अण्णांचा 'रिस्की टर्न' - Marathi News 24taas.com

अण्णांचा 'रिस्की टर्न'


भारतकुमार राऊत, खासदार, शिवसेना

 
अण्णांनी काँग्रेसविरोधात जी काही विधानं केली आहेत, त्यातून अण्णांची भविष्यातील दिशा सूचित होतेय. त्यांनी आता एका राजकीय शक्तीच्या दिशेने प्रवास करायला सुरूवात केली आहे. आणि यात कुठलीही खेळी किंवा चाल नाही. ही अत्यंत स्वाभाविक भूमिका आहे. हे घडणारच होतं. यामुळे सगळीकडे चर्चेला उधाण आलंय हे खरं. पण, यात काही वेगळं किंवा गैर असं काहीच घडत नाहीये.
 
अण्णांनी हा जो पवित्रा घेतला आहे. त्यामागे खूप मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. आपण आत्तापर्यंत घडलेल्या वेगवेगळ्या क्रांतीचा आढावा घेतला तर एक समान सूत्र आपल्याला पाहायला मिळतं. आधुनिक जगाच्या इतिहासात जेवढ्या सामाजिक क्रांती घडल्यात, त्यांचा मार्ग हा सामाजिक ते राजकीय असाच होता. मग ती क्रांती सोव्हिएत रशियातली लेनिनने केलेली असो, चीनमधली माओची क्रांती असो (माओने तिला सामाजिक क्रांती न म्हणता सांस्कृतिक म्हटलं होतं.) क्युबामध्ये घडलेली फिडेल क्रॅस्ट्रोची क्रांती असो किंवा अगदी आपल्या देशातील उदाहरण द्यायचं झालं तर जयप्रकाश नारायण यांचं देता येईल. त्यांची वाट सामाजिकतेकडून राजकारणाकडे आपसूकच वळते. कारण मुळात यात भर असतो तो कायदे बदलण्यावर. कायद्यात बदल घडवून आणणं म्हणजे येऱ्या-गबाळाचे काम नोहे.
 
कोणीही उठावं आणि म्हणावं की कायदे बदला, तर तसं होऊ शकत नाही. यू हॅव टू बी इन द सिस्टम टू चेंज द सिस्टम (व्यवस्थेत बदल घडवून आणायचा असेल, तर ते व्यवस्थेचा एक भाग बनूनच) त्यामुळे कायद्यात बदल घडवून आणण्यासाठी विधेयकं सादर करावी लागतात. ती संमत व्हावी लागतात. आणि हे सर्व घडवून आणण्यासाठी राजकीय पक्ष बनून राजकारणात प्रवेश करणं आवश्यक असतं. अण्णांनाही राजकारणात यावंच लागेल.कारण, लोकशाहीत या पक्षाला नका मत देऊ, त्या पक्षाला निवडू नका... असं नुसतं नाही म्हणून चालत नाही. तुम्हाला एक पर्याय द्यावाच लागतो. अण्णा हाच पर्याय निर्माण करायला सुरूवात करत आहेत.
 

अण्णांनी काँग्रेसवर शरसंधान केल्यामुळे त्यांच्या मूळ उद्दिष्टावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातंय. पण, त्याला अर्थ नाही. पहिल्यापासून त्यांची हिच भूमिका होती. त्यांच्या काँग्रेसला टार्गेट करण्यामागे भाजपचा हात आहे, अशा वावड्या उठायला लागल्यात. कुणीही काँग्रेसविरुद्ध उठलं की त्याला भाजपची किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची फूस आहे, असा गवगवा करायचा, ही काँग्रेसची जुनी चाल आहे. अण्णांच्या या विधानांमुळे भाजपला काही प्रमाणात फायदा होईलही. पण, त्याचे दूरगामी परिणाम अण्णांना आपला राजकीय पक्ष निर्माण करण्यासाठी होणार आहे.  कारण त्यांचा अजेंडा स्पष्ट आहे. अण्णांना टीम अण्णा वा इतर लोकांनी विळखा घातला आहे असंही म्हणण्यात येतं. पण, अण्णा हे काही कच्च्या गुरूचे चेले नाहीत. त्यांच्यात एक प्रकारचा 'स्ट्रीट स्मार्टनेस' आहे. कुणीही सहजासहजी अण्णांचा गैरफायदा घेऊ शकत नाही.
पण, अण्णांचं आंदोलन खरोखर आता एका धोकादायक वळणावर आहे. आंदोलनाची गाडी अशा एका घाटातून जात आहे, जिथे एका बाजूला उंच डोंगर आहे तर दुसरीकडे खोल दरी. अण्णांनी लष्करात असताना अनेकवेळा अशा मार्गावरुन भरधाव वेगाने गाडी हाकली असेल. परंतु, राजकीय दिशेने प्रवास करताना अण्णांच्या आयुष्यात हा रिस्की टर्न आलाय. या वळणावर गाडीचा वेग कायम ठेवून रस्ता पार करणं अण्णांना कितपत जमतंय ते येणारा काळच ठरवेल.
 
शब्दांकन- आदित्य नीला दिलीप निमकर

First Published: Thursday, August 2, 2012, 16:40


comments powered by Disqus