2013 मध्ये काय घडणार? What will happen in 2013?

2013 मध्ये काय घडणार?

2013 मध्ये काय घडणार?
www.24taas.com, मुंबई

दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेनं २०१२मध्ये संपूर्ण देश हादरुन गेला होता..२०१३मध्ये या प्रकरणातील आरोपींना शिक्षा होणार का हाच खरा प्रश्न आहे..तसेच बलात्कारासारख्या प्रकरणात आरोपीला कठोर शिक्षा व्हावी म्हणून कायद्यात सुधारणा केली जाणार का ?

काळाच्या ओघात दिवस, महिने आणि वर्षही निघून जातात..तसेच २०१२ हे वर्षही सरलं. भयंकर वादळ,भूकंप, राजकीय परिवर्तन, आंदोलनं, दहशतवादी कसाबला फाशी, काही दिग्गज व्यक्तींच निधन,संसदेत गोंधळ..असं बरच काही घडलं....

पण २०१२ची सुरुवात झाली ती चिमुरड्या फलकच्या दुर्दैवी घटनेतून..१८ जानेवारीला दोन वर्ष वयाच्या फलक नावाच्या चिमुरडीला एका मुलीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं...मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा त्यावेळीही गाजला होता. रुग्णालयात ५६ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर १५ मार्च २०१२ला बेबी फलकचा मृत्यू झाला.

या दोन घटनांवर नजर टाकल्यास स्वातंत्र्यानंतर भारताच्या इतिहासात २०१२ या वर्षाची सुरुवात आणि शेवट मुलींच्या सुरक्षेशी संबंधीत दुर्दैवी घटनांनी झाला..जानेवारी महिन्यात फलकच्या घटनेमुळे सगळा देश हादरु गेला तर डिसेंबर महिन्यात दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे जनता रस्त्यावर उतरली.. या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन मुलींचा करुण अंत झाला... महिलांना उपभोग वस्तू समजणा-या काही विकृत व्यक्तिंच्या त्या शिकार ठरल्या..पण २०१२मध्ये घडलेल्या या घटनांमुळे २०१३साठी काही प्रश्न निर्माण केले आहेत..

चालत्या बसमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार आणि पीडित तरुणीच्या मृत्यूनंतर देशातील जनतेचा उफाळून आलेला संताप...या पार्श्वभूमिवर महिलांविषयक कायद्यात सुधारणा करुन कठोर कायदा करण्याची मागणी जोर धरु लागली..फाशी, जलदगती न्यायालय,लैगिंक छळ तसेच बलात्काराची व्याख्या बदलने तसेच न्यायालयीन प्रक्रियेत सुधारणा करण्याची मागणी केली गेली..ही सगळी परिस्थिती पहाता २०१३च्या सुरुवातीला बलात्कारप्रकरणी कायद्यात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही..या संदर्भातल्या नव्या कायद्याचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी न्यायमुर्ती जे.एस. वर्मा यांच्या समितीवर सोपवण्यात आलीय..सरकारने राजकीय पक्षांकडून सूचना मागवल्या आहेत..

२०१२मध्ये घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे जनतेचा रोष राजकारण्यांना पहायला मिळाला..त्यामुळेच सत्ताधारी काँग्रेसलाही त्यापुढे झुकावं लागलं आणि कायदा आणखी क़डक करण्यासाठी पावलं उचलावी लागली..नवीन कायद्यात बलात्कार प्रकरणी 30 वर्षाच्या शिक्षेची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे..तसेच जलदगती न्यायालय,केमिकल कास्ट्रेशन अर्थात औषधाचा वापर करुन आरोपील नपुंसक बनवण्याची शिफारस केली जाणार आहे..अशाच पद्धतीने इतर राजकीय पक्षांकडूनही काही सूचना दिल्या जाण्याची शक्यता आहे..पण ही प्रक्रिया वेळखआऊ असल्यामुळे २०१३मध्ये खरंच कठोर कायदा येणार का हाच खरा प्रश्न आहे..

दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील सहा आरोपींना २०१३मध्ये खरंच फाशीची शिक्षा मिळणार का हा देखील एक प्रश्न आहे..पीडित तरुणीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्यानंतर सर्व आरोपींविरोधात बलात्काराबरोबरच खूनाचा गुन्हाही दाखल करण्यात आलाय...आरोपपत्र तयार करण्यात आलं असून या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात होणार आहे..या प्रकरणातील सगळे पुरावे आरोपींच्या विरोधात असल्यामुळे हा दुर्मिळातील दुर्मिळ गुन्हा ठरु शकतो असं विधीतज्ज्ञांचं म्हणनं आहे.

राजकिय दृष्ट्याही २०१३ हे वर्ष महत्वपूर्ण ठरणार आहे..कारण या वर्षी मध्यप्रदेश,कर्नाटक,त्रिपूरा,नागालँड, मिझोरम आणि मेघालयमध्ये निवडणुका होणार आहेत..तसेच अलिकडच्या काळात ज्या वेगाने राजकीय समिकरणं बदलत आहेत ते पहाता मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता नाकारता येत नाही

२०१३ मध्ये दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश,कर्नाटक,त्रिपूरा,नागालँड, मिझोरम आणि मेघालयात निवडणुका होऊ घातल्या आहेत..२०१४मध्ये युपीए -२ चा कार्यकाळ समाप्त होणार आहे..या दोन्ही निवडणुकांमधली अंतर फार नसल्यामुळे दोन्ही निवडणुका एकावेळी घेतल्या गेल्यास आश्चर्य वाटायला नको..त्यामागचं कारण म्हणजे २०१२मध्ये विरोधीपक्ष तसेच आंदोलनाचा सरकारवर दबाव वाढला होता..पण पंतप्रधान आणि युपीए - २ च्या ब-याच नेत्यांनी मध्यावधी निवडणुकाची शक्यता फेटाळून लावली आहे..त्यामुळे सरकारला बळ मिळालं.

पण मध्यावधी निवडणुकींच्या शक्यतेच्या पार्श्वभूमिवर राजकीय विश्लेषकांनी वेगळाच कयास लावला आहे..युपीए- २ची महत्वाकांक्षी योजना म्हणजे सबसिडीच्या बदल्यात कॅश योजना ...देशातील ४३ जिल्ह्यांमध्ये ही योजना लवकरच लागू केली जाण्याची शक्यता आहे..रिटेलमध्ये एफडीआयला मंजूरी मिळाली आहे..त्यामुळे २०१३च्या आखेरीस फिल गुड फॅक्टर तयार करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाईल....त्यामुळे सरकार लवकर निवडणुका घेण्याच्या तयारीत असेल..काँग्रेसचे राजकुमार राहुल गांधींवर आगामी काळात मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही..



२०१३ मध्ये मध्यावधी निवडणुका झाल्या किंवा २०१४मध्ये नियोजीत निवडणुका झाल्या तरी काँग्रेस नवी व्यूहरचना आखून जनतेसमोर जाणार हे मात्र निश्तित..नव्या व्यूहरचनेनूसार राहुल गांधींवर मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते..नुकतेच सुरज कुंडमध्ये पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत सहा सदस्यीय निवडणुक समन्वय समीतीची जबाबदारी राहुलगांधींकडं सोपण्याचा निर्णय झालाय..या निर्णयामागचा उद्देश स्पष्ट आहे आणि तो म्हणजे आगामी निवडणुका..हा बदल झाला असला तरी सोनिया गांधी पक्षाला मार्गदर्शन करत राहातील....पण एक गोष्टमात्र स्पष्ट आहे आणि ती म्हणजे काँग्रेसचं नेतृत्व युवा ब्रिगेडकडं सोपवलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही..

२००९ साली काँग्रेसने मनमोहन सिंग यांना प्रोजेक्ट करुन निवडणुक लढवली असली तरी काँग्रेसमधील नेते बेनी प्रसाद वर्मा,दिग्विजय सिंग यांनी राहुल गांधींकडं नेतृत्व सोपण्याची मागणी यापूर्वीच केली आहे..यापार्श्वभूमीवर काँग्रेस आगामी निवडणुका राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली लढणार का हाच खरा प्रश्न आहे..

गुजरात विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींनी आपल्या पंतप्रधानपदाच्या दावेदारी विषयी कोणतचं भाष्य केलं नसलं तरी त्यांच्या समर्थकांनी त्यांना पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून नक्कीच प्रोजेक्ट केलं आहे..सलग तिस-यांदा निवडणूका जिंकत भाजपातील मास लि़डर म्हणून मोदींनी आपली प्रतिमा तयार केली आहे..सार्वत्रिक निवडणुका 2013 झाल्या किंवा 2014मध्ये जरी झाल्या तरी नरेंद्र मोदी हे भाजपचे पंतप्रधानपदाच उमेदरवार असणार का हाच खरा प्रश्न आहे.

पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींच्या नावाची चर्चा सुरु असतांना NDA तील एक सदस्य JDU चे नेते नीतिश कुमार यांनीही यावर भाष्य केलं होतं...भाजपने पंतप्रधानपदासाठीच्या उमेदवाराचं नाव जाहिर करावं असं नितिशकुमारांनी यापूर्वीचं सांगितलं आहे... तसेच NDA च्या उमेदवाराची प्रतिमा ही धर्मनिरपेक्ष असावी असाही सल्ला त्यांनी दिला होता...गुजरातमध्ये यश मिळवणा-या नरेंद्र मोदींनी केंद्रीय राजकारणात उडी घेतल्यास मतदारांचं ध्रुवीकरण होईल अशी शक्यता व्य़क्त केली जात असून त्याचा फायदा विरोधी पक्षाला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे...


201मध्ये काय घडणार? हा प्रश्न सर्वांनाच पडलाय...मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी कसाब प्रमाणे संसद हल्ल्यातील आरोपी अफजल गुरुला या वर्षी तरी फाशी दिली जाणार का ?

अफजल गुरुच्या फाशीचा मुद्दा कोणत्या दिशेला जाऊ शकतो? तसेच या वर्षी लोकपाल कायदा अस्तित्वात येणार ? 26/11च्या मुंबई हल्ल्याला जवळपास चार वर्ष उलटून गेल्यानंतर २१ नोव्हेंबर २०१२ला पाकिस्तानीदहशतवादी अजमल आमिर कसाबला पुणे येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली..त्यानंतर संसदेवर दहशतवादी हल्लातील आरोपी अफजल गुरुला फाशी देण्याच्या मागणीने जोर धरला..

२०१३मध्ये अफजल गुरुला फाशी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे..अफजल गुरुने राष्ट्रपतीकडे पाठवलेल्या दयेच्या अर्जावर गृहमंत्रालयाने आपलं मत नोंदवलं असून अफजल गुरुला फाशी देण्याची शिफारस केली आहे..१६ नोव्हेंबर २०१२ला राष्ट्रपतींनी अफजल गुरुसहीत सातजणांच्या दयेच्या अर्जावर सेकंड ओपिनियन गृहमंत्रालयाकडून मागवलं आहे..

गृहमंत्रालयाने फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यास राष्ट्रपतीकडून दयेची याचिका लवकर निकाली काढली जाईल..त्यामुळे कसाब प्रमाणेच अफजल गुरुलाही फासावर लटकवलं जाण्याची शक्यता आहे..

२०१२ हे वर्ष घोटाळ्यांसाठीही चर्चेत राहिलं..२०११मध्ये भ्रष्टाचार विरोधी कायदा करण्यासाठी जनलोकपालची मागणी करण्यात आली..आणि त्यासाठी आंदोलनही करण्यात आलं..

आता लवकरच निवडणुका होवू घातल्यामुळे या संदर्भात कडक कायदा करण्यासाठी सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता आहे..त्यामुळेच सरकारला याबाबीकडं दुर्लक्ष करता येणार नाही..नोव्हेंबर २०१२मध्ये लोकपाल बिल तयार करणा-या समितीने अनेक सूचना दिल्या आहेत.. नव्या सूचनांसह सरकारला हे बील राज्यसभेत मांडावं लागणार आहे..तिथं ते पास झाल्यानंतर नव्या सूचनांवर लोकसभेत शिक्कामोर्तब केला जाईल..पण पूर्वीचा अनुभव लक्षात घेता २०१३मध्ये तरी हे बील पास होणार का या विषयी सगळ्यांच्या मनात शंका आहे..

२०१३ हे वर्ष सोन्याचं असेल की सेन्सेक्सचं हा प्रश्न अनेकांना सतावतोय..३० डिसेंबरला सोनं जवळपास ३० हजार ७०० रुपयांवर जाऊन पोहोचलं होतं...अर्थतज्ज्ञांच्या मते २०१३मध्ये सोन्याची चमक कमी होण्याची शक्यता आहे..त्यामागचं कारण म्हणजे २०१३मध्ये आर्थिकस्थिती सुधारण्याची शक्यता आहे..त्यामुळे सेंसेक्स पुन्हा एकदा उसळी घेऊ शकतो..रिसर्च एजन्सी मॉर्गन स्टॅनले आणि अमेरिकन बँक मॅरिल लिंच सारख्या एजन्सीच्या अंदाजानुसार दिसेंबर २०१३ पर्यंत सेंन्सेक्स २२ ते २३ हजारांचा आकडा पारकरण्याची शक्यता आहे..

क्रिकेट आणि सिनेमाने नेहमीच भारतीयांना भूरळ घातली आहे..क्रिकेट विश्वात २०१३मध्ये काय घडणार याकडं क्रिकेटप्रेमींच लक्ष लागून राहिलं आहे..क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडूलकर क्रिकेटमधून संन्यास तर घेणार नाही ना? तसेच बॉलीवूडच्या मोस्ट एलिजिबल बॅचलर सलमान खान यंदातरी बोहल्यावर चढणार का ?

क्रिकेटप्रेमींना ज्या देवत्व बहाल केलय त्या सचिन तेंडुलकरने डिसेंबर महिन्यात वन-डे क्रिकेटमधून संन्यास घेतला..त्याच्या बॅटीतून रन्सचा ओघ थांबला असला तरी त्याच्या चाहत्यांसाठी ही निराश करणारी घटना होती..सचिनने वनडेतून निवृत्ती घेतली असली तरी तो टेस्ट मॅच खेळणार असल्यामुळे क्रिकेटप्रेमींसाठी तो एकप्रकारे दिलासाच म्हणावा लागेल..

सचिनने जास्तीजास्तकाळ क्रिकेट खेळत राहावं असं त्याच्या चाहत्यांना वाटतंय..पण २०१२मध्ये सचिनने अचानकपणे वनडेतून निवृत्ती घेतली..त्यामुळे सचिनच्या मनात नेमकं काय चाललंय असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडला आहे..क्रिकेट बोर्डावर सचिन नाराज तर नाही ना ? असाही सवाल उपस्थित केला जात आहे..जर असं असले तर २०१३मध्ये सचिनच्या प्रत्येक निर्णयाकडं त्याच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं..खरं तर सचिनने टेस्ट क्रिकेटमध्ये ट्रिपल सेंच्युरी ठोकावी अशी क्रिकेटप्रेमींची इच्छा आहे..सचिनच्या खात्यात केवळ हा एकमेव विक्रम नोंदवला गेला नाही.

सचिनच्या निवृत्तीबरोबरच २०१३मध्ये भारतीय क्रिकेट विषयी आणखी एक सवाल केला जात आहे आणि तो म्हणजे भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान महेंद्र सिंग धोणीचं कप्तानपद तर जाणार नाही ना ? २०१२मद्ये धोणीच्या खराब कामगिरीमुळे त्याच्या कप्तानीविषयी प्रश्न उपस्थिती केला गेला होता..माजी क्रिकेटपटू मोहिंदर अमरनाथसह अनेकांनी धोणीला कप्तानपदावरुन दूर करण्याची मागणी केली होती..


२०१२मध्ये धोणीच्या नेतृवाखाली खेळणा-या भारतीय टीमने नंबर वन टेस्ट टीमचा मान गमावला..नुकतेच पाकिस्तानशी झालेल्या मॅचमध्ये भारताला पराभव पत्करावा लागल्यामुळे टी- २०मध्ये नंबर वन होण्याचा मान हूकला...मात्र २०१३ मध्ये जर धोणीला कप्तान पदावरुन दूर केल्यास भारतीय टीमचं नेतृत्व कोण करणार हा देखील एक प्रश्नच आहे..मोहिंदर अमरनाथ आणि सुनील गावसकर यांनी विराट कोहलीला कप्तानपद देण्याची सूचना केली आहे..२०१५मध्ये होणा-या वर्ल्डकपसाठी भारतीय टीमची बांधणी करण्याच्या सूचना बीसीसीआयने धोणीला दिल्या आहेत

एक था टायगर आणि दबंग - २ सारख्या हीट सिनेमांच्या य़शामुळे २०११ प्रमाणेच २०१२मध्येही अभिनेता सलमान खानचे सितारे बुलंद होते..२०१३मध्ये सलमान खान निर्माता तसेच दिग्दर्शकाला नोकरीवर ठेवण्याच्या बेतात असल्याचं बोललं जातंय..आपल्या नावावर सिनेमे चालत असतील आपल्याला त्याचा तेव्हडाच फायदा झाला पाहिजे हा त्यामागचा त्याचा उद्देश आहे..२०१३मध्ये आणखी एक मोठा सवाल आहे आणि तो म्हणजे सलमान खान बोहल्यावर चढणार का ?


प्रियंकाशी लिंकअप झाल्याची खबर आली खरी पण सध्यातरी सलमान सिंगल आहे..तसेच बॉ़लीवूडमध्ये तो मोस्ट एलिजिबल बॅचलर आहे..पण २०१३मध्येही तो मोस्ट एलिजिबल बॅचलर राहणार का ? सलमानच्या कुटुंबींयासह आमिरखान सारख्या बड्या अभिनेत्यानेही सलमानला लग्नाचा सल्ला दिला आहे..पण सलमानच्या मनात नेमकं काय चललं हे सांगणं मात्र कठीण आहे..

2013मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर जगाच्या नजरा या अनेक घटनेकडे खिळून राहील्यायत..आपला शेजारी पाकिस्तानात काय घडणार, विस्तारवादी असणारा चीन आणखी किती विस्तारणार आणि सर्वात महत्वाचे म्हणजे इराण आणि इस्त्राईल वादाला 2013 मध्ये नेमकं कोणते वळण मिळणार या सा-याच घटना महत्वाच्या आहेत..

2013मध्ये पाकिस्तानात फार मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान ससंदे 18 मार्च 2013 बरखास्त होईल. पण त्यानंतरचा सवाल हा आहे की, 2013 मध्ये सत्तेवर कोण येणार. 2012 मध्ये पाकिस्तानात वारवारं हिसंक घटनेंच आणि आतंकवादी घटनांचे साम्राज्य राहीलय.. राष्ट्रपती झरदारी यांना भ्रष्टाचाराच्या मुद्यांनी चागलच पछाडलय.. त्याचबरोबर पाकिस्तानचे सैन्य़ हे कमजोर पडत असल्यानं अस्थैर्य वाढलय.. पण जाणकारांच्या म्हणण्यानुसार खरी लढाई ही झरदारींची पिपल्स पार्टी आणि नवाझ शरीफ यांच्या मुस्लीम लिग यांच्यामध्ये असेल..

पाकिस्तानात राष्ट्रपती झरदारी यांच्या पुनर्नियुक्तीवरुन वादंग आहेत.. काळ्या संपत्तीच्या मुद्य़ावरुन सरकारला सुप्रिम कोर्टासमोर झुकावं लागलं आणि झरदारी यांची लोकप्रियता घटत गेली. इम्रान खान यांची लोकप्रियता वाढत चालली असली तरी पाकिस्तान पीपल्स पार्टीने बेनझीर यांच्या मुलाला बिलावल भुट्टो यांना राजकारणात उतरवल्यान प्रश्न वाढलेयत.

2013 मधला आणखी एक सवाल आहे तो म्हणजे चीन आशिया खंडातील कोणत्या देशाशी युद्ध पुकारेल.. मागील काही वर्षांचा विचार करता आर्थिक प्रगतीच्या अश्वावर स्वार झालेल्या चीननं आपलं लष्करी सामर्थ्य वाढवलय़..व्यापारी कक्षा वाढवतानाच भारताशीही सिमांवरुन वाद सुरु झालय.. दक्षिण व्हिएतनामशीही चीनचा सागरी कक्षेवरुनही वाद उफाळलाय.. त्याचवेळी जपानच्या एका बेटावरुनही चीनने आक्रमक भुमिका घेतलीय..

2013 मध्ये इराण आणि इस्त्रायलमध्ये युद्धाचा भडका उडण्याचीही शक्यता आहे.. इराणच्या परमाणू कार्यक्रमाला इस्त्रायल संशयाच्या सूईतून पाहतोय़.. भविष्य़ात इराण त्याचा वापर अण्वस्त्रासाठी करेल अशी भिती इस्त्रायलला वाटतेय.. आणि म्हणूनच अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांनी त्यांच्यावर आपला दबाव वाढवलाय.. त्याचवेळी इराणने आपली भुमिका स्पष्ट केलीय की, इराणचा परमाणु कार्यक्रम हा खुपवर्ष चालणारा आणि शांतिपुर्ण आहे. पण त्याचवेळी इराणच्या मिसाईल चाचण्यांनी आगामी काळात इस्त्रायलचा धोका वाढवलाय हे मात्र नक्की..

First Published: Tuesday, January 1, 2013, 23:32


comments powered by Disqus