Last Updated: Saturday, December 17, 2011, 11:28
झी २४ तास वेब टीम, पुणे पुण्यातल्या पेट्रोल भेसळीचा झी २४ तासनं पर्दाफाश केल्यानंतर पुणेकरही संतप्त झालेत. त्याचबरोबर या भेसळीबद्दल संशयाची सुई पेट्रोल कंपन्यांकडे जातेय.
पुण्यात होणाऱ्या पेट्रोल चोरी आणि भेसळीनंतर संशयाची सुई पेट्रोल कंपन्यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे जातेय. पेट्रोल वाहतूक करणाऱ्या सर्वच टँकर्सना अत्याधुनिक लॉक आहेत. त्याच्या फक्त दोन चाव्या असतात. त्यापैकी एक चावी ही संबंधित पेट्रोल कंपन्यांकडे आणि दुसरी पेट्रोल पंप डीलर्सकडे असते. पेट्रोल पंप डीलर्स ही चावी भेसळखोरांना देणार नाहीत, हे उघड आहे. त्यामुळे पेट्रोल कंपन्यांकडची ‘मास्टर्स की’ बाहेर येत असणार किंवा या मास्टर कीच्या सर्रास डुप्लिकेट चाव्या केल्या जात असणार. त्यामुळे यामध्ये पेट्रोल कंपन्यांच्याच कर्मचाऱ्यांचा हात असावा, असा आरोप पेट्रोल डीलर्स असोसिएशननं केलाय. याची चौकशी करण्याची मागणीही असोसिएशननं केलीय.
झी २४ तासनं या सगळ्या प्रकाराचा पर्दाफाश केला होता. दिवसाढवळ्या होणारी ही पेट्रोल चोरी नजरेआड करण्यासारखी नाही. त्यामुळे नक्की डुप्लीकेट चाव्या कोण तयार करतं, कोणाच्या आशीर्वादानं हे धंदे सुरू आहेत, हे शोधून काढणं अत्यावश्यक झालंय.
First Published: Saturday, December 17, 2011, 11:28