नातं... बापुंचं आणि पुण्याचं!, relation between mahatma gandhi & pune

नातं... बापुंचं आणि पुण्याचं!

नातं... बापुंचं आणि पुण्याचं!

www.24taas.com, झी मीडिया, पुणे

सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्याच अनुषंगाने भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळात या शहराशी अतिशय जवळचा संबंध आला, तो राष्ट्रपिता महात्मा गांधींचा… आज महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने पुणं आणि गांधीजी यांच्यातील नात्याचा वेध घेण्याचा हा विशेष प्रयत्न… देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचं प्रमुख केंद्र राहिलेल्या पुण्याशी महात्मा गांधींचा अगदी जवळून संबंध आला. तो काळ पारतंत्र्याचा होता. पुण्यामध्ये गांधीजींचं अनेकदा वास्तव्य होतं.

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस महात्मा गांधी पहिल्यांदा पुण्यात आले. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना भेटण्यासाठी गांधीजी १८९६ मध्ये पुण्यात आले होते. त्या दोघांची भेट झाली ते ठिकाण म्हणजे हा केसरीवाडा…स्वातंत्र्य चळवळ बळकट करण्याविषयीच मार्गदर्शन गांधीना याच ठिकाणी लाभलं… १९०५ च्या सुमाराला महात्मा गांधी परत एकदा पुण्याला आले. यावेळी त्यांनी त्यांचे राजकीय गुरु नामदार गोपाल कृष्ण गोखलेंची भेट घेतली… फ़र्ग्युसनच्या मागच्या टेकडीवर ते दोघे पहिल्यांदा भेटले. त्यानंतरच्या काळात भारत सेवक समाजाच्या विश्राम गृहात महात्मा गांधींचं वास्तव्य बराच काळ राहिलं. नामदार गोखलेंनी स्थापन केलेल्या भारत सेवक समाजाशी गांधीजींचा प्रदीर्घ संपर्क होता. नामदार गोखलेंच्या निधनानंतरही गांधीजी पुण्यात आले होते.

पुण्याच्या येरवडा कारागृहात गांधीजी एकदा नव्हे तर दोनदा बंदी बनून राहिले होते. १९२४-२५ च्या दरम्यान कारागृहात असताना गांधीजींना अपेंडिक्सचा त्रास सुरु झाला. त्यावेळी पुण्याच्या ससून रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. गंमत म्हणजे दिवे गेल्यानं कंदिलाच्या उजेडात ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती, असं अभ्यासक सांगतात.

मिठाचा सत्याग्रह छेड्ल्याची शिक्षा म्हणून १९३० मध्ये गांधीजींना पुन्हा एकदा येरवडा कारागृहात बंदी म्हणून ठेवण्यात आलं. याच दरम्यान ऐतिहासिक पुणे करार घडवून आणला गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी करारावर सही केल्यानंतर गांधीजींचे उपोषण सोडण्याच्या वेळी रवींद्रनाथ टागोर आवर्जून उपस्थित होते. या संपूर्ण घटनाक्रमाचे साक्षीदार हे येरवडा कारागृह आहे.

आयुष्याच्या उत्तरार्धातला मोठा काळ गांधीजींनी पुण्यात घालवला. ऑगस्ट १९४२ ते मे १९४४ दरम्यान महात्मा गांधी आगाखान पेलेस मध्ये नजरकैदेत होते. यावेळी पत्नी कस्तुरबाही त्यांच्यासोबत होत्या. आगाखान पॅलेसमध्येच कस्तुरबांचं निधन झालं. कस्तुरबांची समाधी आगाखान पेलेसमधेच आहे. तर महात्मा गांधींच्या मृत्यूनंतर त्यांच्या अस्थिसुद्धा याच पवित्र स्थळी ठेवण्यात आल्या आहेत.

गांधीजी जिवंत असताना त्यांच्या पदस्पर्शाने तर त्यांच्या पश्चात त्यांच्या स्मृतींनी ही पुण्यनगरी पावन झालेली आहे. पुणे शहराला गांधीजींच्या सहवासाचा पवित्र वारसा लाभलेला आहे. दुर्दैव एवढंच की देशाला अहिंसेच्या मार्गानं स्वातंत्र्य प्राप्त करून देणाऱ्या या महात्म्याचा अंत एका पुणेकराच्याच हातून व्हावा, यापेक्षा मोठा विरोधाभास तो काय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, October 2, 2013, 09:59


comments powered by Disqus