Last Updated: Wednesday, March 28, 2012, 13:59
www.24taas.com, मुंबई
काँग्रेसचे टार्गेट अजितदादा घरगुती गॅसच्या प्रस्तावीत दरवाढी विरोधात काँग्रेसने दंड थोपटले आहेत...सत्तेत असतांनाही काँग्रेसने विरोधकांच्या सुरात सूर मिसळलाय.. ही दरवाढ मागे घ्यावी यासाठी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी थेट मुख्यमंत्र्यांकडं साकडं घातलं आहे
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी विधानसभेत अर्थ संकल्प सादर करतांना घरगुती गॅसच्या दरात 5 टक्के दरवाढ प्रस्तावीत केली...मात्र त्यानंतर विरोधकांसह सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेस पक्षाने त्या दरवाढीचा विरोध केला..अर्थमंत्र्यांनी प्रस्तावीत केलेली घरगुती गॅसची दरवाढ अन्यायकार असल्याचं काँग्रेसने म्हटलं...घरगुती गॅस दरवाढीच्या निमित्ताने काँग्रेसने अजित पवारांना कोंडीत पक़डण्याचा प्रयत्न केला....काँग्रेसच्या या खेळीमागे जिल्हापरिषद निवडणुकांचं कारण असल्यांचही बोललं जातंय.. जिल्हारिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला धोबीपछाड दिल्यामुळे आघाडीत कटूता आलीय..अशातच घरगुती गॅसवर पाच टक्के कर अकारणीचा प्रस्ताव अजित पवारांनी मांडल्यामुळं काँग्रेसच्या हाती आयताच मुद्दा मिळाला आहे..या मुद्द्यावरुन दोन्ही काँग्रेसमध्ये संघर्ष पेटला आहे.
अजित पवारांनी घरगुती गॅस दरवाढीचं समर्थन केलं आहे...या अर्थसंकल्पाला मंत्रीमंडळाची मान्यता असल्याचं सांगत हा निर्णय मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसच्या मंत्र्यांना मान्य असल्याचं सांगितलंय....मात्र काँग्रेसने अजित पवारांनाच निशाण्यावर घेतलंय... अजित पवारांनी प्रस्तावीत केलेल्या गॅस दरवाढीला विरोध करुन आपण जनतेसोबत असल्याचं दाखवून देण्याचा प्रयत्न काँग्रेसने केलाय...काँग्रेसने या खेळीत एका दगडात दोन पक्षी मारले आहेत...घरगुती गॅस दर वाढीला विरोध करुन जनतेची सहानभूती मिळविण्याचा प्रयत्न केलाय तसेच अजित पवारांनाही कोंडीत पकडलं आहे..
जिल्हा परिषद निवडणुकीचे पडसाद गॅसच्या मुद्यावरुन काँग्रेसने अजितदादांना घेरण्याचा प्रयत्न केला असला तरी नुकतेच पार पडलेल्या झेडपीच्या निवडणुकींची त्याला किनार तर नाही ना ? अशी शंका व्यक्त केली जात आहे...कारण त्या निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसला चकवा दिला आहे. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अशा प्रकारे कलगीतुरा रंगला होता..दोन्ही काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले.
जिल्हापरिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला ऐनवेळी कात्रजचा घाट दाखवला..राज्यातील 26 पैकी 13 जिल्हापरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसने आपला अध्यक्ष निवडून आणण्यात यश मिळवलं...त्यासाठी त्यांनी आपल्या राजकीय विरोधकांची मदत घेतली...भाजप, शिवसेना आणि मनसे यांच्या साथिनं राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत अव्वल नंबर पटकावला...राष्ट्रवादी काँग्रेसची ही राजकीय खेळी काँग्रेसच्या चांगलीच जिव्हारी लागली. खरं तर जिल्हापरिषदेच्या निवडणुका पार पडल्यानतर दोन्ही काँग्रेसने आघाडी करण्याचा निर्णय केला होता..दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली असती तर काँग्रेसचे 13तर राष्ट्रवादीचे 9 ठिकाणी अध्यक्ष निवडून आले असते..मात्र कुरघोडीच्या राजकारणात आघाडी होवू शकली नाही..त्याचा काँग्रेसला मोठा फटका बसला...विशेषत: विदर्भात काँग्रेसच्या हातातोंडाशी आलेला घास राष्ट्रवादीने पळवलाय.. विदर्भात काँग्रेसला मोठं यश मिळालं होतं...पण राष्ट्रवादीच्या खेळीमुळे सातपैकी केवळ दोन जिल्हापरिषदांमध्ये काँग्रेसला अध्यक्षपद आणि एका ठिकाणी उपाध्यक्ष पद मिळवता आलंय़...काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या यवतमाळ जिल्हापरिषदेत राष्ट्रवादीने काँग्रेसला सत्तेपासून दुर ठेवलं आहे..राष्ट्रवादी काँग्रेसने त्यासाठी भाजप,शिवसेनेची मदत घेतलीय..चंद्रपूर आणि गडचिरोलीत काँग्रेस सत्तेजवळ असतांनाही राष्ट्रवादी काँग्रेसने अध्यक्षपद पटकावलं आहे..अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणावर विखे आणि थोरात या काँग्रेसच्या नेत्यांची पकड असतांनाही राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष निवडून आला आहे...नागपूरमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा देवून काँग्रेसला अध्यक्ष पदापासून दूर ठेवलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या राजकीय खेळीने काँग्रेस चांगलीच घायाळ झाली होती..मात्र आता अर्थसंकल्पाच्या निमित्ताने काँग्रेला उट्टे काढण्याची आयतीच संधी चालून आली आहे... अजित पवारांनी घरगुती गॅससाठी 5 टक्के दरवाढ प्रस्तावीत करताच काँग्रेसने त्याचा विरोध केला... जिल्हापरिषद निवडणुकांचं उट्टे काढण्याचा प्रयत्न तर काँग्रेसकडून केला जात नाही अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
राज्य शिखर बँक बरखास्ती काँग्रेस - राष्ट्रवादीतील वाद काही नवा नाही ..हे दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र असले तरी त्यांच्यात अनेक वेळा वाद झाला आहे..राज्य सहकारी बँकेच्या बरखास्तीवरुनही अजित पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यात तु... तु ...मै...मै.. झाली होती.. राज्य सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करण्याच्या रिझर्व बँकेच्या निर्णयानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अशी जुंपली होती..मुख्यमंत्री विरुद्ध उपमुख्यमंत्री असा राजकीय सामना रंगला होता.
राज्य सहकारी बँक बरखास्त करण्याच्या निर्णयामागे काँग्रेसचा हात असल्याचा थेट आरोप अजित पवारांनी केला होता..तर पृथ्वीराज चव्हाणांनीही त्याचा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसला उत्तर दिलं होतं...हा वाद रंगण्यामागं राष्ट्रवादी काँग्रेसचं राज्य सहकारी बँकेवर असलेलं वर्चस्व कारणीभूत होतं..राज्य सरकारकडं राज्य सहकारी बँकेचे 270 कोटी रुपये बाकी होते..ती रक्कम अजित पवारांनी बँकेला मिळवून दिली होती....तसेच गेल्या 10 वर्षात बँकेला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला होता..मात्र राज्य सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय रिझर्व बँकेनं घेतला होता..तो निर्णय राष्ट्रवादीच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. कारण रिझर्व बँकेनं तो निर्णय घेतला असला तरी प्रशासक सुचविण्याची मान्यता राज्य सरकारने दिली होती..ही प्रक्रिया पार पाडतांना राष्ट्रवादी काँग्रेसला अंधारात ठेवण्यात आलं होतं..राज्य सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्तीचा निर्णय आल्यानंतर काँग्रेसने सुरुवातीला बचावात्मक भुमिका घेतली होती..मात्र त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कडक शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसला सुनावले...राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून राज्यातील सहकारी क्षेत्रावर राष्ट्रवादीने पकड निर्माण केली होती..ती पकड ढिली करण्यासाठी काँग्रेसने बरखास्तीची खेळी केली..राज्य सहकारी बँकेवर प्रशासक नेमल्यामुळं राष्ट्रवादीच्या जोखडातून अनेक सहकारी संस्था आणि पर्यायाने त्यांचे नेते मुक्त होतील असा काँग्रेसचा व्होरा होता..काँग्रेसच्या या खेळीमुळे राष्ट्रवादीचे नेते चांगलेच अस्वस्थ झाले होते..दोन्ही काँग्रेसमध्ये तणाव वाढला होता..आघाडी तुटणार तर नाही ना अशी शक्यता व्यक्त केली जात होती.. मात्र कितीही वाद झाला तरी सत्ता सोडायची नाही हे सूत्र दोन्ही काँग्रेसने जपल्यामुळं कालांतराने तो वाद शमला. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु झालेल्या कुरबुरी मागे राज्याबरोबरच केंद्रातील राजकारण कारणीभूत तर नाही ना ? अशी शंका आता व्यक्त केली जात आहे...कारण काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधानांच्या एका वक्तव्यावर तिव्र शब्दात नापसंती व्यक्ती केली होती.
काँग्रेसने अजितदादांना कोंडीत पकडलं घरगुती गॅसच्या दरवाढीच्या प्रस्तावावरुन काँग्रेसने अजित दादांना घेरण्याचा प्रयत्न केलाय....प्रस्तावीत दरवाढ मागे घ्यावी म्हणून मुख्यमंत्र्यांची भेट घेतलीय...काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकप्रकारे शहकाटशहाचं राजकारण पुन्हा एकदा सुरु झालंय...2014च्या विधानसभा निवडणुका डोळ्या पुढे ठेवून दोन्ही काँग्रेस कडून श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला जात असून त्यातूनच हा वाद सुरु असल्याचं जाणकारांना वाटतंय..दोन्ही काँग्रेसमध्ये सुरु झालेल्या या संघर्षाला नुकतेच पार पडलेल्या पाच राज्यातील निवडणुकांची किनार असल्याचं काही राजकीय़ जाणकारांच म्हणणं आहे....
पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मोठा धक्का बसल्यामुळं यूपीएतील इतर पक्षांनीच काँग्रेसला टार्गेटवर घेतलं आहे.त्यात राष्ट्रवादी काँग्रेसही मागे नाही...पंतप्रधानांनी घटपक्षांबाबत केलेल्या एका वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी नापसंती व्यक्त केली ... पवारांनी थेट मनमोहन सिंगांनाच टार्गेट केल्यामुळं काँग्रेस बुचकळ्यात पडली...पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल या मागे असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं जाणकारांना वाटतंय. काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक वाद झाले आहे...एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न दोन्ही बाजून झाला आहे..मात्र सत्तेसाठी दोन्ही काँग्रेसने शेवटी एक पाऊल मागे घेण्याचं सूत्र नेहमीच अवलंबलं आहे...यावेळीही तेच सूत्र अवलंबल जाण्याची दाट शक्यता आहे..
First Published: Wednesday, March 28, 2012, 13:59