शेतकरी नेते एकवटले; अश्रू झाले अनावर!, farmers leader Comes together

शेतकरी नेते एकवटले; अश्रू झाले अनावर!

शेतकरी नेते एकवटले; अश्रू झाले अनावर!
www.24taas.com, सांगली

ऊसाला दरवाढ देण्याबाबत शेतकऱ्यांचा संघर्ष अद्याप सुरूच आहे. आंदोलनाला अद्याप यश आलं नसलं तरी यानिमित्तानं सर्व शेतकरी नेते एकवटले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं ही निश्चितच आनंदाची बाब आहे. सांगलीत होणाऱ्या ऊस परिषदेच्या व्यासपीठावर तीन शेतकरी संघटनेचे नेते एकत्र येणार आहेत. सांगलीत आज सकाळी शरद जोशी, सदाभाऊ खोत आणि प्रदीप पाटील या तीन शेतकरी संघटनांच्या नेत्यांची भेट झाली. यावेळेला शरद जोशी यांनी राजू शेट्टी आणि रघुनाथदादा पाटील यांना ऊस परिषदेचं निमंत्रण दिलं. सांगलीमध्ये २१ तारखेला शरद जोशींच्या पुढाकारानं ऊस परिषद होणार आहे. अनेक वर्षानंतर तीन संघटनेचे नेते एकत्र आल्यामुळे हे नेते गहिवरले. एकमेकांची गळाभेट घेऊन त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. ऊस आंदोलनानंतर उदभवलेल्या परिस्थितीनंतर तीन शेतकरी नेते एकवटल्यानं शेतकऱ्यांमध्येही आनंदाचं वातावरण आहे. यामुळे सरकारकडे न्याय मिळवून देण्यासाठी जास्तीत जास्त फायदा होईल, असा विश्वास शेतकरी व्यक्त करत आहेत.

शेतकरी नेते एकवटले; अश्रू झाले अनावर!

`नलावडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी`

दरम्यान, ऊस आंदोलनादरम्यान सांगलीत झालेल्या पोलीस गोळीबार प्रकरणी चंद्रकांत नलावडे या शेतकऱ्याचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी केलाय. तसंच या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केलीय. सांगलीत झालेल्या गोळीबारावेळी नलावडे यांना पाच गोळ्या लागल्याची माहिती होती मात्र, नंतर पोलिसांनी एकच गोळी लागल्याचा दावा केला होता. नलावडे यांच्या पोस्टमार्टेम रिपोर्टही दडपण्यात आल्याचा आरोप नलावडेंच्या कुटुंबियांनी केलाय.

First Published: Saturday, November 17, 2012, 16:01


comments powered by Disqus