रायगडात पाण्याचा दुष्काळ - Marathi News 24taas.com

रायगडात पाण्याचा दुष्काळ

 भरत गोरेगावकर www.24taas.com, अलिबाग

 
कोकणात पाण्याचा दुष्काळ म्हंटलं तर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसेल. कारण इथं पाऊस चांगला होते पण उन्हाळ्यात मात्र पाण्याचा खडखडात असतो...शासकीय अनस्थामुळे कित्येक गावं, वाड्या, पाडे आजही तहानलेलेच आहेत. जिथं सुस्त प्रशासनला पाझर फुटत नाही तिथे निसर्गच गावच्या मदतीला धावून येतो...अशाच एका गावाची ही व्यथा.
 
 
कोकण म्हटंल की डोळ्यासमोर येतो तो निळाशार समुद्र..तिथल्या नारळी-पोफळीच्या बागा...निसर्गाचं वरदान लाभलेल्या कोकणचं वैभव कुणालाही हेवा वाटेल असच आहे. पण याच कोकणाला दुसरीही एक बाजू आहे...आजही इथं अशी अनेक गावं, पाडे आहेत जिथं पाण्यासाठी दाहीदिशा वणवण करायला लागतीय..पोलादपूर तालुक्यातल्या दुर्गम भागातील महादेवाचा मुरा या गावाची व्यथा तर कुणाच्याही -हदयाला पाझर फोडेल अशीच आहे...इथं लोकवस्ती आहे पण रस्ते नाहीत..रस्ते नाहीत त्यामुळे कोणत्या सुविधाच गावात पोहचल्या नाहीत. रामभरोसे जीवन जगणा-या इथल्या गावक-यांना जणू शासनानं वाळीतच टाकलंय. त्यात भरीस भर म्हणून की काय पाणीटंचाईचं अस्मानी संकट गावक-यांवर कोसळलयं. खरं तर ही समस्या आजची नाही..पिढ्यानं पिढ्या इथं पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे. पण ना त्याची राजकारण्यांना तमा, ना शासकीय अधिका-यांना....जिथं यंत्रणेलाच पाझर फुटत नाही तिथे निसर्गच मदतीला धावून येतो आणि इथल्या दगडालाही पाझर फुटतो.
 
 
हा दगड म्हणजे इथल्या गावक-यांचं जीवन आहे. या दगडातून पाझरणारी हाच त्यांच्यासाठी मोठा आधार आहे. पण हे पाणी मिळवण्यासाठी त्यांना रात्रोनं रात्र जागावं लागतं. तास-तासभर थांबून क्रमा-क्रमानं पाणी भरावं लागतं...जंगली श्वापदांची आणि सापांची भीती असतेच पण पाण्यासाठी हा सोस सहन करावा लागतोच. तहानेनं व्याकुळलेल्या या गावात राजकारणी येतात ते फक्त मतांचा जोगवा मागण्याकरता...आश्वासनांच्या खिरापतीपलिकडे गावक-यांच्या पदरी काहीच पडलेलं नाही. सरकारी बाबूंचा कारभार त्याहून वेगळा नाही...पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कागदी घोडे नाचवणा-या सरकारी बाबुंच्या लेखी या गावाचा पत्ताच नाही. आडात नाही तर पोह-याच कुठून येणार अशीच काहीशी गत या गावाची झालीय.
 
 
 
महादेवाचा मुरा या गावात दगडातून अवतरलेली गंगा काही दिवसात आल्या वाटेनं परत जाईल आणि पाऊस पडेपर्यंत घोटभर पाण्यासाठी ग्रामस्थ दाहीदिशा फिरतील. इतक्या वर्षांचा त्रास अंगवळणी पडल्यामुळे त्यांना याची सवयही असेल. पण मग सरकारनं त्यांना असच वा-यावर सोडावं का ? तहानेनं महाराष्ट्र व्याकूळ झालेला असतांना राजकारणी किती दिवस विकासाचा डंका पिटणार ? गलेलठ्ठ पगार घेणा-या सराकारी बाबूंना दयेचा पाझर कधी फुटणार ? याचं उत्तर मिळाल्याखेरीज लाखो माऊलींच्या पदरी आलेलं हे दुष्टचक्र संपणार नाही.
 

First Published: Friday, April 13, 2012, 09:55


comments powered by Disqus