काय हरकत आहे... `माफ कर` म्हणायला!, SAY SORRY, WHENEVER YOU FEEL

काय हरकत आहे... `माफ कर` म्हणायला!

काय हरकत आहे... `माफ कर` म्हणायला!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

नातेसंबंधात तणाव किंवा गैरसमजूतींना थारा मिळाला तर नात्याचा पायाच डगमगायला लागतो. हेच नात्याचे बंध मजबूत असतील तर कितीही तणावात असलं तरी आणि कितीही गैरसमजुतींचा अडथळा समोर आला तरी हे बंध कायम राहतात... पण, नात्याचे ‘नाजूक’ बंध ‘मजबूत’ होतात तरी कसे?

खरं म्हणजे तुम्ही कोणत्याही नात्यात ठरवून प्रेम निर्माण करू शकत नाही... ते आपसूकच होतं. पण, याच प्रेमाला विश्वासाची जोड मिळाली तर क्या बात है! या प्रेमाला तडे जाण्याचे अनेक प्रसंगही तुमच्यासमोर येतील पण आपल्या चुकीची माफी मागितली गेली तर मोठ्या मनानं या चुका माफ केल्या गेल्या तर हे नातं कितीही तोडण्याचा प्रयत्न केला तरी तुटणार नाही.

समजून घेण्याचा प्रयत्न करा
तुमच्या भावनांना कुणी धक्का लावला, विश्वासाला धक्का लावला तर त्या व्यक्तीला माफ करणं थोडं कठिण होतं. पण पती-पत्नीचं नातंच असं असतं की तुम्हाला थोडं मन मोठं करून त्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागतो. आणि गैरसमजांमध्ये ‘इगो’ आला तर मग मात्र परिस्थिती मोठी कठिण होऊन बसते. त्यामुळे तुमची चुकी असो किंवा नसो... चुकीपेक्षा व्यक्ती मोठी वाटत असेल तर लगेचच सॉरी बोलून टाका.

‘आपण उद्या भांडू...’
तात्पुरतं किंवा क्षुल्लक भांडण विशेषतः मित्र मैत्रिणींमधलं... किंवा पती पत्नीमधलं... आणि एकमेकांशी संवादच बंद झाला तर... त्यानं हाती काय लागणार तर काहीच नाही... मग, अशावेळेस समोरच्या व्यक्तीनं अबोला पसंत केला तरी तुम्ही मात्र त्याच्याशी बोलणं सुरू करू. त्याला सांगा... ‘आज भांडायचा मूड नाहीए, आपण उद्या भांडू’ समोरच्या व्यक्तीचा राग गेला की त्यालाही त्याची चूक लक्षात येईल.

‘जा तुला माफ केलं...’
समोरच्या व्यक्तीनं माफी मागितली तर अहंकार बाजुला ठेऊन त्या व्यक्तीला माफ करण्यातच मोठेपणा आहे. ही छोटी गोष्टही त्या व्यक्तीला मोठा आनंद देऊ शकते. एखाद्या वेळेस समोरची व्यक्तीही सरळसोटपणे माफी मागण्यात कचरत असेल पण त्याचं वागणं मात्र तुमच्याप्रती सकारात्मक असेल अशा वेळेस त्याचं ‘सॉरी’ तुम्ही तुमच्या मनानंच समजून घ्या. त्याला मनापासून आपल्या कृत्याचा पश्चाताप असेल तर तुम्हीही त्याचं ‘सॉरी’ बोलण्याची वाट पाहू नका. आपला इगो बाजुला ठेवा आणि म्हणा... ‘जा, तुला माफ केलं’.

‘सॉरी... मला माफ कर’
माफी मागण्यानं किंवा माफ केल्यानं अनेक प्रश्न आपसूकच सुटतात. सुखी दाम्पत्याचा मंत्र काय असेल तर पती रागवलेला असेल तर पत्नी शांत बसते आणि पत्नी रागावलेली असताना पती... समोरची व्यक्ती आपल्यासाठी महत्त्वाची असेल आणि आपल्याला चूक मान्य असेल तर म्हणून टाका ‘सॉरी... मला माफ कर’

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, July 2, 2013, 08:00


comments powered by Disqus