Last Updated: Monday, November 12, 2012, 10:55
www.24taas.com,कोल्हापूरस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांना इंदापूरमधून पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या दोन नेत्यांसह जवळपास एक ते दीड हजार कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलयं. तर तेवढेच कार्यकर्ते भूमिगत झालेत.
दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोणीदेवकर इथं संतप्त शेतक-यांनी बस जाळलीये. दोन ते तीन बसच्या काचा फोडण्यात आल्यात. तर अनेक बस बंद पाडण्यात आल्यात.
दरम्यान, शेट्टी आणि आंदोलकांना सुरुवातीला जेजुरी पोलीस ठाण्यात नेण्याचं पोलिसांनी ठरवलं होतं. मात्र त्यानंतर त्यांना लोणीकाळभोरला नेण्याचं ठरलयं. ऊसदरासाठी राजू शेट्टी यांनी राज्यव्यापी चक्काजामचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केलीय.
मुख्यमंत्र्यांचा आज वालचंदनगर इथं कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून पोलिसांनी ही खबरदारी घेतलीये. उसाला ३००० रुपये दर मिळावा यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
राज्यात ऊसदर आंदोलन चांगलंच चिघळलंय. केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतिक पाटील यांचे बंधू विशाल पाटील यांच्या गाडीवर काल सांगलीत दगडफेक करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून उस उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत. विशाल पाटील यांच्या गाडीवर नेमका हल्ला कोणी केला, हे समजू शकले नसले, तरी आंदोलक शेतक-यांनीच हे कृत्य केलं असण्याची शक्यता आहे.
अहमदनगर- मनमाड मार्ग रोखून धरला होता. पहिल्या हप्त्याचा आमच्या मागणीप्रमाणी निर्णय दोन दिवसात घेतला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. तसंच श्रीरामपूरमध्ये खंडकरी शेतक-यांना जमीन वाटपाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारा कार्यक्रम उळळून लावण्याचा इशाराही कार्यकर्त्यांनी दिलाय.
दरम्यान सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये उसाला पहिली उचल २३०० रुपये देण्यात येणार आहे. तीन जिल्ह्यातल्या साखर कारखानदारांची रविवारी बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना ३ हजार रुपयांचा पहिला हप्ता मिळावा यासाठी ठाम आहे.
First Published: Monday, November 12, 2012, 10:52