्टर दुर्घटनेतून थोडक्यात बचावलेत त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी झारखंडचे मुख्यमंत्री अर्जुन मुंडा हे देखील अशाच पद्धतीने थोडक्यात बचावले होते. ९ मे २०१२ रोजी दुपारी १२:30 वाजता... रांचीच्या आकाशात अतिशय वेगानं एक हॅलिकॉप्टर घिरट्या घालत होतं. या हॅलिकॉप्टरमध्ये झारखंड्च्या राजकारणातील एक अतिशय महत्त्वाची व्यक्ती बसली होती. झारखंडचे मुख्यमंत्री अर्जुन मुंडा त्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. विमान हवेत उडणारं हॅलिकॉप्टर अचानकपणे हेलकावे खाऊ लागलं. काहीतरी अघटीत होतंय याची हेलिकॉप्टरमध्ये बसलेल्या सर्वांनाच जाणीव झाली होती. हाताबाहेर जात असलेलं ते हॅलिकॉप्टर नियंत्रणात आणण्यासाठी पायलट पुर्णपणे प्रयत्न करत होता. पण पायलेटनं प्रयत्न सुरु करण्यापूर्वीच परिस्थिती हाताबाहेर गेली होती. ते हेलिकॉप्टर रांची पासून १०० किमी दूर हरियाणात लॅंडिग करण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. पण तो प्रयत्न फसला होता. नेमकं काय घडतंय हे कुणालाच कळत नव्हतं. त्याचवेळी पायलटने निर्माण झालेल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रांची एअरपोर्टशी संपर्क साधला. रांची एअरपोर्टनेही हॅलिकॉप्टरचा संदेश मिळाल्यावर लगेचच इमरजन्सी लॅडींगची तयारी सुरु केली. पण त्याचवेळी हॅलिकॉप्टर हे पुर्णपणे नियंत्रणाबाहेर गेले होते. त्या हेलिकॉप्टरचं संतुलन गेलं होतं. त्यातच हॅलिकॉप्टरच्या टेल विंगने दगा दिला आणि हॅलिकॉप्टर जमिनीवर येऊन आदळलं. रांची विमानतळावर ‘अगास्ता एअर ब्लू १०९’ हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं होतं. या दुर्घटनेत मुख्यमंत्री अर्जुन मुंडा हे किरकोळ जखमी झाले होते. पण या अगोदर झालेल्या विमान आणि हॅलिकॉप्टरप दुर्घटनेचा इतिहास पाहता अर्जुन मुंडा केवळ सुदैवाने वाचले असचं म्हणावे लागेल.

आकाशातील दुर्घटनांचा इतिहास आकाशातील अशा दुर्घटनेत देशाने काही महत्वाच्या नेत्यांना गमावलं आहे.
३ मार्च २००२ ला आंध्रप्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यात तत्कालीन लोकसभा अध्यक्ष जी.एम.सी. बालयोगींचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं होतं. १९९१ मध्ये तेलगू देसम पार्टीच्या तिकीटावर ते लोकसभेची निवडणूक जिंकले होते. दहाव्या लोकसभेचे बालयोगी पहिल्यांदा सदस्य बनले. आपल्या राजकीय जीवनात त्यांनी अनेक चढ-उतार बघितले होते. १९९८ मध्ये ते पुन्हा एकदा लोकसभेत निवडून गेले आणि लोकसभा अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. जेव्हा ती दुर्घटना घडली तेव्हा ते त्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. हवामानात अचानक झालेला बदल आणि पायलटच्या चूकीमुळे बालयोगींच हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं होतं.
३० सप्टेंबर २००१ रोजी उत्तरप्रदेशातील कानपूरमध्ये दुर्घटना होऊन काँग्रेस नेते माधवराव सिंधीयांचा मृत्यू झाला होता. काँग्रेसचे नेते माधवराव सिंधीया उत्तरप्रदेशच्या दौऱ्यावर गेले होते. तिथं ते एका सभेला संबोधित करणार होते. कानपूरकडं रवाना झाल्यानंतर काही वेळेतच त्यांच्या विमानाला अपघात झाला. वातावरण आणि पायलटच्या चूकीमुळे ते विमान दुर्घटना ग्रस्त झालं होतं.
९ जुलै १९९४ रोजी हिमाचल प्रदेशात हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त होऊन पंजाबचे राज्यपाल सुरेंद्रनाथ यांचा मृत्यू झाला होता. पंजाबचे राज्यपाल आपल्या कुटुंबासोबत हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर गेले होते. पण आकाशात झालेल्या दुर्घटनेमुळे सुरेंद्रनाथ यांच्या कुटुंबातील ९ जणांसह एकून १२ जणांचा मृत्यू झाला.
२३ जून १९८० मध्ये झालेल्या विमान दुर्घटनेमुळे सगळा देश हादरुन गेला होता. इंदिरा गांधी यांचा मुलगा संजय गांधी यांचा त्या दुर्घटनेत मृत्यू झाला. ज्यावेळी ते विमान दुर्घटनाग्रस्त झालं त्यावेळी त्या विमानाची सूत्रं संजय गांधी यांच्या हाती होती. विमानाचं संतुलन बिघडल्यामुळे ते जमिनिवर येऊन आदळलं. या भीषण विमान दुर्घटनेत देशानं एक युवा नेता गमावला. अशा प्रत्येक दुर्घटनेनंतर कठोर नियम केले जातात. पण विमान आणि हेलिकॉप्टर दुर्घटनांची संख्या काही कमी होत नाही आणि दुर्घटनेनंतर निर्माण होणारे प्रश्नही कायम आहेत.
सिंगल इंजिन विमानांचा अपघातसिंगल इंजिन असलेल्या विमानांना वारंवार अपघात होत असल्याचं आज पर्यंतच्या विमान अपघातावर नजर टाकल्यास तुमच्या लक्षात येईल. पण हे अपघात का होतात याचा कधी तुम्ही विचार केलाय. १९९८ साली एप्रिल महिन्यात मेंगलोर एअर शोमध्ये एक अशीच भीषण दुर्घटना घडली होती. सिंगल इंजिन विमान आकाशात झेपवण्यासाठी सज्ज होती. पण त्याचवेळी झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ते विमान नियंत्रणाबाहेर गेलं आणि काही क्षणात ते रनवेवर येऊन आदळलं. हेलकावे घेत रनवेवर कोसळणारे ते विमान पाहून अनेकाना मोठा धक्का बसला होता. हैद्राबाद एअर शोमध्येही असाच प्रकार घडला होता. सिंगल इंजिन असलेलं नौसेनेचं ‘किरण -एम के २’ हे विमान आकाशात हवाई कसरती दाखवत असतानाच कोसळलं होतं. ‘किरण - एमके २’ विमानात रोल्स रॉईस हे इंजिन बसवण्यात आले होते. सुरक्षेच्या सर्व यंत्रणा कार्यान्वित असतानाही किरण ‘एम के २’ हे सिंगल इंजिन असेलं विमान कोसळलं होतं. फरिदाबाद दुर्घटनेप्रमाणेच या दुर्घटनेतील किरण ‘एम के २’ विमान बोवनपल्लीतील एका तीन मजली इमारतीवर कोसळलं. या दुर्घटनेत विमानाचे पायलंट कमांडर एस के मोर्य, लेफ्टनन कमांडर नायर हे मृत्यूमुखी पडले होते तर बिल्डींगवर हे विमान कोसळल्याने चार लोक जायबंदी झाले होते.
केवळ देशातच नाही तर विदेशातही अशा प्रकारच्या एअर शोमध्ये सिंगल इंजिनची विमानं दुर्घटनाग्रस्त झाली असून त्यामुध्ये मनुष्यहानी झाली आहे. फ्रेंच, अमेरिका , ब्रिटीश अशा देशांमध्येही सिंगल इंजिनची सैन्य विमानं दुर्घटनाग्रस्त झाली आहेत. २८ ऑगस्ट १९९८ मध्ये रेम एअर शो मधल्या दृष्यांनी सर्वांना हादरवून सोडलं होतं. इटलीमधील अमार्ची एमडी ३३९ विमान हे एक नावाजलेले विमान होते. पण हे विमान एअर शोमध्ये कसरती दाखवत असतानाच कोसळलं. हवेतच विमानानं पेट घेतला आणि प्रेक्षकांमध्ये घुसलं. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. सिंगल इंजिनाच्या विमानांना वारंवार घ़डत असलेल्या दुर्घटनेमुळे जगभरात आता एकापेक्षा जास्त इंजिन असणाऱ्या विमानांची मागणी वाढलीय. दोन इंजिन असणाऱ्या विमानात एक इंजिन नादुरुस्त झाल्यास दुसरे इंजिन उपलब्ध असते आणि त्यामुळे दुर्घटना टाळता येऊ शकते. पण सिंगल इंजिन विमानात हा पर्याय नसतो आणि हा पर्याय नसल्यामुळेच अनेक दुर्घटनाना आज समोर जावं लागतयं.
First Published: Thursday, August 30, 2012, 22:52