चेहऱ्यावर पिंपल्स... काळजी नको!, Ceherya are on the murumam do not worry!

चेहऱ्यावर पिंपल्स... काळजी नको!

चेहऱ्यावर पिंपल्स... काळजी नको!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना यौनग्रंथी विशेषत्वाने सक्रिय होतात. यौन ग्रंथीतील अंतस्राव शरीराच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरतात. मात्र, या अंतस्रावात अँण्ड्रोजनची पातळी वाढल्यावर मुरुमं येतात. तसेच मासिक पाळी येण्यापूर्वी मुलींच्या शरीरात प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढते, त्यामुळे चेहऱ्यावर, गालावर, नाकावर, कपाळावर तसेच खांदे, पाठीवर किंवा छातीवर मुरुमं येतात. ठराविक वयात शरीरात होणारे बदल आपण टाळू शकत नाही; मात्र आपल्या आहार-विहारात काही बदल केल्यास आपण मुरुमांच्या त्रासाची तीव्रता कमी करू शकतो. कित्येकदा अयोग्य आणि अवेळी आहार मुरुमांना आमंत्रण ठरतो. मुरुमांचा त्रास असणाऱ्यांनी शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ टाळणं गरजेचं असतं. बदाम, अक्रोड तसेच मांसाहारासारखे गरम प्रकृतीचे पदार्थ टाळणंही आवश्यक असतं.

मुरुमांचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी तेलकट आणि हाय कॅलरी असणाऱ्या पदार्थांचे सेवन कमी करावं. बटाटा, पिझ्झा, बर्गर तसेच चॉकलेट, शीतपेये शक्यतो टाळावे. शरीरात आयोडीन प्रमाणापेक्षा जास्त झाले तरीही मुरुमं येतात. अतितिखट किंवा अतिगोड, आंबवलेले पदार्थ तसेच कोबी, फ्लॉवर, गवार, ढोबळी मिरची, वांगे, टोमॅटो, चिंच, कैरी, दही, बेसनाचे पदार्थ, अन्नस वर्ज्य करावे.

अर्धवट झोप किंवा मानसिक ताणतणावही मुरुमं वाढवण्यास मदत करतात, त्यामुळे पुरेशी झोप घेणं आणि मानसिक तणावातून मुक्ती मिळवणं गरजेचं असतं. धूम्रपान, तंबाखू तसेच तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन आरोग्याला जसं अपायकारक आहे, तसंच मुरुमं वाढण्यासही कारणीभूत ठरतं. घामामुळं चेहरा तेलकट होऊन त्वचेवरची सूक्ष्म छिद्र बंद होतात आणि त्यामुळे पी अँक्ने नावाचा बॅक्टेरिया वाढून चेहऱ्यावर लाल पुटकुळ्या येतात. डोक्यात कोंडा झाल्यानंही मुरुमं येतात. कित्येकदा आनुवांशिकतेतूनही मुरुमं येऊ शकतात. स्त्रियांच्या मासिक पाळीत अनियमितता आल्यास किंवा मासिक पाळीबाबत काही समस्या उद्वल्यासही मुरुमांचं प्रमाण वाढतं. त्यामुळे अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं क्रमप्राप्त ठरतं. पचनासंदर्भातले गॅस, अॅसिडिटीसारख्या पोटाच्या समस्या तसेच मलमूत्र विसर्गाच्या समस्याही मुरुमांना आमंत्रण ठरतात.

मुरुमांचा त्रास असणाऱ्यांनी आहारात फळं, पालेभाज्यांचा समावेश करावा. कपाळावर मुरुमं येत असल्यास केसांना तेल लावणं शक्यतो टाळावं. चेहरा दिवसातून दोन ते तीन वेळा कोमट पाण्याने धुऊन कोरड्या टॉवेलने पुसावा. चेहरा जास्तीत जास्त कोरडा राहील याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे जेवणानंतर भरपूर पाणी प्यावं. रक्तचंदन, कडूलिंबाची पानं, तुळशीची पानं मसूर डाळ यांचे समप्रमाणात मिश्रण वाटून त्याची पेस्ट करावी आणि सकाळी आंघोळीअगोदर चेहऱ्याला लावावी. चेहऱ्यालवरील पेस्ट सुकल्यानंतर कोमट पाण्यानं धुऊन काढावी.

तसेच डाळिंब आणि संत्र्याचा सालीला थोड्या हळदीबरोबर वाटून त्यात पिकलेल्या लिंबाचा रस मिसळून मुरुमांवर लावावा. त्यामुळे मुरुमं कमी तर होतातच पण फुटलेल्या मुरुमांमुळे चेहऱ्यावर उठलेले काळे डागही कमी होण्यास मदत होते. जायफळ तसेच रक्तचंदन उगळून चेहऱ्यावर लावल्यानेही मुरुमांचं प्रमाण कमी होतं.

मुरुमं झाल्यास काळजी कशी घ्यावी?
अपचनाचा त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी. मुरुमांना वारंवार हात लावू नये. मुरुमं फोडू नयेत. मुरुमं फुटल्यावर लगेच स्वच्छ पाण्यानं चेहरा धुवावा. साबणाचा वापर टाळावा. उन्हात फिरणं शक्यतो टाळावं वेगवेगळे मलम लावण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.किशोरवयातून तारुण्यात पदार्पण करताना मुलं आणि मुलींच्या शरीरात महत्त्वाचे बदल होत असतात.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, December 25, 2013, 20:41


comments powered by Disqus