सुधारगृहात भिकारी निराधार - Marathi News 24taas.com

सुधारगृहात भिकारी निराधार

www.24taas.com, सोलापूर
 
भिका-यांना स्वकष्टानं जगता यावं यासाठी शासानानं भिका-यांचं सुधारगृह केलं. पण समजात मिळणा-या वागणूकीपेक्षाही घृणास्पद वागणूक भिकारी या सुधारगृहांमध्ये मिळतीय. भूकेमुळे या सुधारगृहात पाच वर्षात 150 जणांचा मृत्यू झालाय. झी 24 तासनं सोलापुरच्या केडगावातील कुष्टधाम नावाच्या भिका-यांच्या सुधारगृहाला भेट देली. तेंव्हा मानवतेला काळीमा फासणारं दृश्य दिसलं.
 
सोलापूर जिल्ह्यातल्या केडगावातील शासकीय कुष्टधामातील भिका-यांच्या वाट्याला उपेक्षित जगणं आलंय. घाणेरडी शौचालयं, प्रचंड अस्वच्छता आणि अशातच जेवणाच्या प्रतीक्षेत तासनतास भिकारी बसले असतात. ह्दय पिळवटून टाकणारं हे दृष्य शासकीय अनास्थेचा उत्तम नमुनाच म्हणावा लागेल. झी 24 तासच्या टीमनं या सर्वांचा पर्दाफाश केला. फळं वाटण्याच्या निमित्तानं झी २४ तासची टीम इथं पोहचली आणि ख-या परिस्थीतीचा उलगडा झाला.
 
गुडघ्यात पाय घालून अंगात त्राण नसतांनाही हात पसरून हे भिकारी केळी मागत होते. भूकेनं त्यांचा जीव व्याकुळ झाला होते. अन्न-पाण्यावाचून काही भिकारी जीवही सोडतात. पण निर्ढावलेल्या शासकीय अधिका-यांना त्याचं जराही सोयरसुतक नाही. भिका-यांना स्वकष्टानं जगता यावं यासाठी केडगावच्या या सुधारगृहाची स्थापना करण्यात आली. पण इथे तर त्यांना जिवंतपणीच मारण्याचं काम सुरू आहे. अंगात घालायला ना धड कपडे ना पोटाला अन्न. शेतीचं काम देणं सोडाच दिवसभर त्यांना खोलीत डांबून ठेवलं जातं.
 
तीनशे जणांची क्षमता असलेल्या या गृहात 121 भिकारी आहेत. त्यातील दोन जण मरणाच्या वाटेवर निपचित पडून आहेत. न्यायालयातून इथे आणलं तेंव्हा त्यांच वजन साठ ते सत्तर किलो होतं मात्र आता ते केवळ वीस ते तीस किलो झालंय. त्यांच्यासाठी असलेले कर्मचारी, डॉक्टर्स, दूध, अंडी, मांस करणमणूकीची साधनं हे सारंही केवळ कागदावरच पहायला मिळतं. या सुधारगृहाकडे लक्ष द्यायला अधिका-यांना वेळ नाही. सर्वच कारभार एका चतुर्थश्रेणी कर्मचा-याच्या हवाली करण्यात आलाय.
 
सरकारी सोयीसुविधा जणू काही लालफितीत आणि खाबुगिरीत गायब झाल्याचा अनुभव इथे पदोपदी येतो. त्यामुळेच यानिमित्तानं राज्य सरकारवर मानावधिकारांचं उल्लंघन केल्याचा आरोप होतोय.
 

First Published: Sunday, June 10, 2012, 09:21


comments powered by Disqus