Last Updated: Wednesday, March 7, 2012, 10:59
www.24taas.com, लखनौ उत्तर प्रदेशमध्ये सत्ता शाबूत ठेवून पंतप्रधानपदाची महत्वकांक्षा बाळगणाऱ्या मायावतींना सत्तेतून पायउतार व्हावं लागलं आहे. सामाजिक अभिसरणाचा म्हणजेच सोशल इंजिनिअरींगचा अभिनव प्रयोग करत सत्तेत आलेल्या मायावतींना या निवडणुकीत ओबीसीसह सवर्ण समाजानं साथ दिली नाही. त्यात मुस्लिमांनीही हत्तीला रामराम करत सायकलवरच सवारी करणं पसंत केलं.
‘बहुजन समाज पार्टी’च्या शासनकाळात उत्तर प्रदेशातल्या दलितांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण झाली असली तरी मायावती मुसलमान आणि इतर समाजामध्ये विश्वास निर्माण करु शकल्या नाहीत. सोशल इंजिनिअरींगचा अभिनव प्रयोग करत २००७ मध्ये मायावतींनी इतर समाजाची मते बसपाकडं वळवली होती. 'हाथी नही गणेश है, ब्रम्हा, विष्णू महेश है', अशी घोषणा देणाऱ्या मायावतींनी ब्राम्हणांना आपल्या बाजूने वळविले होते. मंत्रिमंडळातही सवर्ण वर्गाचं प्रतिनिधीत्व होतं. यंदाच्या निवडणुकीत मात्र सवर्ण जाती आणि ओबीसी वर्गानं मायावतींना हरवायचं या उद्देशानं मतदान केलं. पाच वर्षांपूर्वी बसपाला भरभरुन मतं देणाऱ्या या वर्गांना आता बसपाची सत्ता नको होती. या वर्गाच्या मनात तयार झालेल्या असुरक्षिततेच्या भावनेमुळेच त्यांना मायावतींची सत्ता नकोशी झाली होती.
अनूसुचित जाती-जमाती कायदा फक्त दलित जातीसाठी सुरक्षा कवच बनला. या कायद्याचा काही अंशी दुरुपयोग झाला. त्यात सरकारी वकील सारख्या काही पदांवर दलितांची वर्णी लागली. त्यामुळं उच्च जातींमध्ये सरकार विरोधात रोष निर्माण झाला. ‘महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार’ कायद्यान्वये फक्त दलितांनाच कामे मिळाली. त्यामुळे जमिनदारांना मजुर मिळानासे झाले. त्यांची मजुरीही वाढली. त्यामुळे जमीनदार वर्ग मायावतींना शेतकरी विरोधी मानायला लागला. अशा काही कारणांमुळे उच्च जातींनी मायावतींवर टाकलेला विश्वास डळमळीत व्हायला लागला. त्याचे परीणाम या विधानसभा निवडणुकीत पहायला मिळाले.
यापूर्वीच्या प्रशासनाची तुलना करता मायावतींनी वाईट प्रशासन दिलं नाही. उलट त्यांच्या काळात उत्तरप्रदेशात कर आणि कर्जाची वसूली अधिक प्रभावीपणे झाली. मात्र त्यामुळेही मनमानी करणारा वर्ग नाराज झाला. प्रतीक आणि घोषणांच्या राजकारणातून मायावती बाहेर आल्या नाहीत. निवडणूकीच्या आधी महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटना, वेगवेगळ्या गुन्हांमुळे मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांची हकालपट्टी झाली. त्यामुळे सरकारची प्रतिमा डागाळली. त्याचाही फटका मायावतींना बसला.
आपल्या वाढदिवसाला कार्यकर्त्यांकडून कोट्यवधींची माया जमा जमवणाऱ्या मायावतींचा तळागाळाशी संपर्क कमी झाला. मायावतींसह पक्षचिन्ह हत्तींच्या पुतळ्यांवर हजारो कोटींचा खर्च अनेकांना रुचला नाही. त्यामुळेच मायावतींना पुन्हा संधी देण्यास दलित वगळता इतर समाज तयार नव्हता. त्याचा परिणाम या निवडणुकीत दिसून आला. भविष्यात बसपाला दीर्घकाळासाठी राजकारण करायचं असल्यास बहुजनांबरोबरच ब्राम्हण आणि मुस्लीमांमध्ये विश्वास निर्माण करणं गरजेचं आहे.
कुमारी मायावती वय वर्षे- ५६बहुजन समाज पार्टी शिक्षण- दिल्ली विद्यापीठ
मेरठ विद्यापीठ
मायावतींच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख म्हणजे निवडणुकांच्या राजकारणातल्या अनिश्चिततेचे उत्तम उदाहरण आहे.एप्रिल १९९४मायावतींची उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर निवड. बहुजन समाज पार्टीचे संसदेच्या वरिष्ठ सभागृहात पदार्पणमुलायम सिंह यादवांच्या समाजवादी पार्टी आणि बसपाने एकत्र निवडणूक लढवत भाजपचा पराभव केला. काँग्रेस आणि जनता दलाच्या पाठिंब्यावर मुलायम सिंह मुख्यमंत्री झाले
नोव्हेंबर १९८९सार्वत्रिक निवडणुकीत मायावतींनी बिजनोर लोकसभा मतदासंघातून विजय मिळवला. बहुजन समाज पार्टीची लोकसभेत एण्ट्री
त्यावेळेस नारायण दत्त तिवारी मुख्यमंत्री होते. मायावतींचा उदय आणि काँग्रेसच्या अस्ताची सुरुवात झाली होती. काँग्रेस त्यानंतर उत्तर प्रदेशात कधीच सत्ता काबीज करु शकली नाही
जून १९९५ मायावतींनी देशात कोणत्याही राज्यात पहिल्यांदा दलित समाजातून मुख्यमंत्रीपदी आरुढ होण्याची कामगिरी करुन दाखवली. मायावती वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी मुख्यमंत्री झाल्या. उत्तर प्रदेशात सर्वात कमी वयात मुख्यमंत्री होण्याचा विक्रमही मायावतींनी केला.मायावतींची मुख्यमंत्रीपदाची कारकिर्द अवघी चार महिनेच टिकली. पण मायावतींचा राजकारणात उदय झाला होता
मार्च १९९७उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री दुसऱ्यांदा मायावती विराजमान झाल्या. यावेळेस त्या सहा महिने मुख्यमंत्रीपदावर टिकू शकल्या. मायावतींनंतर भाजपने सत्ता काबीज केली त्यानंतरच्या पाच वर्षात उत्तर प्रदेशने पाच मुख्यमंत्री पाहिले.
मे २००२मायावतींनी तिसऱ्यांदा उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रीपद कार्यभार सांभाळला. त्या आधी एक वर्ष कांशीराम यांनी मायावतींना राजकीय वारस म्हणून घोषित केलं होतं.
मायावतींनी भाजपबरोबर आघाडी करत सरकार स्थापन केलं. मायावतींचे राजकीय कसब प्रकर्षाने दिसून येऊ लागलं होतं, बसपाची सर्व सूत्रं त्यांनी हाती घेतली होती
मे २००७सर्व अंदाज, भाकितं चुकीची ठरवत मायावतींनी चौथ्यांदा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम केला. यावेळेस बसपाला पूर्ण बहुमत प्राप्त झालं होतं.मायावतींनी ब्राह्मण आणि मुस्लिम समाजाला जवळ करत राजकीय प्रगल्भतेचं दर्शन घडवलं. मुस्लिम आणि ब्राहमण तसंच उच्च वर्णीयांना अधिक संख्येने उमेदवारी देत जबरदस्त राजकीय खेळी मायावती खेळल्या.
First Published: Wednesday, March 7, 2012, 10:59