Last Updated: Thursday, March 21, 2013, 10:55
www.24taas.com, नवी दिल्ली १९९३ बॉ़म्बस्फोटांप्रकरणी आज ऐतिहासिक फैसला होणार आहे.
या खटल्याचा निकाल आज सुप्रीम कोर्टात लागणार आहे. या निकालात मुन्नाभाई संजय दत्तचं काय होणार याकडं साऱ्यांच्याच नजरा लागल्या आहेत. कारण या खटल्यामध्ये आरोपी असलेल्या पण सध्या जामिनावर असलेल्या संजय दत्तला पुन्हा तुरुंगात जावं लागणार का, याकडे अनेकांचं लक्ष लागलंय. १२ मार्च १९९३ रोजी झालेल्या या साखळी बॉम्बस्फोटांत २५० जणांनी आपला जीव गमावला होता तर ७०० जण जखमी झाले होते.
या खटल्यात 'टाडा' कोर्टाचे तत्कालीन न्या. प्रमोद कोदे यांनी ३१ जुलै, २००७ ला संजय दत्तसह १०० आरोपींना शिक्षा सुनावली होती. तर २३ आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. फरारी आरोपी टायगर मेमन याचा भाऊ याकूब मेमन याच्यासह १२ आरोपींना फाशीची शिक्षा, २० आरोपींना जन्मठेप तर उर्वरित आरोपींना पाच ते दहा वर्षांची शिक्षा देण्यात आली होती. संजय दत्तला दहशतवादी कृत्याच्या शिक्षेतून सूट मिळाली असली तरी त्याला एके ५६ बंदूक बाळगल्याबद्दल शस्त्रास्त्र कायद्याखाली सहा वर्षोची शिक्षा देण्यात आली होती. फाशी झालेल्या बारापैकी एका आरोपीचे निधन झाले असून, जन्मठेपेच्या वीसपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. कमी शिक्षा झालेल्या ५० आरोपींच्या शिक्षेत वाढ व्हावी म्हणून सीबीआयने सुप्रीम कोर्टात आव्हान अर्ज केला आहे; तर सोडून दिलेल्या २३ आरोपींपैकी १७ आरोपींविरोधातही सीबीआयने सुप्रीम कोर्टात दाद मागितली आहे. सुप्रीम कोर्टात संजय दत्तसाठी ज्येष्ठ अॅड. हरीश साळवे काम पाहात असून, सुमारे २५ आरोपींच्या वतीने अॅड. फऱ्हाना शहा यांनी बाजू मांडली आहे. फऱ्हाना शहा यांनी 'टाडा' कोर्टातही काम पाहिले होते.
या प्रकरणाचा खटला जवळजवळ १४ वर्षे चालला. १२९ पेक्षा जास्त जणांना अटक करण्यात आली होती.
First Published: Thursday, March 21, 2013, 08:06