Last Updated: Thursday, April 17, 2014, 09:05
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली चार मोठे केंद्रीय मंत्री आणि नेत्यांच्या हवाला कनेक्शनचा सर्वात मोठा गौप्यस्फोट केलाय `झी मीडिया`नं... मोईन कुरैशी नावाच्या एका मांस निर्यातदाराच्या माध्यमातून सुरू होता हा करोडो रूपयांचा हवाला कारभार... आम्ही करतोय त्याचा पर्दाफाश... पाहूयात `ऑपरेशन हवाला`... मोईन अख्तर कुरैशी... या व्यक्तीला आपण ओळखत नाही, कदाचित हे नावही आपण कधी ऐकलं नसेल.. पण याच नावानं अख्ख्या देशात सध्या खळबळ उडवलीय. मांस निर्यातीचा धंदा करणाऱ्या मोईन कुरैशी नावाच्या व्यक्तीच्या घरांवर आणि ऑफिसेसवर इन्कम टॅक्स विभागाने छापे घातले. मोईन हवाला कारभार चालवत असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. मात्र, त्याचं कनेक्शन तिथपर्यंत आहे, जिथून देशाचा कारभार चालवला जातो.
गेल्या १५ एप्रिलला इन्कम टॅक्स विभागानं मोईन कुरैशीच्या दिल्ली, गुरगाव आणि नोएडातील ठिकाणांवर छापे घातले. याच वर्षी १६ फेब्रुवारीला देखील कुरैशीच्या ठिकाण्यांवर छापे घातले गेले होते. त्यामध्ये ६ कोटी रूपयांची रोख रक्कम सापडली होती. त्याशिवाय कुरैशीच्या कर्मचाऱ्यांच्या नावे असलेले २० लॉकर्सही जप्त करण्यात आले होते. नंतर चौकशीत कुरैशीनं कबूल केलं की, हे सगळे लॉकर्स त्याचेच आहेत. इन्कम टॅक्स खात्यातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, या लॉकर्समध्येही मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडलीय.
आम्ही या घटनाक्रमातील खळबळजनक सत्य जगासमोर आणतोय. मोईनच्या ठिकाण्यांवर इन्कम टॅक्सचे हे छापे उगाचच पडलेले नाहीत. इन्कम टॅक्सने तब्बल दोन महिने मोईनचे सर्व फोन कॉल्स टॅप केले. झंडेवालान येथील इन्कम टॅक्स महासंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी जेव्हा हे कॉल्स ऐकले, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
५२० तासांचं हे रेकॉर्डिंग आहे आणि त्यामध्ये सूत्रांच्या म्हणण्यानुसार, मनमोहन सिंग यांच्या सरकारमधील चार मंत्र्यांचे आवाजही टेप झालेत. यांपैकी पहिले मंत्री उत्तर प्रदेशातील आहेत आणि खास खात्यामध्ये राज्यमंत्री पद सांभाळत आहेत. दुसरे मंत्री मध्य प्रदेशशी संबंधित आहेत आणि यूपीए-१ आणि यूपीए-२ मध्ये विविध खात्यांचा कारभार त्यांनी पाहिलाय. तिसरे मंत्री महाराष्ट्रातील एक ताकदवर राजकीय नेते आहेत आणि ते देखील यूपीए-१ आणि यूपीए-२ मध्ये महत्त्वाची खाती सांभाळत आहेत. चौथे मंत्री महोदयदेखील उत्तर प्रदेशशी संबंधित आहेत आणि राज्यमंत्री म्हणून पदभार सांभाळतायत. रेकॉर्डिंगमध्ये ज्या पाचव्या नेत्याच्या नावाचा उल्लेख आहे, तो १० जनपथचा अत्यंत विश्वासू समजला जातो. १० जनपथला महत्त्वाच्या विषयांवर सल्ले देण्याचं काम हा नेता करतो, असं सांगितलं जातं. त्याशिवाय टू जी घोटाळ्याशी संबंधित अनेक बड्या कॉर्पोरेट्सचा उल्लेखही या रेकॉर्डिंगमध्ये आहे.
अशी खबर आहे की, एका माजी सीबीआय संचालकाला जी लाच देण्यात आली, ती रक्कम दुबई मार्गे लंडनला पोहोचवण्याचे काम मोईन कुरैशीनेच केलं होतं. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, काही राजकारणी हवाला रॅकेटमार्फत पैसा देशाबाहेर तर पाठवत नाहीत ना? याचीही चौकशी सुरू आहे. योगायोगाची बाब म्हणजे ज्या मोईन कुरैशीशी संबंधित हे रॅकेट समोर येतंय, त्याला सीबीआयच्या एका माजी संचालकानं आपल्या आईच्या नावावर असलेला बंगला भाड्यानं दिलाय. दिल्लीच्या पॉश डिफेन्स कॉलनीमध्ये १३४ नंबरच्या या बंगल्यात मोईन कुरैशी आपली कंपनी `AMQ AGRO`चं ऑफिस चालवतो. कुरैशीकडे डिफेन्स कॉलनीतील डी ३१८ आणि डी २६८ हे बंगलेही आहेत.
इन्कम टॅक्स लवकरच याबाबतच मोठा खुलासा करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. मनी लाऊंड्रिंगच्या या रॅकेटची अंमलबजावणी संचालनालयामार्फत चौकशी होण्याची शक्यता आहे. मात्र, या सर्व घटनांबाबत तपास यंत्रणांनी आतापर्यंत जे मौन धारणं केलंय, त्यामुळं अनेक मोठे प्रश्न उभे राहतात.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, April 17, 2014, 08:56