राज, अजित महाराष्ट्राच्या मुद्यावर बोला, Raj, Ajit speak about Maharashtra

राज, अजित महाराष्ट्राच्या मुद्यावर बोला

राज, अजित महाराष्ट्राच्या मुद्यावर बोला
देवेंद्र फडणवीस
आमदार, भाजप

राज ठाकरेंनी भाषण करताना अजित पवारांवर, आर.आर. पाटील यांच्यावर हल्ला चढवला. पण, असं आघाडीतल्या एकाच पक्षाला टार्गेट करु नये, असं मला वाटतं. महाराष्ट्राच्या अधोगतीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे दोघेही जबाबदार आहेत. त्यामुळे आज महाराष्ट्रभरात जो असंतोष पसरला आहे, त्याला राष्ट्रवादीइतकंच काँग्रेसही कारणीभूत आहे. अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामुळे पसरलेल्या असंतोषाला जे घटक कारणीभूत आहेत, त्या सर्व घटकांवरच हल्ला केला पाहिजे.
राज, अजित महाराष्ट्राच्या मुद्यावर बोला


राज ठाकरेंकडे ठाकरी शैली आहे. त्याचा वापर करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा समाचार घेतला. ही ठाकरी शैली त्यांचे काका बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे होती. त्यांनी आपल्या काळात अशा ठाकरी शैलीचा वापर करत कित्येक वेळेला अजित पवारांचे काका शरद पवार यांना खडे बोल सुनावले होते. पण तेव्हा शरद पवारांच्या माणसांनी कधी बाळासाहेबांच्या गाड्यांवर दगडफेक केली नाही. कारण तेव्हा अशा प्रकारच्या मौखिक हल्ल्यांना राजकीय उत्तर देण्याची परंपरा महाराष्ट्रात होती. ती शरद पवारांकडेही होती.


दुर्दैवाने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला राजकीय उत्तर देणं जमत नाही. त्यांना राजकीय उत्तर देण्याऐवजी रस्त्यांवर उतरून उत्तर देणं ही संस्कृती अधिक योग्य वाटत असावी. माझी अशी अपेक्षा आहे, की महाराष्ट्रातलं राजकारण हे असं व्यक्तींपेक्षा मुद्यांवर तापायला हवं. मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी गुद्यांची भाषा बोलण्यापेक्षा मुद्यांवर वाद घालावा. महाराष्ट्रात आज इतके प्रश्न आहेत, या प्रश्नांवर दोन्ही पक्षांनी बोलावं. एकमेकांवर हल्ला चढवण्यापेक्षा महाराष्ट्राच्या प्रश्नांवर बोलल्यास महाराष्ट्राचं भलं होईल. महाराष्ट्राचा विकास होईल.

शब्दांकन- आदित्य नीला दिलीप निमकर

First Published: Thursday, February 28, 2013, 18:57


comments powered by Disqus