Last Updated: Thursday, July 4, 2013, 16:25
www.24taas.com, झी मीडिया,न्यूयॉर्क आजपासून तुम्ही कोक आणि पेप्सी पिण्यावर लगाम घातला नाहीत तर तुमचे काही खरे नाही. कॉलेज तरूण-तरूणींची पहिली पसंती असते ती, कोल्डड्रींकला. काहीजण कोकला तर काहीजण पेप्सीला प्राधान्य देतात. मात्र, या पेयांमुळे धोका आहे हे कोणी सांगितले नसेल ना! अहो आपले आरोग्य धोक्यात आणण्याचे काम ही शितपेय करीत आहेत. हे अमेरिकेतील एका संशोधनातून पुढे आले आहे.
हॉटेलमध्ये नास्ता किंवा जेवण घेतल्यानंतर अनेकांना सोबत पेप्सी हवीच. तर सायंकाळी गाड्यांवर कोकशिवाय चायनीज घसात जाणारच नाही. दुस-या हातात कोल्डड्रींक हवंच. पण हे तुमच्या जीवनावर उठू शकतं. उठसूट पेप्सी पिऊन तुम्ही तुमच्याही नकळत कॅन्सरला आमंत्रण देता. पेप्सीमध्ये कॅन्सरला कारणीभूत ठरू शकणारे घटक असल्याचं एन्व्हायर्नमेंटल हेल्थनं केलेल्या चाचण्यांमधून पस्ट झालंय. हे पेप्सीनेही मान्य केलंय.
कोकाकोला आणि पेप्सी कंपनीने शीतपेयांमध्ये वापरलेल्या कॅरामेल कलरिंगमुळे कॅन्सरचा धोका बळावत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर कॅलिफोर्निया सरकारनं मार्चमध्ये या दोन कंपन्यांना कायदेशीर नोटीस बजावली होती. शीतपेय बनवण्याचा फॉर्म्युला बदलण्याचे आदेश त्यांना देण्यात आले होते. कॅन्सरला कारणीभूत ठरू शकणा-या घटकद्रव्यांचा वापर बंद करावा किंवा ते अपरिहार्यच असल्यास त्याचं प्रमाण अत्यल्प ठेवावं, असे निर्देश त्यांना देण्यात आले होते. त्यामुळे या पेयातून धोका आहे हे स्पष्ट झालेय.
पेप्सी आणि कोकाकोला या कंपन्यांना उत्पादनांवर वैधानिक इशारा छापण्याची सूचनाही करण्यात आली होती. त्यावेळी, दोन्ही कंपन्यांनी आवश्यक ती कार्यवाही करण्याची तयारी दर्शवली होती. पण त्यात सुधारणा न झाल्याने कॅलिफोर्निया सरकारनं कंपनीला पुन्हा धारेवर धरलंय. हे प्रकरण अंगाशी आल्यानं, पेप्सीनं पुन्हा फॉर्म्युला बदलण्याचं आश्वासन दिलंय.
कॅलिफोर्नियाच्या बाहेर जाणाऱ्या पेप्सीमध्ये, कॅन्सरला आमंत्रण देणारे घटक अजूनही मोठ्या प्रमाणात असल्याचं सेंटर फॉर इन्वाइरनमेंटल हेल्थच्या चाचण्यांमधून स्पष्ट झालंय. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत साऱ्यांसाठी हे कॅरामेल कलरिंग धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे कंपन्यांना इशारा दिलाय. दरम्यान, कंपनीने याबाबत केवळ आश्वासन दिलेय. ठोस उपाय करण्याबाबत काहीही स्पष्ट केलेलं नाही. त्यामुळे कोल्डड्रींक दूर राहणंच आपल्या हिताचं आहे, हे नक्कीच.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. *
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, July 4, 2013, 16:25