महाराष्ट्र एक पाऊल पुढे - Marathi News 24taas.com

महाराष्ट्र एक पाऊल पुढे

www.24taas.com, मुंबई
 
अजी सोनियाचा दिनू...असंच आजच्या दिवशी म्हणावं लागेल. विकास साधणारा एक स्फोट आज महाराष्ट्रानं देशाला समर्पित केला. कोयनेच्या पात्रात दुसरं लेक टॅपिंग यशस्वी करून महाराष्ट्रातल्या अभियंत्यांनी आज नवा इतिहास घडवला....
 
अवघ्या महाराष्ट्राचा श्वास रोखला होता.. त्या एका क्षणासाठी, मराठी अभियंत्यांच्या त्या विलक्षण कामगिरीसाठी.. आशिया खंडातल्या दुस-या लॅक टॅपिगंचा इतिहास घडत असताना, साक्षीदार होण्यासाठी कोयनेचं अथांग पात्रच नव्हे तर साक्षात काळही थबकला होता.. आणि ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत होतो तो क्षण जवळ आला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानी कळ दाबली, आणि अथांग जलसागरातून उसळी घेत पाणी आसमंतात उडाले.. ती उसळी केवळ पाण्याची नव्हती.. ते कारंजे होते महाराष्ट्राच्या प्रगतीचे.. नव्या पर्वात नेण्यासाठी सज्ज असलेल्या महाराष्ट्राच्या नव्या दमाच्या अभियंत्याच्या क्षमतेचे.. आणि तहानलेला महाराष्ट्र सिचंनाखाली आणण्यासाठी सुरु झालेल्या नव्या पर्वाचे.. मराठी अभियंत्यांनी केवळ कोयनेच्याच नाही तर महाराष्ट्राच्या विकासासाठी पाहिलेल्या स्वप्नांना पाण्यानं उसळी घेऊन धुमारे फुलवले... एक जलक्रांती घडवली...
 
यशवंतराव चव्हाणांच्या विकासदृष्टीतून कोयना जलप्रकल्प साकारला गेला. या प्रकल्पाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात झालेल्या या दुस-या लेक टॅपिंगमुळे महाराष्ट्राच्या विकासाला आणखीनंच चालना मिळणार आहे. आणि नेमका हाच विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या बोलण्यातून व्यक्त केला.
 
भूपृष्ठावरुन केवळ पाण्याची उसळी दिसत असली तरी यामागे राबणारे हात गेली अनेक वर्ष राबत होतं. 13 मार्च 1999 ला कोयनेच्या पात्रात नॉर्वेच्या तंत्रज्ञानावर आधारित पहिले लेक टॅपिंग झाले होते. त्या लेक टॅपिंगमुळे कोयनेच्या जलसंचयात वाढ झाली होती.. मात्र त्यानंतर पाण्याचा साठा आणि मागणी यात फरक असल्यानं पुन्हा लेक टॅपिंगची गरज निर्माण झाली होती. यासाठी कोयनेच्या भूगर्भाखाली एक बोगदा तयार करुन लेक टॅपिंग करण्यात आल.
 
यापुर्वी म्हणजे 1999 मध्ये समुद्रसपाटीपासून 618 मीटरवर लेक टॅपिंग करण्यात आलं होतं. यावेळी 606 मीटरवर लेक टॅपिंग करण्यात आलं. यासाठी साडेचार किलोमीटर लांबीचा बोगदा करण्यात आला. कोयनेच्या जलाशयाखाली बोगदा तयार करताना अनंत अडचणी होत्या. त्यातही बोगदा तयार करत असताना जलविद्युत प्रकल्पाला कुठलाही अडथळा निर्माण होवू नये याची दक्षता घेण्याची जोखीम होती. लेक टॅपिंगच्या एका स्फोटासाठी सुमारे दहा कोटीचा खर्च आलाय. पण त्यापेक्षाही पैशात न मोजता येणारी मेहनत ही मुख्य अभियंता दीपक मोडक आणि त्याच्या सहका-यानी केली. तंत्रज्ञानाच्या मदतीनं सर्व अडचणीवर मात करत हा प्रयोग यशस्वी करणा-या मराठी अभियंत्याचे कौतूक कराव तेवढ थोडंच.

कोयनेच्या पात्रात तब्बल तेरा वर्षानी पुन्हा लेक टॅपिंग करण्यात आले. फक्त आठ सेकंदात स्फोट घडवण्यात जलाशयातील पाणी बोगद्यात आणण्यास अभियंते यशस्वी झाले आहेत. या महत्वाकांक्षातील  प्रकल्पामुळे उन्हाळ्यातील हजार मेगावॅटची वीजनिर्मिती तसच दुष्काळी भागातील पाण्याची गरजही भागणार आहे. महाराष्ट्राच्या विकासरेषा तपासताना 1999 चा पहिला आणि 2012 चा दुसरे लेक टॅपिंग हे महत्वाचं ठऱणार आहे...
 
महाराष्ट्राची वीजेची वाढती गरज आणि विद्युत पुरवठ्याचा असलेला तुटवडा हे दुष्टचक्र भेदण्याची ताकद आहे ती फक्त कोयनेच्या पाण्यात.. 1962 पासून महाराष्ट्र सुजलाम सुफलाम नाही तर प्रकाशमान करण्यासाठी कोयनेच्या पाण्याचा फार मोठा वाटा आहे. 1962, 1967, 1975 अशा तीन टप्यात वीज निर्मीती वाढवण्यात आली. त्यानंतर सुरु झाला तो चौथ्या टप्प्याच्या पर्यायाचा विचार..  टप्पा क्रमांक 1 आणि 2 ला समांतर अशा एक हजार मेगावॅट क्षमतेच्या टप्पा क्रमांक 4 ची मागणी 1985 साली मांडण्यात आली. पण लालफितीतून बाहेर पडायला दहा वर्ष उलटावी लागली.
 
1995 साली शिवसेना - भाजप युतीचे सरकार सत्तेवर आल्यावर कृष्णा पाणी वाटप लवादाच्या निवड्यानुसार 1996 साली कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना झाली.  आणि त्यानंतर चौथ्या टप्प्याच्या कामास ख-या अर्थानं वेग आला.  1999 मध्ये चौथ्या टप्प्यांसाठी लेक टॅपिंगचा निर्णय करण्यात आला. यामुळे विजनिर्मितीत एक हजार मेगावॅटची वाढ झाली. आणि एकूण वीजनिर्मिती ही 1960 मेगावॅट झाली. लेक टॅपिंगच्या दूरगामी धोरणामुळेच कोयनेतल्या पात्राची संचय पातळी वाढली. केवळ एवढच नाही तर कोयना धरणाची एकूण साठवण क्षमता ही 105.25 टीएमसीवर वर पोहोचली. 1999 च्या लेक टॅपिंगच्या यशस्वी प्रयोगामुळे आणि पाण्याच्या वाढलेल्या मागणीमुळे चौथ्या टप्प्याच्या ब मार्गासाठी लेक टॅपिंगची आवश्यकता पुन्हा एकदा तीव्र झाली.
 
लेक टॅपिंगमुळे सिंचनासाठी 20 टीएमसी अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे. कोरना धरणाचा सध्याचा उपलब्ध पाणीसाठा 105.25 टीएमसी असून त्यात वाढ अपेक्षित आहे. त्यापैकी 23 टीएमसी पाण्याचा सिचंनासाठी तसच इतर नागरी गरजांसाठी वापर होतो. त्याप्रमाणेच उन्हाळ्याच्या दिवसात पात्राच्या जवळच्या दुष्काळी भागाना पाणी पुरवावं लागत त्यामुळे विजनिर्मिती खंडित करण्यात येते. वीज आणि पाणी या दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी लेक टॅपिंगचा पर्याय हा आवश्यक होता.आणि म्हणूनच 2001 पासून अविरत प्रयत्न करुन पुन्हा लेक टॅपिंगसाठी प्रयत्नांना सुरुवात झाली. कोयनाच्या धरणाच्या जलाशयाखाली भूगर्भात साडेचार किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात आला. बोगदा आणि जलाशयातील पाणी यामध्ये असलेला खडकाचा भाग स्फोटकाद्वारे उडवून देण्यासाठी लेक टॅपिंग करण्यात आले. स्फोटामुळे उसळी घेतलेल्य़ा पाण्यानं अभियंत्याच्या अविरत मेहनतीला मुर्तरुप मिळाल आणि जलाशयातील पाणी बोगद्यात आले...
 
1999 च्या तुलनेत यावेळचा लेक टॅपिंग हे जास्त नियोजनबद्ध आणि जलव्यवस्थापनाच्या दृष्टीनं महत्वाचं होत.. यशवंतराव चव्हाण याच्या जन्मशताब्दी वर्षात आणि कोयना धरणाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात महाराष्ट्राला सर्वार्थानं वरदायी ठरलेल्या कोयना प्रकल्पाचा  4 ब हा प्रकल्प देशाला अर्पण होतोय..ही प्रत्येक मराठी मनासाठी अस्मितेची गोष्ट ठरली.
 
“कोयना नदी ही महाराष्ट्राची भाग्यरेषा आहे. तिच्या पाण्यावर महाराष्ट्राची संस्कृती जशी समृद्ध झाली. तशी आता उद्यमशीलता आणि कृषी कारखानदारीही वाढणार आहे. कृष्णा आणि कोयनेच्या संगमावर कल्पकता -उद्योगशीलता यांचाही संगम होईल आणि कोयना धरणातून मिळणारी वीज व पाणी यामुळे या राज्याला अपरंपार समृद्धी लाभेल...” महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यानी कोयनेबद्दल काढलेले हे गौरवोदगार, आज कोयनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातही तंतोतत खरे ठरतायत.. कोयनेच्या पात्रात तेरा  वर्षानंतर झालेल्या लेक टॅपिंगमुळे कोयनेच्या पाण्यालाच नाही तर इतिहासालाही एक नवी झळाळी मिळालीय.. जलविद्युतीचे स्वप्न नजरेसमोर ठेवून 1956 साली सातारा जिल्ह्यात कोयना नदीवर धरणाची कोनशीला बसवली गेली. 98.97 पाणीसाठवण क्षमतेचे हे धऱण 1962 साली पूर्ण झाले.
 
त्याचवेळी 1962 साली कोयना जलविद्युत केंद्राचा पहिला टप्पा कार्यान्वित करण्यात आला.. त्यानंतर पाच वर्षानी 1967 साली दुसरा टप्पा कार्यान्वित करण्यात आला. कोयनेच्या पहिल्या आणि दुस-या टप्यातून पोफळीच्या विद्युतगृहातून 560 मेगावॅट विद्युतनिर्मीती करण्यात आली. कोय़ना जलविद्युत प्रकल्पाचा तिसरा टप्पा 1975 सुरु झाला.  आणि त्यातून कोळकेवाडी धऱणातून 320 मेगावॅट विजनिर्मिती  होतेय..
 
महाराष्ट्राच्या वाढत्या विद्युत मागणीचा विचार करताना, 1985 च्या दरम्यान चौथ्या टप्याची मागणी हळूहळू जोर पकडू लागली.. मात्र त्यानंतर युती सरकार सत्तेवर आल्यावर  कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना करत 1999 साली चौथा टप्पा कार्यान्वित करण्यात आला. कोयनेच्या पात्रात झालेल्या पहिल्या लेक टॅपिगनंतर अलोरे विद्युतगृहातून 1000 मेगावॅट वीजनिर्मिती होतेय..

 
तेरा वर्षापुर्वी झालेल्या या चौथ्या टप्प्याचे महत्व लक्षणीय अशासाठी बनले होते की, एकीकडे विजेची मागणी वाढत चालली होती तर दुसरीकडे त्या प्रमाणात तीची निर्मीती होत नसल्यानं भारनियमनाचे संकट त्रासदायक बनत चाललं होतं..  त्यामुळेच चौथ्या टप्पाच्या ब प्रकल्प कार्यान्वित करण्याची गरज प्रकर्षानं जाणवली .. आणि म्हणूनच लेक टॅपिंगचे शिवधनुष्य मराठी अभिंयत्यानी यशस्वी पेलून दाखवलय...या टप्यासाठी जागतिक बॅकेने दिलेला 1300 कोटींच्या निधीचा वापर करताना प्रचंड मेहनतही पैशापेक्षाही मौल्यवान ठरलीय..
 
चौथ्या टप्यातल्या ब साठी झालेल्या या लेक टॅपिंगमुळे धरणातील पाणीसाठा वळवूनही धरणातील पाण्याची निम्नस्तर पातळी कमी करुनही एप्रिल मे मध्येही आता टप्पा क्रमांक 4 मधुन ती विद्युत निर्मीती चालू राहणार आहे. पण अभियंते केवळ इथच थांबणार नाहीत... चौथ्या टप्यातील यशस्वी लेक टॅपिगंनतर आता वेध लागलेयत ते पाचव्या टप्प्याचे. पाचव्या टप्प्यात ओझर्डे धबधबा आणि कोयना धरणाचा उपयोग करुन आणि 400 मेगावॅट विद्युतनिर्मितीचा प्रस्ताव आता विचाराधीन आहे. कोयनेला महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणतात.. कोयनेच्या पात्रात सुरु असलेल्या या वेगवेगळ्या प्रयोगामुळे ही भाग्यरेषा बळीराजाबरोबरच महाराष्ट्राच्या विकासालाही भाग्यदायी ठरतेय

First Published: Wednesday, April 25, 2012, 23:55


comments powered by Disqus