आजी आजोबांना राहयचयं 'लिव्ह-इन' मध्ये - Marathi News 24taas.com

आजी आजोबांना राहयचयं 'लिव्ह-इन' मध्ये

www.24taas.com, नागपूर
 
आयुष्याच्या संध्याकाळी एकट्या असलेल्या किंवा जोडीदार सोडून गेलेल्या आजी-आजोबांना लिव्ह-इन रिलेशनशिपच्या धर्तीवर जोडीदारांची गरज भासते आहे. नागपुरात या धर्तीवर मंडळ स्थापन करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. या निमित्तानं कित्येक आजी-आजोबांनी नवा जोडीदार शोधायला सुरुवात  केली आहे.
 
प्रेमाची किंवा जोडीदाराची गरज फक्त तरुणपणीच भासते, असं जर कुणाला वाटतं असेल तर ते साफ चुकीचं आहे.  साठी, सत्तरी ओलांडलेल्या आजी-आजोबांना आपल्या एकटेपणावर मात करण्याची नेहमीच गरज वाटते. कारण आयुष्य जसजसं अस्ताकडं प्रवास करतं, तसतशी एकटेपणाची छाया अधिकच गडद होत जाते. अशा आजीआजोबांचा एकटेपणा  घालवण्यासाठी नागपुरात एका मंडळाची स्थापना होते आहे.
 
सात जन्म साथ देण्याची शपथ घेणारा जोडीदार जेव्हा आयुष्याच्या मध्यंतरी सोडून जातो, तेव्हा एकट्याचं आयुष्य सुनं आणि भकास वाटायला लागतं आणि मग प्रश्न पडतो की हा एकटेपणा घालवायचा कसा? वृद्धांना एकत्र आणण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या या मंडळाच्या नियमित बैठका होणार आहेत. या मंडळाच्या माध्यमातून एकाकी असलेले ज्येष्ठ नागरिक आपला जोडीदार निवडतील आणि ही सांज की दुल्हन या आजी-आजोबांच्या आयुष्यात पुन्हा रंग घेऊन येईल, ही अपेक्षा.
 
 

First Published: Monday, January 23, 2012, 21:10


comments powered by Disqus