यूपीएला पेट्रोलची झळ - Marathi News 24taas.com

यूपीएला पेट्रोलची झळ

www.24taas.com, मुंबई
 
पेट्रोल दरवाढीवरुन केंद्र सरकारच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे. तृणमूल काँग्रेसने विरोध दर्शवल्यानंतर डीएमकेही रस्त्यावर उतरलं. मित्र पक्षांसोबत मनमोहन सिंगाच्या मंत्री मंडळातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्य़ांनीही पेट्रोलच्या दरवाढीचा विरोध केलाय.
 
 
 
 
पेट्रोलची धग- रस्त्यावर तृणमूल
 
पेट्रोलची धग- तामिळनाडूमध्ये डीएमकेचं आंदोलन
 
पेट्रोलची धग- युपीत समाजवादी पक्षाचा बंद
 
एनडीए आणि डाव्यापक्षांबरोबरच मित्रपक्षांनीही पेट्रोलच्या दर वाढीवरुन युपीए सरकारवर हल्ला चढवलाय... पेट्रोल दरवाढीच्या आगीचे चटके काँग्रेसला बसू लागले असून केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्यावरून ते सहज लक्षात य़ेईल. केंद्रीय संरक्षणमंत्री ए.के अँटोनी यांनी पेट्रोल दरवाढीला तीव्र विरोध केला आहे.
पेट्रोलच्या दरवाढीवरुन काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये चांगलाच गोंधळ उडालाय. एकीक़डं संरक्षण मंत्री ए.के , अँटोनी यांनी दरवाढीला विरोध दर्शवलाय तर दुसरीकडं केंद्रीयमंत्री जयराम रमेश यांनी डिझेल आणि घरगुती गॅसवरचं अनुदान रद्द करण्याचा सल्ला सरकारला दिलाय.
 
पेट्रोलच्या मुद्दावर आपल्या विरोधात वातावरण तयार झाल्यामुळं काँग्रेसची अस्वस्थता वाढलीय..विरोधी पक्षांनी  गुरुवारी बंदची हाक दिली असून या बंद पूर्वीच पेट्रोलच्या किंमतीत दिलासा देण्यासाठी काँग्रेसकडून दबाव टाकला जात असल्याचं काँग्रेसच्या सुत्रांनी सांगितलंय.
 
काही प्रमाणात पेट्रोलचे दर कमी करण्याचे संकेत पेट्रोल कंपन्यांनी दिले आहेत. एक जूनला पेट्रोल कंपन्यांची बैठक होणार असून त्या बैठकीत पेट्रोलच्या दरवाढीबाबात फेरविचार  केला जाण्याची शक्यात नाकारता येत नाही. पेट्रोल दरवाढीविरोधात एनडीएने भारत बंदची हाक दिली असून बंद यशस्वी करण्यासाठी कंबर कसलीय. दरवाढ तात्काळ मागे घेण्याची  मागणी विरोधकांनी केलीय. पण केंद्राने राज्य सरकावर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केलाय.. राज्य सरकारने कर कमी केल्यास नागरिकांना दिलासा मिळेल असा युक्तीवाद केंद्राकडून केला जातोय.

भारत बंद
उत्तर प्रदेश- समाजवादी पार्टी
 
पंजाब- एनडीए
 
गुजरात- एनडीए
 
मध्य प्रदेश- एनडीए
 
बिहार- एनडीए
 
झारखंड- एनडीए
 
छत्तीसगढ़- एनडीए
 
उड़ीसा- बीजेडी
 
कर्नाटक- एनडीए
 
 
भारताच्या नकाशावरील ही काही राज्य आहेत जिथं एनडीए किंवा बिगर काँग्रेसी पक्षांची सत्ता आहे. बिगरकाँग्रेसी राज्यातील सत्ताधा-यांनी पेट्रोल दरवाढी विरोधात बंदची हाक दिलीय. त्यामुळे 30 आणि 31 मे या दोन दिवसांत पेट्रोल दरवाढीवरुन देशात व्यापक आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
एनडीएची सत्ता असलेल्या राज्यांनी पेट्रोवरचा वॅट कमी करण्यास विरोध दर्शवला आहे..त्यामुळे केंद्र सरकारची चांगलीच कोंडी झालीय.. राज्य सरकारने वॅट कमी केल्यास  ग्राहकांना दिलासा मिळेल असा युक्तीवाद केंद्र सरकारकडून केला जात आहे..
 
भारत बंदचा परिणाम केवळ बिगर काँग्रेसी राज्यातच पहायला मिळेल असं नाही तर काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यातही विरोधक रस्त्यावर उतरणार आहेत. पेट्रोलच्या दरवाढीवरुन  तमिळनाडुत  डीएमकेने आंदोलन सुरु केलंय...डीएमकेचे सर्वेसर्वा   करुणानिधि यांनी केंद्र सरकारचं  समर्थन मागे घेण्याची  धमकी दिली होती ..मात्र नंतर त्यांनी घुमजाव केला...ही सगळी परिस्थिती पहाता पेट्रोलच्या मुद्द्यावरुन काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत  देशभर आग भडकली असून काँग्रेसला त्याचे चटके सहन करावे लागणार आहेत..

पेट्रोल दरवाढीच्या भडक्यावर थोडा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झालीय..एचपीसीएलने पेट्रोलचे दर काही प्रमाणात कमी करण्याचे संकेत दिले आहेत.. तसेच आयओसीनेही अशाच प्रकारचे संकेत दिलेत..पण त्यासाठी 1 जून पर्यंत वाट पहावी लागणार आहे...
 
एचपीसीएल या तेल कंपनीने हे संकेत दिले असून अंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत कमी झाल्यामुळे भारतातही पेट्रोलची किंमत प्रति लिटर 1 रुपये 67 पैशांनी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.अंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्यामुळे त्याचा फायदा भारतीय ग्राहकांना होईल असा दावा इंडियन ऑईल कॉर्पोरेशननेही केलाय..
एक जून रोजी ऑईल कंपन्यांची बैठक होणार असून पेट्रोलीय मंत्र्यांनीही याच बैठकीपर्यंत वाट पाहण्याचा सल्ला दिला आहे..कारण या बैठकीत पेट्रोलचे दर काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे
 
पेट्रोलच्या किंमतीवरुन देशभर असंतोषाचा भडका उडाला असून  जनता दिलाशाची वाट पहात आहे..पण तेल कंपन्यांकडून ग्राहकांना खरंच काही दिलासा  मिळणार  का ? हाच खरा प्रश्न आहे... कारण तेल कंपन्यांनी  साडे सात रुपयांची दरवाढ केलीय...ती पहाता किरकोळ दिलासा देवून जनतेचा राग शांत करण्याचा प्रयत्न  तेल कंपन्यांकडून केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही..
 
पेट्रोल दरवाढीच्या झळा आता सा-या देशवासियांबरोबरच काँग्रेसलाही बसू लागल्या आहेत. या पार्श्वभूमिवर काँग्रेस कार्यसमितीची बैठक 4 जूनला होऊ घातली असून त्या बैठकीत पेट्रोल दरवाढी बरोबरच पाच राज्यातील पराभवावरही चर्चा होण्याची शक्यता आहे...
 
पेट्रोल दरवाढीच्या मुद्द्यावरुन काँग्रेस प्रणित युपीए सरकार चांगलच अडचणीत सापडलंय...कारण विरोधकांबरोबरच सत्तेत वाटेकरी असलेल्या पक्षांनाही पेट्रोल दरवाढीला विरोध दर्शवलाय..या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी 4 जूनला काँग्रेस कार्यसमितीची बैठक बोलावली आहे..त्या बैठकीत केंद्र सरकार तसेच काँग्रेसची विस्कटलेली घडी बसविण्याचा प्रयत्न  त्यांच्याकडून  केला जाण्याची शक्यता आहे.
 
काही मंत्र्यांनी आपलं मंत्रीपद सोडून पक्षासाठी काम करण्याची इच्छा सोनिया गांधींकडं व्यक्त केली होती..त्यामध्ये  जयराम रमेश, गुलाम नबी आझाद, सलमान खुर्शिद, वायवर रवी आणि नारायण सामी यांचा समावेश आहे. या विषय़ी कार्यसमितीच्या बैठकीत सोनिया गांधींकडून निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. वाढती महागाई आणि केंद्र सरकारवर रोज होणारे नवनवे आरोप या पार्श्वभूमिवर आगामी काळात काँग्रेस पक्ष आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जातेय...पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी  आणि डिएमके या मित्र पक्षांना लगाम लावण्यासाठी काँग्रेसने मुलायम सिंगांना जवळ केल्य़ाचं बोललं जातंयय..जुलै महिन्यात होऊ घातलेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपर्यंत डीएमके आणि तृणमूलचा जाच काँग्रेस सहन करण्याच्या मनस्थितीत असल्याचं सुत्रांनी सांगितलंय..कारण राष्ट्रपती पदी आपल्या पसंतीच्या व्यक्तीची निवड व्हावी असा काँग्रेसचा प्रयत्न राहणार आहे..त्यामुळेच दोन्ही मित्र पक्षांना न दुखावण्याचं धोरण काँग्रेसने अवलंबलं आहे..
 
नुकतेच पाच राज्यात पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाला आलेल्या अपयाशावर  अँटोनी यांनी अहवाल तयार केला असून त्या अहवालावर कार्यसमितीच्या बैठकीत चर्चा होणार असून कार्यसमितीच्या बैठकीनंतर काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांना त्याचा फटका बसण्याची  शक्यता आहे...

 
पेट्रोलदरवाढीच्या भडक्यावर आता राजकारणाची पोळी भाजण्याचे प्रकार सुरु आहे.. ममता बॅनर्जीही जनतेसाठी रस्त्यावर उतरल्या होत्या...मात्र एकीकडं पेट्रोल भाववाढीवर रस्त्यावर उतरायचं आणि दुसरीकडं  आयपीएल विजेत्यांवर सरकारी तिजोरीतून लाखो रुपयांची उधळपट्टी करायची असा ममतादिदींचा दुटप्पीपणाही या निमित्ताने पहायला मिळालाय...
 
पेट्रोलच्या दरात लिटर मागे साडे सात रुपयांची वाढ झाल्यामुळं सर्व सामान्य जनतेमध्ये  संतापाची लाट उसळलीय. सर्वसामान्याच्या नावानं  राजकारण  करणा-या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची ही राजकीय खेळी आश्चर्यचकीत करणारी आहे. देशातील सर्वसामान्य जनता पेट्रोल दरवाढीच्या आगीत होरपळत असतांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आय़पीएलच्या टीम सोबत आनंदोत्सव साजरा करण्यात मग्न होत्या. कोकात्ताच्या इडन गार्डन मैदानावर हजारो प्रेक्षकांच्या  साक्षिनं हा सत्कार सोहळा रंगला होता..ते दृष्य पाहून जणू काही जग जिंकल्याचा भास होत होता.
 
पण धक्कादायक बाबा म्हणजे या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन सरकारी खर्चाने केलं होतं. तसेच प्रत्येक क्रिकेटपटूला सोन्याची चैन देण्यात आली...या सत्कार समारंभासाठी सरकारी तिजोरीतून 50 लाख रुपयांची उधळपट्टी करण्यात आली..
 
आय़पीएलमधील एका खासगी टीमसाठी सरकारी पैसा खर्च करणा-या ममता बॅनर्जी पॅकेजसाठी केंद्र सरकारला धारेवर धरायला मागे पुढे पहात नाहीत...एकीकडं पैशासाठी  केंद्राला वेठीस धरायचं आणि दुसरीकडं जनतेचा पैसा अशा पद्धतीने खर्च करायचा असा दुटप्पीपणा ममता बॅनर्जींकडून केला गेलाय...
 
केंद्र सरकारने पेट्रोलचे दर वाढविल्यानंतर त्या विरोधात ममता बॅनर्जी रस्त्यावर उतरल्या...पायी सात किलो मीटर अंतर चालून त्यांनी दरवाढ मागे घेण्याची मागणी केली...पण ममता बॅनर्जींची ही दुटप्पी भूमिका जनतेच्या लक्षात आलीय....
 
खऱं तर सर्वसामान्य जनता पेट्रोल दरवाढीमुळे होरपळून निघालीय़..एकीकडं दरवाढीमुळे नजतेचा खिसा कापला गेलाय तर दुसरीकडं सरकार टॅक्समध्ये कोणतीच सूट देण्यास तयार नाही..त्यामुळे पेट्रोलच्या दरवाढीवर आंदोलन करणा-या ममता बॅनर्जींची ही  राजकीय खेळी तर नाही ना अशी शंका व्यक्त केली जातेय..

First Published: Wednesday, May 30, 2012, 23:48


comments powered by Disqus