ठाण्यात आघाडीत शेवटपर्यंत रस्सीखेच - Marathi News 24taas.com

ठाण्यात आघाडीत शेवटपर्यंत रस्सीखेच

www.24taas.com, ठाणे
 
ठाणे महापालिका निवडणुकीत झालेली काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील आघाडी केवळ दोन तीन जागांचा तिढा न सुटु शकल्याने तुटणार का ? हा प्रश्न निर्माण झाल्याने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्या दोन वाजता चर्चा होणार असल्याचं समजतं.
 
एकीकडे काँग्रेसने परस्पर उमेदवारांची यादी जाहीर केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण आहे तर दुसरीकडे अद्यापही दोन-तीन जागांबाबत वाद कायम आहे. आता उमेदवारी अर्ज भरायला जेमतेम तासाचा अवधी उरला असताना शेवटच्या क्षणापर्यंत वाटाघाटी सुरु आहेत.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आ.जितेंद्र आव्हाड यांनी झी २४ तासशी बोलताना सांगितलं की आघाडी कोणत्याही परिस्थिती तुटणार नाही या अफवा एक असंतुष्ट गट पसरवत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आघाडी झाल्याने आनंदाचे वातावरण आहे.
 
 तसंच उमेदवारी अर्ज भरण्यासर फक्त एक तासाचा कालावधी उरला असला तरी उद्या एबी फॉर्म देऊन पक्षाची अधिकृत उमेदवारी निश्चित करता येईल त्यामुळे काळजीचे कारण नाही. ज्या प्रभागांमध्ये उमेदवारी निश्चित झाली आहे त्यांना अर्ज भरण्याचे निर्देश देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. वादग्रस्त दोन तीन जागां संदर्भातील अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी घेतला असल्याचंही आव्हाड म्हणाले.
 
ठाणे शहर काँग्रेसचे नेते मनोज शिंदे यांनीही आघाडीत बिघाडी झालं नसल्याचं सांगतानाच आघाडी झाल्यामुळे शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचं सांगितलं.
 
 

First Published: Tuesday, January 31, 2012, 15:45


comments powered by Disqus