Last Updated: Monday, October 3, 2011, 16:42
झी 24 तास वेब टीम, मुंबई महाराष्ट्रातील मुठभर मुजोर रिक्षाचालक. त्यांची मुजोरी ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. काही मुठभरांमुळेच साऱ्या रिक्षाचालंकावरच आज प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. परिवहन विभागानं केलेल्या कारवाईत बोगस मीटरचा पर्दाफाश झाला. दुर्दैवाने या कायदेशीर कारवाईनंतर, रिक्षाचालकांनी बेकायदेशीर संपाचा मीटर डाऊन केला.

हे रिक्षांचे मीटर्स मुंबईतील परिवहन विभागाच्या पथकाने एका कारवाईत जप्त केले आहेत. कारण याच मीटरच्या माध्यमातून मुंबईतील लाखो प्रवाशांची लूट करण्यात येते. रिक्षाचालकांनी या मीटरमध्ये हेराफेरी करुन त्याचा वेग वाढवीला होता. त्यामुळं रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशावर दिवसाढवळ्या दरोडा टाकला जात होता. आणि त्याची खबरही प्रवाशाला लागत नव्हती. पण परिवहन खात्याकडे याप्रकरणी तक्रारी दाखल झाल्यानंतर त्यांची दखल घेत मुंबईच्या उपनगरातील रिक्षांच्या मीटरची तपासणी केली. त्यासाठी आरटीओकडून पथक तयार करण्यात आली होती.
एका दिवसात 175 रिक्षांचे मीटर्स परिवहन विभागाच्या पथाकने तपासले असता मोठी धक्कादायक माहिती समोर आली. 75 पैकी 97 मीटर्समध्ये फेरफार करुन त्याचा वेग वाढविण्यात आल्याचं उघड झालं. परिवहन विभागाने केलेल्या तपासणीत रिक्षा चालकांनी मीटरचा वेग वाढविण्यासाठी विविध युक्त्यांचा वापर केल्याचं उघड झाल. रिक्षाचालक बेमालूमपणे मीटरमध्ये हेराफेरी करतात आणि त्याचा भुर्दंड प्रवाशांना सहन करावा लागतो. मुंबईच्या उपनगरात जवळपास एक लाखाहून अधिक रिक्षा रस्त्यावर धावत असून त्यापैकी किती रिक्षांच्या मीटरमध्ये हेराफेरी करण्यात आली असेल याचा अंदाज सहज लावता येईल.
मुठभर अडेलतट्टू रिक्षावाल्यांच्या आडमुठेपणामुळे समस्त रिक्षाचालकांवर ठपका ठेवण्यात येतोय. म्हणूनच फेसबुकवरुन जेव्हा रिक्षाला नकार अभियान चालवण्यात आले तेव्हा तुफान प्रतिसाद मिळाला. मुंबईच्या उपनगरात जवळपास रिक्षांची संख्या जवळपास एक लाखाहून अधिक आहे.. तसेच मुंबईला लागून असलेले ठाणे, डोंबिवली, कल्याण या शहरातही सर्वसामान्यांसाठी रिक्षा हे हक्काचं वाहन आहे. रिक्षावाल्यांच्या या मुजोरीविरोधात तक्रार करायला कुणीच पुढे येत नाही, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करता येत नाही, असं परिवहन विभागाचं म्हणण आहे.
परिवहन विभागाकडून अशा रिक्षाचालकांविरोधात कारवाई सुरु केल्यामुळं रिक्षाचालकांनी अघोषीत संपाचं हत्यार उपसले आहे. रिक्षा चालकांच्या या मुजोरीला प्रवासीही चांगलेच वैतागले आहेत.. या अघोषित संपाविषयी प्रवाशांना काहीच माहिती नव्हती. रस्त्यावर रिक्षा नसल्यामुळं त्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. य़ा सगळ्या प्रकरणात सामान्य प्रवासी मात्र भरडला जात असून रिक्षाचं भाडं देवूनही प्रवाशाला मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मुंबई उपनगरात रिक्षाचालकांकडून केल्या जाणाऱ्या मनमानीच्या विरोधात परिवहन खात्याने ही मोहीम उघडली असून तक्रार आल्यानंतर संबंधीत रिक्षा चालकावर कारवाई करण्यात येणार असल्याचं परिवहन विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
First Published: Monday, October 3, 2011, 16:42